Home महाराष्ट्र महावितरणच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, अखेर महावितरणने घेतली नमती भूमिका

महावितरणच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, अखेर महावितरणने घेतली नमती भूमिका

275

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.24जानेवारी):- वडूज येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयात आपल्या व्यथा मांडण्यासाठी गेलेल्या जांभुळणी व परिसरातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ श्री. महेश करचे व शेतकरी प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसणार होते. या आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत होता. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता.

     काल महेश करचे यांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज तातडीने महावितरणचे वडूज विभागीय कार्यकारी अभियंता भिमराव मस्के यांनी महेश करचे व आंदोलक शेतकऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीच्या सुरूवातीलाच महेश करचे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मुजोरीचा पाढाच वाचला. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना नमती भूमिका घेण्याची वेळ आली. 

       यावेळी झालेल्या बैठकीत शेनवडी सबस्टेशनची क्षमता पुढील तीन महिन्यात दुप्पट करू, नवीन गंगोती सबस्टेशनचे काम एक वर्षात पूर्ण करू, जांभुळणी लिंक लाईन तात्काळ सुरू करू, करचे वस्तीला सिंगल फेज लाईट तात्काळ देवू, जोगूबाई येथे असलेल्या डीपी ची क्षमता चार दिवसात दुप्पट करू, करचे वस्ती व जोगूबाई येथे नवीन अतिरिक्त डिपी चा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे तात्काळ सादर करू, फिटर वस्ती डिपी चे काम १५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करू, अशा सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी पत्र महावितरणने दिले. यावेळी बोलताना महेश करचे म्हणाले कि, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा हा मोठा विजय आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असून याबाबत महावितरणने फसवणूक केल्यास १५ फेब्रुवारी पासून महावितरणच्या सातारा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा महेश करचे यांनी दिला आहे. 

      शेतकऱ्यांच्या समस्यांवर यशस्वी तोडगा निघताच महेश करचे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सावित्रीबाई फुलेंचे पुस्तक भेट दिल्याने या अनोख्या आंदोलनगिरीची मोठी चर्चा होत आहे. यावेळी माण-खटाव मधील शेतकरी भारत काळेल, विठ्ठल हिरवे, सुनिल काळेल, शिवाजी काळेल, मयूर झेंडे, रुपाली काळेल, सागर काळेल, यश धुमाळ, पप्पू काळेल उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here