Home चंद्रपूर चंद्रपूर महापौर पदाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी कोण घेणार?-बापू धोटे यांचा संतप्त सवाल

चंद्रपूर महापौर पदाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी कोण घेणार?-बापू धोटे यांचा संतप्त सवाल

109

✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

राजुरा(दि.11फेब्रुवारी):-मागील कित्येक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पराभवाच्या खाईत लोटला असतानाच नगर परिषद व महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले. दरम्यान चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून भाजपला धोबीपछाड दिली. मात्र महापौर पदाच्या निवडणुकीत जबाबदार काँग्रेसी नेत्यांच्या अहंकारी व हेव्या दाव्या प्रवृत्तीमुळे पक्षाला सत्तेपासून मुकावे लागले आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी जबाबदार नेते स्वीकारणार काय ? असा खडा सवाल पक्षाचे माजी महासचिव बापू धोटे यांनी उपस्थित केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता प्राप्त करीत जिल्हा काँग्रेसमय केला आहे. मात्र पक्षाला चंद्रपूर महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले नाही. पण मतदारांनी कौल देत पक्षाला सर्वाधिक जागा जिंकता आल्या. पक्षाला सत्तेसाठी फक्त तीन नगरसेवकांनी गरज होती. त्यातच महाविकास आघाडीतील उबाठा गटाचे सहा जागा जिंकल्या आहे. त्यामुळे पक्षाचा महापौर होणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र पक्षातील जबाबदार नेत्यांच्या अहंकारामुळे पक्षाला तोंडघशी पडावे लागले आहे. मीपणा व हेव्यादाव्यामुळे नगरसेवकांची पळवापळवी करण्यात आली. त्यानंतर दोन नेत्यांनी वेगवेगळे गटाची नोंदणी केली.यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक केली.

या नेत्यांचे मनोमिलन व्हावे यासाठी मुंबई नंतर दिल्ली मध्ये बैठका झाल्या. तरी पण या नेत्यांवर अहंकार भारी पडला व हातात आलेली सत्ता दूर गेली. महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव हा मतदारांचा अपमान आहे. त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाला मतदान केले.पण नेत्यांचा स्वार्थ व मोठेपणा दाखविण्यात वेळ खर्ची घालविला. त्यांच्या याच अहंकार स्वभावगुणामुळे पक्षाची हानी झाली आहे.

मतदारांनी पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी कौल दिला असताना महापौर पदाच्या निवडणुकीत मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता या पुढे मतदारांनी पक्षाला का म्हणून मतदान करावे असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सोबतच या पराभवाची नैतिक जबाबदारी कोण स्वीकारणार असे म्हणत बापू धोटे , काँग्रेस पक्षाचे माजी महासचिव यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here