Home चंद्रपूर शरदराव पवार महाविद्यालयात प्राचार्य सभा व चर्चासत्राचे यशस्वी आयोजन

शरदराव पवार महाविद्यालयात प्राचार्य सभा व चर्चासत्राचे यशस्वी आयोजन

152

▪️उच्च शिक्षण विकासात प्राचार्याची भूमिका महत्त्वाची – आमदार सुधाकर अडबाले

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428)

राजुरा(दि.१३ऑक्टोबर):- उच्च शिक्षणाचे संबंधित विविध घटकांमध्ये संपर्क आणि संवाद साधण्याची महत्त्वपूर्ण भूमिका महाविद्यालयाच्या प्राचार्याची असते. प्राचार्य हे संस्था, विद्यापीठ व प्रशासनातील महत्त्वाचा दुवा आहे मात्र अलीकडल्या काळामध्ये शासनाच्या विविध धोरणामुळे प्राचार्यांना अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या असून या अडचणी सोडवण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन चर्चासत्राचे उद्घाटक आमदार सुधाकर अडबाले यांनी केले. 

गोंडवाना विद्यापीठ प्राचार्य फोरम आणि शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर यांचे संयुक्त विद्यमाने प्राचार्य सभा व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ. प्रमोद काटकर, फोरमचे सचिव डॉ. लालसिंग खालसा, प्राचार्य राजाभाऊ मुनघाटे, फोरमचे उपाध्यक्ष डॉ.एस.एन. बुटे, फोरमचे सहसचिव डॉ. संभाजी वरकड संयोजन सचिव व फोरम चे सहसचिव डॉ. संजय कुमार सिंह या प्रसंगी उपस्थित होते. सुरुवातीला आमदार सुधाकर अडबाले यांचा मानपत्र देऊन तर प्रमुख अतिथींचा शाल श्रीफळ व बांबू शिल्प व दुपट्टा देऊन महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

   यावेळी प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांनी प्रशासनातील विविध अडचणी विशद केल्या. महाविद्यालयातील रिक्त पद भरणे, प्राध्यापकांचे वर्कलोड, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती , विद्यार्थ्यांची गळती संख्या, नवीन शैक्षणिक धोरणामधील अडचणी इत्यादी विषयावर त्यांनी प्रकाश टाकला यावेळी प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ.प्रमोद काटकर यांनी प्राचार्य फोरमच्या विविध कार्याची माहिती विशद करून उच्च शिक्षण व शासनाचे धोरण यासंबंधी विविध समस्या बाबत आमदार महोदयांना अवगत केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाले यांनी संस्थाचालकांची भूमिका विशद करून प्रशासनाला संस्थेच्या वतीने सहकार्य असल्याचे नमूद केले. यावेळी गोंडवाना विद्यापीठ परीक्षेत्रातील सेवानिवृत्त प्राचार्य तसेच नवनियुक्त प्राचार्य यांचा प्राचार्य फोरमच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.दुसऱ्या सत्रात प्राचार्य फोरमच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या सत्रात प्राचार्याच्या विविध समस्यांवर विविधांगी चर्चा होऊन निराकरण करण्यात आले. सुरुवातीला मान्यवर पाहुण्यांचे स्वागत महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत व स्वागत गीताने करण्यात आले.

या प्राचार्य सभा व चर्चा सत्राचे संचालन समन्वयक डॉ. संजय गोरे यांनी केले तर आभार गो.बा.महाविद्यालयाचे प्राचार्य संजय सिंह यांनी केले. आमदार महोदय यांच्या मानपत्राचे वाचन डॉ.शरद बेलोरकर यांनी केले यावेळी सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक मंडळ तसेच गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील प्राचार्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्ट्राटेक सिमेंट माणिकगड वर्क्स आणि शरदराव पवार महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here