✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.21डिसेंबर):-केंद्र शासनाने 21 वी पशुगणना संपुर्ण भारतभर सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पशूगणना ग्रामीण व शहरी भागामध्ये करण्यात येत असून 25 नोव्हेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 हा पशुगणनेचा कालावधी आहे. या दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या पशुधनाची गणना प्रगणक व पर्यवेक्षक मोबाइलवरून करणार आहेत. या पशुगणनेच्या प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता राखण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात 21 वी पशुगणना 2024 अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व संनियत्रण समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डाॅ. मंगेश काळे, सहायक आयुक्त (पशुसंवर्धन) डाॅ. हरीराम वरठी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. उमेश हिरुडकर, मनपा उपायुक्त मंगेश खवले आदी उपस्थित होते.
पशुगणनेत गौशाळा तसेच भटक्या जनावरांची माहिती अंतर्भुत केली जाणार आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनाच्या गणनेसाठी 163 ग्रामीण व 53 शहरी असे एकुण 216 प्रगणक तर 44 पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. गणनेचा दैनंदिन अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभाग तसेच नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तालुकास्तरावरील यंत्रणांची बैठक घ्यावी. पशुगणनेसाठी पशुपालकांचे सहकार्य घ्यावे, अशा सुचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिलेत.