


▪️धम्मदीप जीवनगौरव पुरस्काराने विद्रोही शाहीर संभाजी भगत, मधुकर शिर्के सन्मानित
✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.5जानेवारी):- जाती आणि धर्माच्या नावावर माणसं विभागने धोक्याचे आहे. सर्वसामान्य माणूस आज उध्वस्त होत आहे. सामाजिक विषमतेची दरी वाढली आहे. भारतीय संविधान धोक्यात आले आहे. अशा काळात सामान्य माणसाच्या बाजूने उभे राहणारी आश्वासक माणुसकीची व्यापक चळवळ सांस्कृतिक उभी राहिली पाहिजे. त्या चळवळीचे नेतृत्व तरुणाने करावे असे प्रतिपादन कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी केले.
ते भारतीय संविधानिक मूल्यांची जपणूक करणे, लोकशाही तत्वे रुजवणे, वाचन व लेखन संस्कृती वाढविणे, महामानवांचे मानवतावादी विचार जनसामान्य माणसांपर्यंत पोहचविणे तसेच धम्म विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे पार पडलेल्या एकदिवसीय सातवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनात उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी सुप्रसिद्ध विद्रोही शाहीर संभाजी भगत आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर शिर्के यांना या वर्षीचा धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टचा मानाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा सातवा धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सातव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाचे उदघाटन सुप्रसिद्ध विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आले. संमेलनाध्यक्ष व्यंकाप्पा भोसले म्हणाले, बुद्धाचा विचार मानवतावाद जोपासण्यासाठी महत्त्वाचा आहे. बुद्धांनी जगाला समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला. धम्मविचार अंगीकारणे म्हणजे चांगला माणूस बनणे होय.
पुरस्काराला उत्तर देताना विद्रोही शाहीर संभाजी भगत म्हणाले, धर्मांध उन्माद रोखण्यासाठी माणुसकीची शाळा उभी करणे गरजेचे आहे. कारण आता माणूस टिकला पाहिजे.
मधुकर शिर्के म्हणाले, बहुजन समाजातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे. जगायला उपयुक्त ठरणारे शिक्षण मुलांना देणे आज गरजेचे आहे. माझा सत्कार हा माझ्यासह माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा आहे.दिवसभर चाललेल्या संमेलनात अमर कांबळे, ॲड. करुणा विमल, अनिल म्हमाने, भूपाल शेटे, अनिता गायकवाड, अंतिमा कोल्हापूरकर यांची भाषणे झाली.
यावेळी सुभाष देसाई, डॉ. प्रविण कोडोलीकर, डॉ. त्रिशला कदम, सिद्धार्थ कांबळे, डॉ. वसंत भागवत यांचा धम्मविचार साहित्य गौरव पुरस्कार, प्रदीप गायकी, संजयकुमार अर्दाळकर, प्रकाश सुतार, शंकर पुजारी यांचा राष्ट्रीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार, सत्यशोधक सार्वजनिक ग्रंथालय, धम्म प्रबोधिनी फौंडेशन, हसन देसाई, बाबासाहेब नदाफ यांचा राष्ट्रीय धम्मसंगिती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
तत्पूर्वी रविवार दि. 19 जानेवारीला होणार्या निर्मिती फिल्म क्लब निर्मित स्केटिंग : मृत्यूला भिडणारी गोष्ट या मराठी लघुपटाच्या प्रीमियर शोच्या पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मिलिंद शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मानवतावादी प्रतिज्ञा म्हणून तर प्रबुद्ध भारत हायस्कूल, कोल्हापूरच्या विद्यार्थिनींनी आम्ही शिवकन्या या गाण्यावर सामूहिक नृत्य करून संमेलनाची सुरुवात करण्यात झाली.
यावेळी कु. दिव्या बोडेकर या विद्यार्थिनीचा मी सावित्री बोलतेय हा एकपात्री प्रयोग सादर झाला.
दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कवी व लेखक डॉ. किरण भिंगारदेवे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले.यावेळी डॉ. दयानंद ठाणेकर, विश्वासराव तरटे, मिलिंद शिर्के, मोहन मिणचेकर, मारुती गायकवाड, सुनील भोसले, भरत लाटकर, किसनराव कुराडे यांच्यासह संविधान प्रेमी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर यांनी केले तर आभार अर्हंत मिणचेकर यांनी मानले.














