Home नागपूर माफसू संग्रहालय : ज्ञानाला स्पर्श देणारे जिवंत विद्यापीठ

माफसू संग्रहालय : ज्ञानाला स्पर्श देणारे जिवंत विद्यापीठ

68

आजच्या डिजिटल युगात माहितीचा अक्षरशः स्फोट झाला आहे. एका स्पर्शात जगभरातील माहिती उपलब्ध होते पण माहिती आणि ज्ञान यांतला मूलभूत फरक अनेकदा दुर्लक्षित राहतो. माहिती वाचता येते, पाठ करता येते पण ज्ञान समजून घ्यावे लागते, अनुभवावे लागते. म्हणूनच पुस्तकातील अक्षरांना प्रत्यक्ष वास्तवाचा स्पर्श देणारी ठिकाणे समाजाच्या बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरतात. अशा ठिकाणांमध्ये नागपूरातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) येथील संग्रहालय विशेष उठून दिसते. संग्रहालय म्हणजे विज्ञानाची तीर्थक्षेत्रे. शेतकरी, पशुपालक, विद्यार्थी आणि सामान्य जनतेच्या हितार्थ माफसूच्या 23 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत 3 डिसेंबर 2023 रोजी सेमीनेरी हिल्स येथील विद्यापीठ ग्रंथालय परिसरात उभारण्यात आलेले विद्यापीठाचे संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले. हे संग्रहालय केवळ प्रदर्शनाचे दालन नाही तर ते ज्ञान, संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे जिवंत केंद्र आहे. शेतकरी, पशुपालक, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी ते माहितीचे समृद्ध भांडार आहे तर शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान युगातील आधुनिक तीर्थक्षेत्रच म्हणावे लागेल.

 प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान अधिक सखोल होते, कुतूहल जागते आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित होते—या भावनेतून उभारलेले हे संग्रहालय सांघिक प्रयत्न, शैक्षणिक दृष्टी आणि समाजाभिमुख विचार यांचा सुंदर मिलाफ आहे. आपल्या शिक्षणपद्धतीत अजूनही पाठांतराला मोठे स्थान आहे. विद्यार्थी पुस्तकांतून शरीररचना, रोगरचना, मत्स्यप्रजाती आणि पशुपालन तंत्रज्ञान यांविषयी वाचतात; पण तेच ज्ञान प्रत्यक्ष नमुन्यांच्या रूपात समोर आले की अभ्यासाला नवे परिमाण मिळते. वर्गात शिक्षकांनी स्पष्ट केलेली संकल्पना जेव्हा संग्रहालयातील संरक्षित नमुन्यांतून उलगडते, तेव्हा ज्ञान केवळ माहिती राहत नाही—ते अनुभव बनते. माफसू अंतर्गत पशुवैद्यकीय, दुग्धतंत्रज्ञान आणि मत्स्यविज्ञान या विद्याशाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. या तिन्ही शाखांची माहिती आकर्षक माहितीफलक, प्रारूप प्रतिकृती, नमुने आणि पुतळ्यांच्या माध्यमातून स्वतंत्र दालनांत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील रेखाचित्रांना प्रत्यक्ष आकार मिळतो आणि अभ्यास अधिक सजीव बनतो.

 माफसू संग्रहालयाचे हेच वेगळेपण आहे. येथे पशुवैद्यकशास्त्राशी संबंधित सांगाडे, विविध प्राण्यांच्या शरीररचनेचे नमुने, रोगग्रस्त अवयवांची उदाहरणे, तसेच मत्स्यविज्ञानातील विविध प्रजातींचे जतन केलेले नमुने पाहता येतात. टॅक्सीडर्मी, वन्यजीव संवर्धन आणि प्रेक्षागृह हे विभाग विशेष प्रेक्षणीय आहेत. वन्यजीवांचे जतन केलेले नमुने, जैवविविधतेची माहिती आणि संवर्धनाचा संदेश यामुळे संग्रहालयाची शैक्षणिक व्याप्ती आणखी विस्तारते. विदर्भ आणि मराठवाडा या भागांत शेतीपूरक दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा दुग्धव्यवसाय हा सक्षम पर्याय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर अधिक दूध देणाऱ्या आणि सुदृढ पशुधनासाठी आवश्यक पूरक तंत्रज्ञान पशुपालकांपर्यंत पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

 माफसूने पोल्ट्री, डेअरी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील विविध घटकांसाठी अनेक प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. विशेषतः आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) तंत्रज्ञान पशुधनाच्या गुणवत्तावाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार होणे काळाची गरज आहे. त्यासाठी केवळ विद्यापीठ नव्हे, तर शेतकरी, पशुपालक, संशोधक आणि विस्तार यंत्रणा यांनीही सांघिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. माफसू अंतर्गत कार्यरत असलेली कृषि विज्ञान केंद्रे या कामात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आयव्हीएफसह इतर विकसित तंत्रज्ञानाचा प्रसार अधिक प्रभावीपणे व्हावा, यासाठी हे संग्रहालय एक सक्षम ज्ञानदालन म्हणून कार्य करू शकते.

 आज शिक्षणक्षेत्रात ‘अनुभवाधारित शिक्षण’ हा शब्द वारंवार उच्चारला जातो. त्याचा खरा अर्थ अशा संग्रहालयांतच उमजतो. एखाद्या प्राण्याच्या हाडांची रचना, अंतर्गत अवयवांची मांडणी किंवा रोगामुळे झालेला बदल प्रत्यक्ष पाहताना विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती विकसित होते. वैज्ञानिक दृष्टिकोन दृढ होतो. प्रश्न पडतात. आणि जिथे प्रश्न निर्माण होतात, तिथूनच संशोधनाची सुरुवात होते. मत्स्यविज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठीही हे संग्रहालय तितकेच उपयुक्त आहे. विविध माशांच्या जाती, त्यांची वैशिष्ट्ये, शरीररचना, पर्यावरणातील त्यांची भूमिका आणि आर्थिक उपयोग या गोष्टी प्रत्यक्ष नमुन्यांमुळे अधिक स्पष्ट होतात. केवळ शैक्षणिक अभ्यासापुरतेच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही या ज्ञानाचे महत्त्व मोठे आहे.

 महाराष्ट्र सारख्या कृषिप्रधान राज्यात पशुधन आणि मत्स्यसंपदा ही केवळ उत्पादनाची साधने नाहीत; ती ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेची आधाररचना आहेत. अशा वेळी या क्षेत्रांशी संबंधित ज्ञान लोकाभिमुख करणे ही काळाची गरज आहे. विद्यापीठातील हे संग्रहालय त्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल म्हणावे लागेल. या संग्रहालयाचे महत्त्व केवळ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नाही. शेतकरी, पशुपालक, संशोधक, प्रशिक्षणार्थी आणि सामान्य नागरिक यांनाही येथे विज्ञानाशी थेट परिचय होऊ शकतो. पशुरोगांविषयी जागरूकता, जैवविविधतेची ओळख, संवर्धनाचे महत्त्व आणि वैज्ञानिक पद्धतींची आवश्यकता यांची जाणीव अशा ठिकाणी अधिक प्रभावीपणे घडते. दुर्दैवाने, आपल्या समाजात संग्रहालयांकडे अजूनही ‘एकदा पाहण्याची जागा’ म्हणून पाहिले जाते. शाळा-कॉलेजच्या सहलींच्या कार्यक्रमापुरतेच त्यांचे महत्त्व मर्यादित राहते. ही दृष्टी बदलण्याची गरज आहे. संग्रहालय हे स्थिर प्रदर्शन नसते; ते सतत शिकवणारे, विचार करायला भाग पाडणारे आणि कुतूहल जिवंत ठेवणारे केंद्र असते. नागपूर शहरात आधीच केंद्रीय संग्रहालय, मानववंशशास्त्रीय संग्रहालय, रेल संग्रहालय आणि रमण विज्ञान केद्र यांसारखी नामांकित संग्रहालये आहेत. त्या परंपरेत माफसूचे हे संग्रहालय निश्चितच नवी भर घालणारे ठरले आहे.

 आज जगभरातील नामांकित विद्यापीठे संग्रहालयांचा वापर शिक्षणाच्या केंद्रस्थानी करत आहेत. विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणे नव्हे, तर त्यांना विचार करायला शिकवणे हा त्यामागील हेतू असतो. भारतातही ही संकल्पना अधिक व्यापक व्हायला हवी. माफसूचे संग्रहालय या दिशेने आशादायी उदाहरण आहे. ज्ञानाचा खरा अर्थ केवळ माहिती मिळवण्यात नसतो तर त्या माहितीमागील वास्तव समजून घेण्यात असतो. संग्रहालय हे त्या वास्तवाशी थेट भेट घडवते. सांगाड्यांमधून उत्क्रांतीची कथा समजते, जतन केलेल्या नमुन्यांतून रोगशास्त्राचे धडे मिळतात, तर मत्स्यनमुने जैवविविधतेचा व्यापक पट उलगडतात. आज विज्ञानाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी अधिक व्यवहार्य आणि लोकाभिमुख होणे आवश्यक आहे. विज्ञान प्रयोगशाळांपुरते मर्यादित राहिले तर त्याचा सामाजिक उपयोगही मर्यादित राहतो. पण जेव्हा ते संग्रहालयाच्या रूपाने सर्वांसाठी खुले होते, तेव्हा ते समाजाच्या बौद्धिक प्रगतीचे प्रभावी साधन बनते. म्हणूनच माफसूचे हे संग्रहालय केवळ विद्यापीठाची सुविधा नाही तर ती ज्ञानाच्या सार्वजनिक संस्कृतीची पायाभरणी आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला दिशा देणारे, संशोधकांच्या कुतूहलाला चालना देणारे आणि समाजाला विज्ञानाशी जोडणारे हे केंद्र अधिक सक्षम, अधिक समृद्ध आणि अधिक लोकाभिमुख व्हायला हवे.

 कारण अखेरीस, संग्रहालयात ठेवलेला प्रत्येक नमुना हा फक्त एक वस्तू नसतो—तो अनुभव असतो, इतिहास असतो, संशोधन असते आणि भविष्यातील ज्ञानाचा पाया असतो. नागपूरच्या शैक्षणिक नकाशावर हे संग्रहालय म्हणूनच विशेष अधोरेखित व्हावे, हीच अपेक्षा. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या निमित्ताने ज्ञान, संशोधन आणि संस्कृतीची जपणूक करणाऱ्या सर्व संग्रहालयांना मनःपूर्वक शुभेच्छा. संग्रहालये अशीच विचारांना चालना देत राहोत आणि भावी पिढ्यांना ज्ञानाचा जिवंत वारसा देत राहोत, हीच सदिच्छा.

✒️प्रविण बागडे(नागपूर)मो:-9923620919

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here