


अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी
गंगाखेड (प्रतिनिधी) :- परभणी जिल्ह्यासह परिसरातील अनेक भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणारे धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पर्यटन व सांस्कृतिक विभागाने पहिल्या टप्प्यातील तब्बल १४,७९,९५,४८५ रूपये निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे कामास लवकर सुरूवात होणार असून त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निधी सुध्दा वर्ग केला जाणार आहे.
संबंधित निधीतून मंदिराचे सपाटीकरण त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पायाभरणी करणे, पुढे मंदिर व शिखराची पुर्नउभारणी करणे तसेच नदीकडील बाजूने संरक्षक व सिमाभिंत बांधकाम असे काम संचालक पुरात्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय यांच्या देखरेखीत करण्यात येणार आहे.
११ व्या शतकातील हेमडपंथी गुप्तेश्वर हे प्राचीन व ऐतिहासिक मंदिर आहे. हे भूमिज शैलीचे असून मुखमंडप, अर्धमंडप, अंतराल व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. शिखर हे विटांनी बांधलेले आहे, मंदिराच्या चोहोबाजूंनी सुंदर असे कोरीव काम आहे.
दरम्यान, गुप्तेश्वर मंदिराचा ऐतिहासिक वारसा जोपासला जावा, यासाठी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या खात्याकडे पत्रव्यवहार सुध्दा केला आहे. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सुध्दा मांडली होती. गेल्याच आठवड्यात पर्यटन व सांस्कृतिक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांची शिष्टमंडळासह भेट घेतली होती. परिणामी, निधी वर्ग झाला असून लवकरच काम सुरू होणार आहे. त्यामुळे भाविक-भक्तांमध्ये चैतन्य पसरले आहे.
तर मंदिरास गतवैभव प्राप्त होईल – आ.डॉ.गुट्टे
गुप्तेश्वर हे ऐतिहासिक मंदिर आहे. त्यामुळे त्याचा मूळ ढाचा लक्षात घेऊन जीर्णोद्धार केला जाईल. त्यामुळे मंदिरास गतवैभव प्राप्त होईल. मंदिर जीर्णोद्धारासाठी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन व सांस्कृतिक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे त्यांचे आभार मानतो, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी सांगितले.












