


आज निवडणूका होतात आणि निकाल लागतात. पण हे निकाल अनेकांसाठी धक्कादायक असतात. अनेकांना वाटतं अरे? देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे, महागाई-बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे, देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे, सर्वसामान्यांच्या खिशातून जागा मिळेल तिथून पैसा काढणे सुरु आहे. आजूबाजूच्या देशांसोबत संबंध बिघडत चालले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे हे सर्व दिसत असताना लोक पुन्हा त्याच सरकारला निवडून कसे देतात? माझ्यामते याचे विरोधी पक्षाच्या निष्क्रियता, कष्ट घेण्याची नसलेली तयारी अशा अनेक कारणांपैकी सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आजची प्रसारमाध्यमे. कारण ही प्रसारमाध्यमे देशाची खरी परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचूच देत नाहीत. देशात जे काही घडते त्याला जरी शासन-प्रशासन जबाबदार असते परंतु जे घडतंय ते तसंच्या तसं जनतेसमोर आणणं ही माध्यमांची जबाबदारी आहे. ते जनतेसमोर आल्यावर जनता ते चांगलं की वाईट हे ठरवत असते. पण आज तसं होताना दिसत नाही.
२०१४ च्या आधीची टीव्ही चॅनल्स आणि पत्रकारिता आठवून बघा. २०१४ च्या अगोदर डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना आरएसएस आणि भाजप प्रणित सर्वच कट्टरवादी संघटनांनी देशातील तत्कालीन काँग्रेस सरकार हे देशाला विकून टाकत आहे, प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचार करत आहे, महागाई आणि बेरोजगारीने देश बेजार झालाय असे चित्र निर्माण करत आंदोलने केली. हा जणू देशाचा दुसरा स्वातंत्र्यलढाच आहे अशा थाटात दिल्लीतील जंतरमंतर येथे अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे नियोजन केले. टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळ्याला हायलाईट केलं गेलं. त्यावेळच्या माध्यमांनी हे प्रकरण प्रचंड उचलून धरलं. घरघुती गॅस सिलिंडर ४५० रुपये आणि पेट्रोल ६५ रुपये लिटर असताना प्रत्येक न्यूज चॅनलवर याविषयी डिबेट रंगवल्या जात होत्या. देशात बेरोजगारी किती वाढली आहे? रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत किती कमी झाली आहे? याबद्दल विरोधकांच्या आंदोलनांना माध्यमे प्रचंड प्रसिद्धी देत होती. जणूकाही हे काँग्रेस सरकार काही वर्ष देशात राहिले तर हा देशच संपून जाईल या अविर्भावात हे सर्व सुरु होतं.
साहजिकच सर्वसामान्य जनता ह्या प्रचाराला भुलली आणि तेव्हाच्या परिस्थितीपेक्षा अच्छे दिन येतील या आशेवर भाजपला मतदान केलं. भाजप सत्तेत आली परंतु झालं उलटच. ज्या महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेच्या नावाने बोंबा मारत हे सरकार सत्तेत आलं, त्या सर्व मुद्द्यांनी आता ऐतिहासिक उच्चांक गाठलाय. आणि ज्या टू जी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळ्याबद्दल रान माजविण्यात आलं होतं ते घोटाळेच झाले नाहीत असे सांगून त्यांना क्लीनचिट दिली गेली. घरघुती गॅस सिलिंडर १००० रुपये झालं, पेट्रोल १०६ रुपये लिटर झालं, डॉलरच्या तुलनेत रुपयाने सर्वात नीचांकी पातळी गाठली आणि जे टू जी स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळ्याच्या नावाने जे भाजपवाले बोंबा मारत होते, ते आज ५८ हजार कोटींचा राफेल विमान खरेदी घोटाळा, पेगसीस प्रकरण, नोटबंदी घोटाळा, २२ हजार कोटींचा एबीजी शिपयार्ड कंपनीचा घोटाळा, मोदींच्या कार्यकाळात देशात झालेले तब्बल ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांचे बँक घोटाळे यावर मात्र गप्प आहेत. यावर प्रसारमाध्यमे काहीच बोलत नाहीत. या विषयांवर सत्ताधारी मंत्र्यांना धारेवर धरत नाहीत. या विषयांवर आपल्या न्यूज चॅनल्स वर एकही डिबेट आयोजित करत नाहीत. का? तर जे स्वातंत्र्य माध्यमांना २०१४ च्या आधी होतं ते आता अजिबात राहिलेलं नाही. न्यूज चॅनल्स ची हिम्मत नाही की कुण्या भाजपच्या मंत्र्याला प्रश्न करेल. देशाचा पंतप्रधान गेल्या १० वर्षात एकही जाहीर पत्रकार परिषद घेत नाही यावर एकही न्यूज चॅनल चकार शब्द काढत नाही? यापेक्षा लाचार पत्रकारिता आणखी काय असू शकेल? १००% सर्वच पत्रकार असे नाहीत, काही २% -३% पत्रकार प्रामाणिक आहेतही पण त्यांना ह्या सरकारने कुठचंच ठेवलेलं नाही. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना नोकरीवरून काढून टाकलं जातं. काहींची न्यूज चॅनल्स विकतच घेऊन टाकली जातात. काही मीडिया हाऊसच्या मालकांना डायरेक्ट राज्यसभेवर घेऊन मागच्या दाराने खासदार केलं जातं.
कुठल्याही सरकारची इतकी हिम्मत नाही की प्रसारमाध्यमांना त्यांच्यापुढे इतके लाचार व्हावे लागेल. पण आज पत्रकारिता, न्यूज चॅनल्स हा मोठा व्यवसाय झाला आहे. इथे फक्त नफ्याचा विचार केला जातोय मग त्यासाठी देश मातीत गेला तरी हरकत नाही अशी माध्यमांची अवस्था आहे. या देशातील कोणत्याच सरकारने आजपर्यंत कधीच जितका पैसा मीडियावर-जाहिरातींवर खर्च केला नाही तेव्हढा पैसा या भाजप-मोदी सरकारने गेल्या १० वर्षात केला आहे.नैतिकतेच्या सर्व पातळ्या सोडून विरोधकांची मुस्कटदाबी सुरू आहे. पण भाजपमध्ये प्रवेश घेताच त्यांचे सर्व घोटाळे, भ्रष्टाचार संपून त्यांना शुद्ध चारित्र्याचे प्रमाणपत्रच मिळते. हे समोर ढळढळीत दिसणारे वास्तव आहे पण कुण्याचं न्यूज चॅनल्स ची याबद्दल बोलण्याची हिम्मत नाही.
देशाचे पंतप्रधान जाहीर सभेमधून ‘एक है तो सेफ है’ आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री देशभर फिरून बटेंगे तो कटेंगे असे धार्मिक द्वेष फैलावणारे वक्तव्य जाहीरपणे करतात पण त्यांना कुणीच जाब विचारत नाही. राज्याचे गृहमंत्री पक्षाच्या जाहीर सभेत विरोधकांना ठोकून काढा म्हणतात. नितेश राणे सारखे राजकारणी राज्याच्या पोलिसांना जाहीर धमक्या देतात, खालच्या पातळीवर जाऊन बोलतात पण यात कुठल्याच न्यूज चॅनलला काही गैर वाटत नाही? यावर एकही डिबेट होत नाही. कुणी या नेत्यांना प्रश्न विचारण्याची हिम्मत करत नाही.
आज माध्यमे विरोधी पक्षांच्या विरोधातच अशी भिडलेली दिसतात जणू या देशातील महागाई, बेरोजगारी, ढासळती आरोग्य यंत्रणा, शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा, जाती-धर्मवाद, आर्थिक मंदी, चीनची घुसखोरी, पाकिस्तानचा उपद्रव, रोज सीमेवर शहीद होणारे जवान ह्या सर्व समस्या या विरोधकांमुळेच निर्माण झाल्या आहेत. प्रश्न हे देशातील सत्ताधाऱ्यांना विचारायचे असतात हा पत्रकारितेचा मूलभूत सिद्धांत सुद्धा आजची माध्यमे विसरली आहेत.
आज देशाची सर्वच पातळीवर पीछेहाट होत आहे. बेरोजगारी-महागाई सामान्यांची कम्बर तोडत आहे, गरिबी वाढल्यामुळे ८० कोटी लोकांना मोफत धान्य द्यावं लागत आहे, भूकबळींच्या यादीत भारत वरच्या क्रमांकावर पोचतोय, भूतान सारखे चिमुकले देशसुद्धा भारताला डोळे दाखवत आहेत. देशाच्या सीमेवर सर्वात जास्त जवान या गेल्या १० वर्षात मारले गेले आहेत. मोदींचे मित्र म्हणवणाऱ्या ट्रम्प ने भारतीयांना त्रासदायक धोरणं अंमलात आणायला सुरुवात केली आहे. आर्थिक विषमता आणि धार्मिक द्वेष प्रचंड प्रमाणात वाढला आहे, गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे, मोठं मोठे घोटाळे राजरोसपणे सुरु आहेत, सरकारी यंत्रणांचा खुलेआम गैरवापर सुरु आहे, महिलांवरील अत्याचार इतके वाढलेत की गेल्या फक्त ८ महिन्यात फक्त महाराष्ट्रातून २६ हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत, शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय स्थिती आहे ही देशाची खरी परिस्थिती असताना आपला देश मोदींच्या नेतृत्वात सातत्याने कशी प्रगती करतोय? आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा कशी उंचावली जात आहे? देशातील जनता किती सुखी आहे? देशातील सर्व प्रश्न जणू संपले आहेत असे चित्र माध्यमांद्वारे सर्वसामान्य जनतेच्या पुढे अखंडपणे दाखवले जात आहे. त्यामुळे देशातील जनतेला गैरसमज होतो की देशात सगळंकाही आलबेल आहे. देशातील सर्वात वाईट दिवस असतांना जनतेला ते अच्छेचं दिन आहेत असं मीडिया दाखवते आहे. थोडीफार लोकांना माहिती होते ती सोशल मीडियामुळे पण त्याला लोक अधिकृत मानत नाहीत. ह्या गोष्टींवर जर प्रसाठी माध्यमांनी वेळोवेळी डिबेट आयोजित केल्यात तर लोकांना खरी परिस्थिती कळेल. पण लोकांना माध्यमे दाखवत आहेत की देश तुफान प्रगती करतोय, बस आता विश्वगुरुच बनायच्या उंबरठ्यावर आहे. आणि लोक तेच खरे मानून चालतात.
देशातील सत्ता जर निरंकुश होत असेल, सत्तेचा गैरवापर करत असेल तर सर्वसामान्यांना माध्यमांचाच आधार असतो. पण माध्यमच जर सर्वसामान्यांच्या विरोधात गेले तर जनतेचा वाली कोण? माध्यमांना विनंती आहे की या देशाची अंतर्बाह्य परिस्थिती तुमच्यापासून लपून राहिलेली नाही. या देशातील सामान्य नागरिकांना आता फक्त आणि फक्त तुमचाच आधार आहे. देशातील लोकशाही टिकविण्याची जबाबदारी आज माध्यमांवर आहे. आपल्याकडून सामान्यांची बाजू घेणं होत नसेल तर निदान त्यांच्या न्याय-हक्कांसाठी ते करत असलेली आंदोलने दडपण्यासाठी तरी सरकारला मदत करू नका. तुम्ही 10 वर्षात प्रचंड पैसा कमावला, तो तुमच्या पुढील किती पिढ्या टिकेल माहीत नाही पण आपल्या देशाचे या देशातील भावी पिढीचे भविष्य आता तुमच्या हातात आहे. आतापर्यंत जे झालं ते सोडून देऊ या देशावर आणि या देशाच्या नागरिकांवर दया करा, तुमच्यामध्ये २०१४ च्या अगोदरची ती हिम्मत पुन्हा जागवा आणि हा देश वाचवा.
✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-7769886666














