Home महाराष्ट्र तुमच्या शुभेच्छांनी भारावून गेलोय, प्रेम-जिव्हाळ्याचे हे नाते कायम ठेवा-आमदार डॉ.गुट्टे

तुमच्या शुभेच्छांनी भारावून गेलोय, प्रेम-जिव्हाळ्याचे हे नाते कायम ठेवा-आमदार डॉ.गुट्टे

261

✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.24डिसेंबर):-राज्यातील शेतकरी, कष्टकरी, युवक, युवतींसह सर्व समाज घटक विशेषतः लाडक्या बहिणीच्या मनातले आपल्या महायुतीचे सरकार नुकतेच स्थापन झाले आहे. त्यामुळे हे ट्रिपल इंजिन सरकार कुठेही कमी पडणार नाही. त्याच सरकारचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा मोठ्या जोमाने कामाला लागलो आहे. त्यामुळे येत्या काळात मागील कारकिर्दीपेक्षा अधिक वेगाने विकास करणार आहे. त्यासाठी माझ्या माय-बाप जनतेचे पाठबळ आणि आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. तीचं भावना, आपुलकी आणि जिव्हाळा आपण या भव्य सत्कार सोहळ्यातून दाखवून दिला आहे. त्यामुळे तुमच्या शुभेच्छांनी भारावून गेलोय, प्रेम-जिव्हाळ्याचे हे नाते कायम ठेवा! असे भावनिक आवाहन स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळ्यात सत्कारमूर्ती म्हणून ते बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्ष व आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्र मंडळाच्या वतीने या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी, परळी नाका ते डॉ.आंबेडकर चौक या दरम्यान भव्य रॅली काढून आ.डॉ.गुट्टे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.‌ रॅलीतील फटाक्यांची आतषबाजी आणि जेसीबीतून फुलांची उधळण लक्षणीय ठरली. याप्रसंगी व्यापारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.

पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, जनतेची साथ आणि सोबत असेल तर, राजकारणात काहीही अशक्य नाही. ही गोष्ट आपल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी सलग दुसऱ्यांदा दाखवून दिली आहे. त्यामुळे माझीही जबाबदारी आणखी वाढली आहे. म्हणून येत्या काळात आपण विकासाला प्राधान्य देवून पुढे जाण्याचे ठरवले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करणाऱ्या जनतेचे शब्दात कधीही आभार मानता येणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या ऋणात राहून समस्या व अडचणी दूर करण्यावर माझा भर असणार आहे. विकासाची घौडदौड सुरू असताना आपल्या मतदारसंघातील तिन्ही तालुक्याचा समतोल राखण्याचाही माझा मानस आहे.

चांगलं काम करणाऱ्या माणसांना नेहमी विरोध होतो. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माझ्याही बाबतीत अनेक आरोप झाले. मला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी आरोपाची राळ उडवली. तरीही आपल्या सारख्या प्रामाणिक व एकनिष्ठ लोकांची साथ होती. त्यामुळे गेल्या टर्मपेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळवता आला, याची कायम जाणीव राहील. आरोप करणाऱ्या मंडळींकडे बोलल्याशिवाय दुसरे काहीही नव्हते. तसेच कोणतेही व्हिजन सुध्दा नव्हते. त्यामुळे लोकांनी विकासाला भक्कम पाठींबा दिला आहे. हे लक्षात ठेवून निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी म्हटले.

आता आपला विजय झाला आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या सर्व समस्या, अडचणी व प्रश्न सोडविण्याची आपली जबाबदारी आहे. याची जाण ठेवून आपापल्या गावातील अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवा. मतभेद विसरून विकासाची भूमिका घ्या. निवडणूक काळातील राग-लोभ सोडून द्या. सर्वांनी सामूहिक एकता निर्माण केल्यास गावाचा, परिसराचा आणि तालुक्याचा विकास मोठ्या जोमाने होत असतो. त्यासाठी आपल्या समस्या व अडचणी माझ्यापर्यंत पोहोचवा. आपण सर्वजण मिळून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करूयात, असेही आवाहन आ.डॉ.गुट्टे यांनी उपस्थितांना केले.

यावेळी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर, मित्र मंडळाचे जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, कृउबा सभापती साहेबराव भोसले, उपाध्यक्ष संभाजीराव पोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव रोकडे, किशनराव भोसले, जिल्हा संपर्क प्रमुख संदीप माटेगावकर यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष आणि मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील व्यापारी बांधव, शिक्षक, जीवाभावाचे सहकारी, सर्वसामान्य नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

सत्कार रॅलीने वेधले शहरवासीयांचे लक्ष!
अभूतपूर्व अशा या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे औचित्य साधून शहरातील परळी नाका ते आंबेडकर चौक या दरम्यान आयोजित सत्कार रॅलीत प्रचंड गर्दी उसळली होती. ढोल ताशांचा कडकडाट, घोषणा, शिट्ट्या आणि फटाक्यांची जोरदार आतषबाजी यामुळे प्रचंड उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. शहरातील प्रमुख चौकात लावलेले मोठमोठे कटआऊट आणि रस्त्याच्या दुतर्फा फ्लेक्सबाजी. तसेच जेसीबीतून आ‌.डॉ.गुट्टे यांच्यावर होणारी फुलांची उधळण शहरवासीयांचे लक्ष वेधणारी ठरली.
कार्यकर्त्यांना मोठं करणारा नेता आणि लोखंडला सोनं करणारा परीस! – आ.विटेकर

आपले मार्गदर्शक, नेते असणारे कर्तव्यदक्ष आमदार डॉ.गुट्टे हे केवळ लोकप्रतिनिधी नाहीत. तर आपले पाठीराखे आहेत. राजकीय चौकटीच्या बाहेर जावून काम करणारा अवलिया माणूस म्हणून मी त्यांच्याकडे पाहातो. त्यांच्यातील नेतृत्वगुण पाहाता कार्यकर्त्यांना मोठं करणारा नेता असेच वर्णन करावे लागेल. माझे आणि त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या सहवासात आल्यापासून माझ्या व्यक्तिगत आयुष्यात खूप संधी मिळाल्या आहेत. वेळोवेळी त्यांचे पाठबळ व मार्गदर्शन मिळत असते. त्यामुळे माझ्या सारख्याला इंथपर्यंत येण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. म्हणून लोखंडला सोनं करणारा परीस! या दृष्टीने मी त्यांच्याकडे पाहातो, अशा शब्दात आमदार राजेश विटेकर यांनी आ.डॉ.गुट्टे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here