


▪️महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
▪️कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा येथे कार्यक्रम संपन्न
✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
वर्धा(दि.8डिसेंबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे नवनवोन्मेषशाली प्रज्ञा. त्यांच्या ग्रंथामधून जगणाऱ्या या प्रज्ञेला आता दिवसेंदिवस नवनवी पालवी येत आहे. ही पालवी उजेडाची आहे. दिवसेंदिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा होणारा गौरव आणि त्यांच्याबद्दल होणारे वर्णन या वर्णनात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मावतच नाहीत. याचा अर्थ असा की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्धिक व्यक्तिमत्व सतत उंच उंच होत राहणार आहे. गौरवाच्या आणि वर्णनाच्या चौकटी सतत ओलांडून जाणारे ते एक अजिंक्य आणि गतिमान व्यक्तिमत्व आहे. आज या कायम सर्जनशील आणि कायम विकसनशील प्रज्ञावंतला आपण अभिवादन करीत आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी युग वाकवले. त्यांनी इतिहासाचा प्रवाह आणि त्या प्रवाहाची दिशा बदलली. त्यांनी नवा इतिहास घडविला आणि त्या इतिहासाची नवी भीमसूत्रे दिली. अन्यायाविरुद्ध कायम युद्धात राहण्याचा सुंदर ध्यास दिला. बाबासाहेब म्हणजे बुद्धिवादी समतेसाठी त्यांनी सुरू केलेले महायुद्ध! या महायुद्धाला आपण विनम्र अभिवादन करत आहोत.असे मत डॉ. पूनम येसंबरे यांनी व्यक्त केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विशिष्ट चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी या देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त, स्त्रिया, शोषित वंचित, पीडीत, अल्पसंख्यांक या सर्व समुदायासाठी, त्यांच्या कल्याणसाठी कार्य केले. महिलांच्या स्वाभिमानासाठी, त्यांच्या विकासासाठी महतप्रयासाने तयार केलेले हिंदू कोडं बिल तत्कालीन संसदेमध्ये पारीत न झाल्यामुळे आणि ओबीसी च्या कल्याणच्या तरतुदीना विरोध झाल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिल्याचे मत डॉ. नरेश पाटील यांनी मत व्यक्त केले.
कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा येथे आज भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रज्वल जामगडे याने केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंदू पोपटकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संचालक राजेशजी कुंभलकर, महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. पूनम येसंबरे, तसेच विचारमंचावर प्रा. डॉ. नरेश पाटील आणि महाविद्यालयाचे अकॅडमिक कोऑर्डिनेटर प्रा. डॉ. सुनील तोतडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान प्रा. डॉ. नरेश पाटील यांनी बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देणारे भावपूर्ण गीत सादर केले, ज्यामुळे सभागृहात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. यानंतर डॉ. पूनम येसंबरे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी कार्याची सखोल मांडणी करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांचा अभ्यास करून समाजहिताचे कार्य करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर प्राचार्य डॉ. पोपटकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांनी केवळ बाबासाहेबांच्या राष्ट्रनिर्मितीतल्या भूमिकेचा उहापोह केला नाही, तर त्यांच्या विचारांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुसंगतीही स्पष्ट केली. डॉ. चंदू पोपटकर यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेले सामाजिक न्याय, समानता, शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण आणि मानवअधिकार यांसारखे मूलभूत तत्त्वे United Nations यांनी स्वीकारलेल्या Sustainable Development Goals (SDGs) शी प्रत्यक्षपणे जोडून दाखवली.
त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की बाबासाहेबांचे विचार आजही जागतिक विकास, मानवी प्रतिष्ठा आणि टिकाऊ समाजनिर्मितीचे आधारस्तंभ मानले जात असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय, बंधुता आणि मानवी हक्कांचा संदेश कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी अकॅडमिक कोऑर्डिनेटर सुनील तोतडे सर यांनी सर्व मान्यवरांचे, विद्यार्थ्यांचे आणि आयोजकांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.














