Home नागपूर पशुसंवर्धन दिनानिमित्त नागपुरात विशेष मोफत पशु आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पशुसंवर्धन दिनानिमित्त नागपुरात विशेष मोफत पशु आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

32

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.२०मे):-पशुसंवर्धन दिनानिमित्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, महाराज बाग नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष मोफत पशु आरोग्य शिबिरास लहान-मोठे पशुपालक तसेच पेट पॅरेंट्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पशुधनाचे आरोग्य, संवर्धन आणि पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुधनाचे महत्त्वपूर्ण योगदान असून दूध उत्पादन, शेतीपूरक व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीत पशुसंवर्धन क्षेत्राची भूमिका मोठी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. बदलत्या शहरी जीवनशैलीत पाळीव प्राण्यांचे वाढते महत्त्व लक्षात घेता त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी, नियमित लसीकरण आणि संतुलित आहाराची गरज असल्याचा संदेशही देण्यात आला.

        या विशेष शिबिरात सुमारे ११० लहान व मोठ्या जनावरांवर तसेच पाळीव श्वानांवर मोफत उपचार करण्यात आले. विविध आजारांची तपासणी, औषधोपचार, जंतनिर्मूलन, आरोग्य मार्गदर्शन तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती पशुपालकांना देण्यात आली. श्वानांसाठी मोफत अँटी रेबिज लसीकरण, डिवार्मिंग आणि इतर आवश्यक पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जनावरांमध्ये होणारे त्वचारोग, पचनसंस्थेचे विकार तसेच संसर्गजन्य आजारांबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. नियमित लसीकरण, जंतनिर्मूलन आणि संतुलित आहारामुळे गंभीर आजारांपासून संरक्षण मिळू शकते, असेही पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

       कार्यक्रमाला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नितीन फुके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी पशुपालक व पेट पॅरेंट्सशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुबोध नंदागवळी यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष पुढाकार घेत प्रभावी नियोजन केले. या उपक्रमात पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रीती शिरसाट, डॉ. जामकर, पशुधन पर्यवेक्षक राहुल चोपकर तसेच सहाय्यक पशुधन विकास अधिकारी प्रवीण कुंभारे यांनी सक्रिय सहभाग घेतला. पशुसंवर्धन विभागाच्या या सामाजिक उपक्रमामुळे प्राणी आरोग्याबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली असून नागरिकांकडून या उपक्रमाचे विशेष स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here