Home खेलकुद  ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांच्या चेहऱ्यावर क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून हास्यानंद

ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांच्या चेहऱ्यावर क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून हास्यानंद

279

✒️जिंतूर प्रतिनिधी(सौ अश्विनी जोशी)

जिंतूर(दि.6जानेवारी):-शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहुन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहावे या सदहेतूने शनिवार दिनांक 04/01/2025 व रविवार दिनांक 05/01/2025 रोजी शालेय वेळेव्यतिरिक्तच्या वेळेत सर्व शिक्षकांसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजन करणे सुरू आहे. या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विजयी झालेल्या विद्यार्थी, शिक्षकांना वेळोवेळी गौरविण्यात येत आहे. कौतुक करून त्यांचे मनोबल वाढविण्यात येत आहे. वेळोवेळी चांगले कार्य करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन देऊन प्रेरित केल्या जात आहे.

विशिष्ट हेतू आणि ध्येय मनात ठेवून प्रेरित झालेले हे विद्यार्थी आणि शिक्षक जिंतूर तालुक्याचा शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. हसत-खेळत, आनंदायी वातावरणामध्ये एक शैक्षणिक चळवळ जिंतूर तालुक्यामध्ये उभी राहताना दिसत आहे. यासाठी सातत्याने जिंतूर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी त्र्यंबक पोले प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. सर्व विद्यार्थी आपल्या शाळेत टिकले पाहिजेत आणि सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण विकास घडविणारे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी जिंतूर शिक्षण विभाग सातत्याने विविध उपक्रम, कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करत आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणाऱ्या शिक्षकांचेही शारीरिक मानसिक, भावनिक आरोग्य चांगले राहिले पाहिजे यासाठी तालुकास्तरीय केंद्रनिहाय शिक्षकांचे क्रिकेट सामने आयोजित आयोजित करण्यात आले. या क्रिकेट सामन्यांना शिक्षकांमधून प्रचंड प्रतिसाद लाभला. जिंतूर तालुक्यातील 16 केंद्राच्या शिक्षकांच्या टीमने या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. शिक्षकांच्या टीममधील सर्व शिक्षकांनी आपल्या परीने प्रौढ वयातही आपल्या खेळप्रियतेचे, खेळाडूवृत्तीचे आणि चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडवले. हे क्रिकेटचे सामने अतिशय खेळीमेळीच्या आनंददायी वातावरणात आयोजित करण्यात आले. सर्व शिक्षकांना निखळ-निर्मळ आनंद मिळावा या हेतूने आयोजित सामन्यामधून खेळ आणि खेळाडू वृत्ती जपण्याचा प्रयत्न दिसून आला.

सामने पार पडत असताना… प्रत्यक्ष खेळत असताना… शिक्षक खेळाडूंच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून या सामन्यांचे फलित लक्षात आले. यानिमित्ताने सर्व शिक्षक परिवार एकत्र आला. त्यांची एकमेकांशी चर्चा झाली. सुसंवाद घडून आला. क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने अटीतटीचे, चूरशीचे क्षण पाहायला मिळाले. सर्वांना खळखळून हसण्याचा आनंद मिळाला. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, परस्परांचे ऋणानुबंध दृढ करण्याची संधी मिळाली. असे विविध हेतू साध्य करणाऱ्या तालुकास्तरीय शिक्षकांच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांचे सर्व शिक्षकांनी आभार व्यक्त केले. सदरच्या सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक सावंगी भांबळे या केंद्राच्या टीमने, द्वितीय क्रमांक अंबरवाडी या केंद्राच्या टीमने, तर तृतीय क्रमांक जिंतूर केंद्राच्या टीमने पटकावला याबद्दल उपस्थित सर्वांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. मॅन ऑफ द मॅच श्री पठाण यांना देण्यात आला. खेळाच्या चांगल्या प्रदर्शनाबद्दल सखाराम चाटे, शेळके, संजय नांदुरे यांचे कौतुक करण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व शिक्षक टीम व शिक्षकांचे सुद्धा आभार व्यक्त केले. गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांच्याकडून विजयी संघासाठी 2100 रुपये तर उपविजयी संघासाठी 1100 रुपयाचे पारितोषिक देण्यात आले. चांगले षटकार लगावल्याबद्दल सखाराम चाटे यांना 500 रुपयांचे बक्षीस केंद्रप्रमुख मारुती घुगे यांनी दिले, तर जिंतूर संघाचे कौतुकास्पद प्रदर्शन बघून माझी गटशिक्षणाधिकारी गणेश गाजरे यांनी 500 रुपयांचे बक्षीस दिले. तर ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या साई ऑप्टिकल कडून विजयी संघाच्या सर्व खेळाडूंना ब्लू कट चष्मा देण्याचे घोषित करण्यात आले.

खेळाचे चांगले प्रदर्शन करणाऱ्या शिक्षकांची संख्या पाहता येणाऱ्या कालावधीमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्यात यापुढे शिक्षकांची क्रिकेट टीम सुद्धा सहभागी होईल अशी आशा वाटते.

स्पर्धेच्या आयोजन कार्यामध्ये स्वतः गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, राजेंद्र ढाकणे, लक्ष्मण टाकणसार, माधव साळापुरीकर, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानोबा साबळे, सुभाष आमले, मंगेश नरवाडे, नवनीत देशमुख, केंद्रप्रमुख मारुती घुगे, मनोज तोडकर, पांडुरंग भांबळे, संजय स्वामी, विलास गवई, कैलास गवई, प्रभाकर नालंदे, सुनील फड, मनोज मुळे, रत्नाकर जोशी, विष्णू शिंदे, तुळशीराम कानडे, शिवाजी कऱ्हाळे, निलेश लटपटे, डी जी पोले, मयूर जोशी, लक्ष्मीकांत नाईक, माधव दोसलवार, अंभोरे यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here