


✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड(दि.16फेब्रुवारी):- “बौद्धिक हक्क संपदा मिळवणे आज भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. भारत विकसित होण्यासाठी घोडदौड करीत असताना केवळ उद्योग व्यवसाय वाढवून विकसित होऊ शकत नाही; तर विकसित देशाबरोबर सर्व क्षेत्रात प्रगतिशील राहणे आवश्यक आहे. आज चीन आणि अमेरिका या विकसित देशाकडे औद्योगिक क्रांती सोबत पेटंटची संख्या खूप मोठी असल्यामुळे ती राष्ट्रे श्रीमंत झाली आहेत. आज रोजी चीनकडे 17 लाख पेटंट रजिस्टर केली आहेत तर अमेरिकेकडे सहा लाख पेटंट रजिस्टर आहेत. भारताकडे मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात अगदीच कमी केवळ सुमारे दोन लाख पेटंट रजिस्टर आहेत. या पेटंटची संख्या वाढवणे आवश्यक आहे.
बौद्धिक हक्क संपदा यामध्ये कॉपीराइड, ट्रेडमार्क, जिओ टॅग, इंडस्ट्रियल डिझाईन, पेटंट इत्यादींचा समावेश होतो. आपल्या नवनिर्मितीची किंवा कोणत्याही डिझाईनचे आपण पेटंट घेऊ शकतो. पेटंट रजिस्टर झाल्यावर त्यावर आपला स्वामित्व हक्क असतो. आपल्या परवानगीशिवाय त्याचा वापर कोणालाही करता येऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी सजग होऊन आपली संशोधन वृत्ती जागृत केली पाहिजे आणि जगासोबत स्पर्धा करण्यासाठी या बौद्धिक हक्क चळवळीमध्ये सामील झाले पाहिजे.”असे प्रतिपादन डॉ. विनायक राऊत यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे मराठी विभाग आयोजित अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत ‘बौद्धिक हक्क संपदा’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेत साधनव्यक्ती म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) आर. आर. जाधव होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. आर. आर. जाधव म्हणाले, ‘ज्या देशात संशोधन अधिक त्या देशाची अधिकगतीने प्रगती होते. संशोधनाला वयाचे बंधन नाही. त्यामुळे आपण कोणत्याही वयात संशोधन करू शकतो. विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती जागृत केली पाहिजे. अधिकाधिक पेटंट मिळविण्यासाठी अहोरात्र काम केले पाहिजे. तरच त्यांच्याकडे जगाचे लक्ष जाईल यातूनच व्यवसाय आणि नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. आपल्या देशामध्ये शेती, खनिज संपत्ती, उद्योग यामध्ये संशोधनाला खूप वाव आहे. वाळवा तालुक्यातील एका शेतकऱ्याने जवळपास 80 पेटंट घेतली आहेत. बौद्धिक हक्क संपदा म्हणजे काय? याचा अभ्यास करून आपल्या करिअरच्या दिशा निश्चित करणे गरजेचे आहे.”
या कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. संतोष बोंगाळे यांनी केले, तर आभार प्रा. वसीम आंबेकरी यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. प्रदीप चोपडे यांनी केले. यावेळी अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.














