


धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर
धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थांच्या एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात उद्याच्या भविष्याची चाहुल स्पष्टपणे दिसून येत होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रसंगी दहावीच्या वर्गशिक्षिका भारती तिवारी यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रवास उलगडून दाखवला. त्यांनी केलेल्या खोड्या, मिळवलेलं यश, याबद्दल माहिती देऊन तिवारी मॅम यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या भावना विद्यार्थांनी त्यांच्या मनातील साचलेल्या सर्व बाबींना वाट मोकळी करून दिली. यामध्ये कुणाल चव्हाण, अंजली बडगुजर, सम्राट हरपे, तेजस्वी गावित, नम्रता गरुड, विनय पाटील, देवांग धनगर, धनश्री महाजन, सिध्दीका शिरसाठ, आयुषकुमार सैनी आदींनी मनोगत व्यक्त करून भावनांना वाट मोकळी करून दिली. अनेकांना अश्रू अनावर झाले होते; काहींना शब्द सुचत नव्हते तर काहींनी एवढं प्रगल्भ भाषण केलं की एखाद्या तत्वज्ञानी व्यक्तीला देखील विचार करण्यास प्रवृत्त ठरेल. आपल्या मोठ्या भावांबद्दल भावना व्यक्त करतांना ८ वी च्या मेहुल कोठारी ला अश्रू अनावर झाले. त्याचबरोबर २०२० – २१ च्या बॅच मधून प्राजक्ता बाविस्कर, विधी गुप्ता, कल्याणी माळी, सनी चौटे यांनी मनोगत व्यक्त करतांना त्यांचे अनुभव सांगितले. बाहेरच्या जगात काहीच नाहीये जे काही आहे ते शाळेतच सर्व असतं असं सांगून निरोप समारंभ का महत्वाचा आहे याबद्दल मत मांडले. मार्गदर्शक शिक्षकांमधून प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित व मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी भावी आयुष्याच्या खडतर प्रवासासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. याचबरोबर जेष्ठ शिक्षिका अनुराधा भावे, सपना पाटील, सुनिता भालेराव, गायत्री सोनवणे, शिरीन खाटीक, अमोल श्रीमावळे, लक्ष्मणराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थांनी अभ्यास कसा करावा, परीक्षेचे नियोजन कसे असावे, स्पर्धेला सामोरे कसे जावे, यशस्वी व्यक्ती यापेक्षा एक चांगला माणूस कसा व्हावा याबाबत सखोल मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सर्वांनी अस्सल खान्देशी वरण बट्टीच्या जेवणाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजूका भदाणे, गायत्री सोनवणे, सुनिता भालेराव, पुष्पलता भदाणे, अमोल श्रीमावळे, लक्ष्मणराव पाटील हे शिक्षकवृंद तसेच इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख, वैशाली पाटील, शितल सोनवणे हे शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता ९ वी व ८ वी च्या विद्यार्थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नर्सरी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी – विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अतिशय बहारदार शैलीत सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भारती तिवारी यांनी केले.














