


दौंड – (प्रतिनिधी )- कानगाव तालुका दौंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील तयार करण्याची अनोखी कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत भाग घेऊन शाळेतील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आकाशकंदील बनवले. भारतीय संस्कृतीतील पवित्र मानल्या जाणाऱ्या दिवाळी सणानिमित्त शाळेतील शिक्षकांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांमध्ये असलेले उपजत कला गुण विकसित व्हावेत, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतूने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आकर्षक व पर्यावरणपूरक असे २०० आकाशकंदील बनवले. या कार्यशाळेत शाळेतील सर्व विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते. त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा शाळेचे मुख्याध्यापक शामराव जगताप, उपशिक्षक सखाराम खोमणे, राजेंद्र जगताप, श्याम ठाणेदार, एकनाथ हराळ, प्रकाश लकडे, संध्या कुंभार, शोभा कोष्टी या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आकाश कंदील बनवण्याच्या कार्यशाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच ग्रामस्थ व पालकांनी कौतुक केले.













