


✒️विशेष प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.11ऑक्टोबर):-अंतर महाविद्यालय सेंट्रल झोन बॉक्सिंग स्पर्धेमध्ये शहरातील श्री संत जनाबाई कला वाणिज्य व विज्ञान तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजय प्राप्त केला आहे.पहिल्याच प्रयत्नात जनाबाई महाविद्यालयाचे बॉक्सर्स विजयी रिंगमध्ये झळकले,सेंट्रल झोन बॉक्सिंग स्पर्धेत पहिल्याच सहभागात इतिहास रचला आहे.
दिनांक 10 ऑक्टोबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी आयोजित जिल्हा क्रीडा कार्यालय लातूर येथे झालेल्या या स्पर्धेत जनाबाई महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षक प्रा.चैतन्य पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी करत विजयी ठरले.स्पर्धेत बी.कॉम प्रथम वर्षाचा गोविंद गेजगे (55 किलो वजनी गट)आणि बी.एससी. प्रथम वर्षाचा विजय बालास्कर (60 किलो वजनी गट) यांनी दमदार खेळ करत ब्रॉंझ मेडल मिळवले.तर बी.ए. द्वितीय वर्षातील प्रताप भावे यानेही 60 किलो वजनी गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकावून महाविद्यालयाचे नाव झळकवले.
या स्पर्धेत शहीद भगतसिंग महाविद्यालयाचे प्रा.चव्हाण,प्रा.डॉ.गोमसाळे, बॉक्सिंग पंच विष्णू खडके,नांदेड येथील बॉक्सिंग कोच नागराज चावरे,परभणी जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव धनंजय बनसोडे उपस्थित होते.त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि प्रशिक्षक प्रा.पाळवदे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आत्माराम टेंगसे,सचिव अॅड.संतोष मुंडे, प्राचार्य डॉ.बी.एम.धूत,उपप्राचार्य व क्रीडा संचालक डॉ.चंद्रकांत सातपुते, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संतोष गायकवाड,अधीक्षक भारत हत्तींअबीरे तसेच प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने विजेत्या खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.














