


(नागरिकांच्या समस्येसाठी दै. वृत्तपत्र वार्ताहर संघ उतरला मैदानात)
✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 10 जुलै):-रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाची झाल्याने शहर तसेच ग्रामिण भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याने दुचाकी चारचाकी वाहन धारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात खड्डे चुकवितांना अनेक अपघात होत आहेत.
या बाबत स्थानिक लोक प्रतिनीधी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक तक्रारी करून सुद्धा निद्रिस्थ प्रशासनाला जाग येत नसल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणांचा निषेध व्यक्त करीत दैनिक वृतपत्र वार्ताहर संघ (अधिकृत) उमरखेड तालुका या संघटनेने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खड्ड्यात बेशरमाची झाडे लाऊन निगरगठ्ठ प्रशासनाचा निषेध केला आहे.
उमरखेड शहरातील महागाव रोड, पुसद रोड, ढाणकी रोड तसेच उमरखेड – पोफाळी, मुळावा उमरखेड -हरदडा मार्गावरील रस्त्यांची अक्षरशः चाळण होऊन मोठ – मोठे खड्डे पडले आहेत.
दरवर्षी रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांच्या मंजूर झालेल्या निधीची थातूरमातूर कामे करून संबंधित बांधकाम विभागाकडून विल्हेवाट लावली जाते. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाचे सपशेल दुर्लक्ष असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
याचा निषेध म्हणून पत्रकार संघटनेने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावण्यात आली.
यावेळी दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष निलकंठ धोबे सचिव प्रा. लक्ष्मीकांत नंदनवार, कार्याध्यक्ष वसंतराव देशमुख , उपाध्यक्ष अंकुश पानपट्टे, कोषाध्यक्ष अजय कानडे , प्रसिद्धी प्रमुख शैलेश ताजवे यांच्यासह अरविंद, ओझलवार साहेबराव धात्रक , प्रशांत भागवत, अझरउल्लाखान, डॉ. विशाल माने, व्यंकटेश पेन्शनवार , अविनाश मुन्नरवार, सलमान खान, रवि भोयर, गजानन भारती, ताहेर मिर्झा अरुण बेले, सागर शेरे, डॉ. शिवचरण हिंगमिरे, संजय देशमुख आदिंची उपस्थिती होती.













