


सातारा, खटाव ,प्रतिनिधी/ नितीन राजे 9822800812
पुसेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराज मंदिराच्या आषाढी वारी पायी पालखी दिंडीचे टाळ मृदंगाच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी विठ्ठलाच्या नामघोषाने आज अवघी पुसेगाव सुवर्णनगरी विठ्ठलमय झाली होती.
दिंडी प्रस्थानापूर्वी सेवागिरी मंदीरात मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेचे तसेच श्री सेवागिरी महाराजांच्या पादुकांचे आणि पालखीचे मंत्रघोशात विधिवत पूजन केले. याप्रसंगी श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, गौरव जाधव, सचिन देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस घनश्याम मसणे, उपसरपंच विशाल जाधव, ट्रस्टचे माजी चेअरमन, विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, भाविक व ग्रामस्थांची उपस्थिती होती. दिंडीच्या अग्रभागी बँड पथक,
शाळांमधील मुलींचेवेशभूषेतील कलश पथक, मुलांचे लेझीम पथक, दिंडीतील वारकऱ्यांचे झेंडा पथक त्यामागे ज्ञानोबा-तुकोबा सेवागिरींचा जयघोष करणारे पुरुष वारकरी, भजन गाणारे भजनी मंडळाचे पथक, फुलांनी सजवलेल्या रथात श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. रथामागे डोक्यावर तुळस कलशघेतलेल्या महिला वारकरी दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिंडीचे पहिले रिंगण झाले. यावेळी पालखी रथावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखी सोहळ्यात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करत दिंडी सोहळा रंगतदार केला.
सेवागिरी दिंडीचा पहिला मुक्काम
महिमानगड येथे होणार आहे. यानंतर मंगळवार दि.९ जुलै लोधवडे, बुधवार दि. १० जुलै म्हसवड, गुरूवार दि.११ जुलै पिलीव, शुक्रवार दि. १२ जुलै तांदूळवाडी, शनिवार दि. १३ जुलै भाळवणी, रविवार दि. १४ जुलै उपरी, सोमवार दि. १५ जुलै वाखरी, मंगळवार दि. १६ जुलै पंढरपूर मुक्कामी पोहोचेल. बुधवारी १७ जुलैला आषाढी एकादशी आहे. गुरुवारी १८ जुलैला दिंडीचे परत पुसेगावकडे प्रस्थान होणार आहे














