


सध्या अमेरिकेला पाकिस्तान प्रेमाचा भलताच उमाळा आहे. पाकिस्तान हा दहशतवाद पसरवणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असून पाकिस्तान हीच दहशतवादाची फॅक्टरी आहे हे माहीत असूनही अमेरिका पाकिस्तानसाठी पायघड्या घालत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे तर पाकिस्तान प्रेम उतू चालले आहे. पाकिस्तान आपल्यासाठी खास देश आहे असे वक्तव्य त्यांनी नुकतेच केले आहे इतकेच नाही तर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांनी यांना त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये खास निमंत्रण देऊन त्यांच्यासोबत जेवण करत त्यांची सरबराई केली. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एखाद्या देशाच्या लष्करप्रमुखाला बोलावून त्याचा इतका मोठा सन्मान केला आहे. व्हाइट हाऊसमध्ये देशाचे प्रतिनिधी म्हणून देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा मंत्र्यांना निमंत्रित केले जाते. पाकिस्तानचे जनरल जिया – उल – हक, जनरल आयुब खान आणि जनरल परवेज मुशर्रफ यांना व्हाईट हाऊसने निमंत्रण दिले होते पण ते पाकिस्तानचे लष्करप्रमुख म्हणून नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या भेटीत या दोघांत विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चेनंतर ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्ध आपणच थांबवल्याचा पुनरुच्चार केला. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिफ मुनीर यांनी भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याबद्दल ट्रम्प यांचे आभार मानून भारत पाकिस्तान युद्ध थांबल्याबद्दल ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी केली. हे सर्व अचंबित करणारे आहे. ज्या पाकिस्तानमुळे जगात दहशतवाद पसरत आहे त्याच पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला ट्रम्प बोलावतात त्यांच्यासोबत जेवण करतात. हा ट्रम्प यांचा दुटप्पीपणाच आहे. दहशतवादा विरोधातील लढाईत अमेरिकेचे धोरण किती संधीसाधू आणि स्वार्थी आहे हेच यातून दिसून येते. जनरल आसिफ मुनीर यांना भेटून ट्रम्प काय साध्य करू इच्छितात? ज्या पाकिस्तानला भारत क्रमांक एकचा शत्रू मानतो त्या पाकिस्तानला जवळ करण्यामागे ट्रम्प यांचा उद्देश काय ? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचे उत्तर इराण इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या युद्धात मिळेल. मागील आठवड्यात इस्राईलने इराणच्या आण्विक केंद्रावर हल्ला केला. याला प्रतिउत्तर म्हणून इराणनेही इस्राईलवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही देशांचे शेकडो नागरिक आणि सैनिक मरण पावले. हा संघर्ष अजूनही चालू आहे. या युद्धाआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते आयातुला खोमेनी यांना अमेरिकेशी आण्विक करार करण्याची गळ घातली मात्र खोमेनी यांनी ती स्पष्टपणे नाकारली. जर तुम्ही आमचे ऐकणार नसाल तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल अशी धमकीच ट्रम्प यांनी तेंव्हा खोमेनी यांना दिली होती. त्यानंतर काही दिवसातच इस्राईलने इराणवर हल्ला केला याचाच अर्थ अमेरिकेच्या चिथावणीवरूनच इस्राईलने हा हल्ला केला. एकीकडे भारत पाकिस्तान युद्ध मी थांबवले असा डंका पिटत स्वतःला नोबेल पुरस्कार देण्याची मागणी करायची दुसरीकडे इस्राईल आणि इराणमध्ये युद्ध पेटवून द्यायचे. ट्रम्प यांचा हा कुटील डाव आता जगाच्या समोर आला आहे. इस्राईलने इराणवर हल्ला करूनही इराण आपले ऐकत नाही हे लक्षात आल्यावर ट्रम्प यांनी या युद्धात इस्रायलच्या बाजूने उतरण्याची धमकी दिली. या धमकीलाही इराणने जुमानले नाही त्यामुळे ट्रम्प तात्यांचा तिळपापड झाला आणि अखेर रविवारी अमेरिकेने या युद्धात प्रत्यक्ष भाग घेत इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर संपूर्ण जगभर खळबळ माजली असून अमेरिकेने या युद्धात प्रवेश करणे ही तिसऱ्या युद्धाची नांदी ठरू शकते असे जाणकार म्हणत आहेत. कारण या हल्ल्यानंतर इराणला अनेक देशांनी पाठिंबा दिला असून अमेरिकेचा निषेध केला आहे. या हल्ल्यानंतर इराणने रशियाशी संधान बांधले असून रशियाने इराणला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेने पुन्हा इराणवर हल्ला केला तर रशिया इराणच्या बाजूने युद्धात उतरेल असे आश्वासन इराणला रशियाने दिले आहे. जर रशिया या युद्धात उतरलाच तर तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटेल. अशा अवस्थेत अमेरिकेला आशिया खंडात स्वतःचा हक्काचा लष्करी तळ हवा आहे आणि पाकिस्तान हा त्यासाठी सर्वात सोईस्कर आणि योग्य देश आहे अशी त्यांची धारणा आहे. भविष्यात इराण आणि रशिया विरुद्ध लढ्यासाठी पाकिस्तानची भूमी वापरता यावी यासाठीच ट्रम्प यांची ही खेळी आहे. पाकिस्तानला चुचकारण्यामागे ट्रम्प यांचा हाच उद्देश आहे. अर्थात पाकिस्तानच्या हे लक्षात न येण्याइतका पाकिस्तान दुधखुळा नाही. पाकिस्तानला हे माहीत असूनही पाकिस्तान ट्रम्प यांच्या जाळ्यात अडकतोय कारण त्यात त्यांचाही स्वार्थ आहे. भविष्यात जर भारताने ऑपरेशन सिंदूर सारखी कारवाई केली तर अमेरिकेने पाकिस्तानची बाजू घ्यावी असे त्यांना वाटते म्हणजेच या भेटीमागे अमेरिका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा स्वार्थ आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी हे दोन्ही देश जगाला युद्धाच्या खाईत लोटत आहेत म्हणूनच या दोन्ही स्वार्थी देशांविरुद्ध जगाने एक होण्याची गरज आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५














