


अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी
गंगाखेड( प्रतिनिधी )राज्य शासनाकडून शहरविकासासाठी आलेला विकासनिधी कोणाची खाजगी प्रॉपर्टी नसून शासनाच्या विकासनिधीचा योग्य व पारदर्शक वापर होण्यासाठी नगर पालिकेच्या यापुढील प्रत्येक विकासकामांत आपण ई- टेंडरिंग स्पर्धा करणार असून आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या दहशतीखाली प्रशासक तथा मुख्याधिकारी तुकाराम कदम व आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या भ्रष्ट कारभाराविरोधात महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनआंदोलन छेडणार असल्याची घोषणा शनिवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवर्तन यात्रा प्रारंभप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आ. डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी केल्याने आमदार रत्नाकर गुट्टे विरुद्ध माजी आ.डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्यातील राजकीय संघर्षाच्या ‘अंक दुसरा’ सुरू झाल्याची राजकीय स्थिती शहरात निर्माण झाली आहे.
शनिवारी ईद व अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते ॲड.मिथिलेश केंद्रे यांचे संयोजनातून परिवर्तन यात्रेस प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने मिथलेश केंद्रे हे सलग तिसऱ्यांदा विकासाचा २२ कलमी वचननामा घेऊन शहरवासीयांच्या गाठीभेटीसाठी दारोदारी जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत माजी आ. डॉ.मुदसूदन केंद्रे बोलत होते. याप्रसंगी यात्रेचे संयोजक मिथिलेश केंद्रे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष श्रीकांत भोसले, तालुकाध्यक्ष माधवराव भोसले, माजी शहराध्यक्ष सय्यद अकबर, लिंबाजीराव देवकते, सुनील चौधरी, बालाजी शेटे, चंद्रकांत खंदारे, अजीज भाई, माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ लव्हाळे, नागनाथ कासले, डॉ.देविदास चव्हाण, अन्वर खान पठाण, महबूब दौला आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.केंद्रे म्हणाले की, सध्या पालिकेवर सव्वा वर्षापासून प्रशासकराज आहे. मात्र प्रशासक तथा मुख्याधिकारी तुकाराम कदम हे शासनाचे लोकांचे हित साधण्यापेक्षा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आ. गुट्टे यांची उघडपणे लाचारी करतात, आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पाठबळामुळेच प्रशासक तुकाराम कदम व आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून घनकचरा प्रकल्प व विकासकामांत लाखो रुपयांची खोटी बिले काढून पालिकेची अक्षरशः आर्थिक लूट होत असल्याचा जाहीर आरोप त्यांनी केला. राज्य सरकारकडून शहर विकासासाठी मिळालेला विकासनिधी हा आपली खासगी मालमत्ता असल्याचा आव आ. गुट्टे व त्यांचे कार्यकर्ते करीत असून पालिका प्रशासनाला हाताशी धरून स्वतःचे आर्थिक उघड पांढरे करून घेतल्याचा मनसुबा रचला जात आहे शासनाच्या निधीची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लागू नये म्हणून आपण नगरपालिकेमार्फत यापुढे प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक विकासकामांच्या ई- टेंडरिंग मध्ये पारदर्शकपणे स्पर्धा करणार असल्याची घोषणा यावेळी केली. महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागील सव्वा वर्षात पालिका प्रशासक काळात झालेली आर्थिक लूटीची चौकशी करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची घोषणाही यावेळी माजी आ. केंद्रे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते ॲड.मिथिलेश केंद्रे हे परिवर्तन यात्रेचा निमित्ताने तिसऱ्यांदा जनतेच्या दरबारात दारोदारी जाऊन आगामी नगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी शहरवासियांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वचननामा सादर करणार असल्याची यावेळी माहिती देण्यात आली












