एक फिरते विचारपीठ, चालते-बोलते संस्कारपीठ, दीनदलितांचे विद्यापीठ ,माणसातला माणूस जागा करणारे परिवर्तनवादी संत ,सामान्य माणसाच्या जीवनाला वास्तववादाचा स्पर्श केरून सामान्य माणसाचे जीवन सफल करणारे.रीत -भाषा -लिपी वेगळी असणारे .पृथ्वी ही पाटी,धरती हा कागद,खराटा ही लेखणी, स्वच्छता हा धर्म,जीवन हा ग्रंथ आणि चिंध्या हे ज्यांचे महावस्त्र ,सेवा हे कार्य ,रंजले गांजले हे सगे सोयरे ज्यांचे होते अशा कर्मयोगी संत गाडगेबाबांना दि . 20 डिसेंबर 2024 रोजी असलेल्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥
संत गाडगेबाबांचे कीर्तन म्हणजे प्रबोधन सत्र म्हणजेच जनकल्याणकारी समाजप्रबोधन त्यांच्या कीर्तनातून नेहमीच होत असे.ते म्हणत होते की,कर्ज काढून सणवार करू नका.दारू पिऊन धुंद होऊ नका. कष्टाशिवाय जगु नका.ऐश्वर्याने उन्मत्त होऊ नका. मुला बाळांना शाळेत घातल्याशिवाय राहू नका. औताचा बैल आणि दावणीची गाय थकली म्हणून कसायाचे धन करू नका. म्हाताऱ्या माणसाचा कंटाळा करू नका. भुकेलेल्यांना अन्न द्या. तहानलेल्यांना पाणी द्या.जिभेवर ताबा ठेवा.मुक्या जीवांचा बळी घेऊन पोटाचे थडगे करू नका.हा ‘बाबांचा उपदेश’ अगदी साधा सरळ आणि सर्वजनसुलभ आहे आजही समाजात बाबांच्या या संपूर्ण उपदेशाची आवश्यकता आहे जर बाबांचा हा उपदेश जनसामान्यांनी आचरणात आणला तर कोणी कर्जबाजारी होणार नाही ,कोणी दारोड्या होणार नाही,कोणाचे दारूमुळे संसार उद्ध्वस्त होणार नाहीत,जिभेवर ताबा ठेवल्यामुळे समाजात भांडणे होणार नाहीत तर प्रत्येक व्यक्ती एकमेकाचा मित्र होईल,प्रत्येक जण प्रामाणिकपणे कष्ट करून स्वतःचे जीवन जगेल,ऐश्वर्याने कोणीही उन्मत होणार नाही,भुकेल्या लोकांना अन्न दिल्यामुळे कोणी उपाशी राहणार नाही,प्रत्येकाला पाणी दिल्यामुळे कोणीही तहाणलेला राहणार नाही पण आज असे होताना दिसते काय ? या गोष्टीच्या आत्मपरीक्षणाची आज समाजाला गरज आह.संत गाडगेबाबांच्या स्मृतिदिनानिमित्त का होईना असे आत्मपरीक्षण जनसामान्यांनी केले पाहिजे.
कण कण करूनीं कोटी केले ।
कण न खर्चला स्व-हितासाठी ।
वण वण फिरुनी कण कण झिजले ।
‘बाबा’ दुःखी जनतेसाठी ।
अशा या कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या अंगी असलेल्या प्रामाणिकपणा व निस्वार्थीपणाचे दर्शन सर्वसामान्य जनतेला घडत असे .संत गाडगेबाबांची माणूस जात होती.मानवता हाच त्यांचा धर्म, स्त्री-पुरुष हा च त्यांचा पंथ होता . समाजासाठी सर्वस्वाचा त्याग त्यांनी केला .कर्मयोगी संत गाडगेबाबा चांगल्या कार्यासाठी लोकांना प्रवृत्त करीत. वाईट कार्यापासून परावृत्त करीत. काम करा, काम करीत राहा. चांगले काम करताना अहंकार बाळगू नका. आसक्ती करू नका, काम करा पण कर्मफलाचा त्याग करा. काम करणे आपला अधिकार आहे पण कर्मफलावर आपला अधिकार नाही. मनुष्य कर्मांनीच मोठा होतो.माणसाने मरावे परी कीर्ती रूपी उरावे. माणसाचे धन तिजोरी नाही. सोनं नाही. हिरे नाही. बंगला नाही. मोटार नाही.
माणसाचं धन कीर्ती।
संत कबीर याचा पुरावा आपल्या दोह्यात देतात –
सुरतसे कीरत बडी बिनपंख उड जाय ।
सुरती तो जाती रही कीरती
कभी ना जाय ।।
संत गाडगेबाबा म्हणत होते.,
“तुका म्हणे एक मरणीच खरे। उत्तमची उरे कीर्ती मागे ।।
माणूस मरणार पण त्याची कीर्ती मरणार नाही.शक्ती म्हणजे आपले जीवन होय.व्यसनामुळे शारीरिक व मानसिक – दुर्बलता येते. यासाठी शक्तीची गोष्ट केली पाहिजे तरच सुख मिळेल,आपण सर्वजण एकाच भारत मातेची लेकरे,मग तुमच्या आमच्यात जातीच्या भिंती पाहिजेत कशाला,आपणा सर्वांची जात एकच. ती म्हणजे माणूस होय.असं संत गाडगेबाबा कीर्तनातून म्हणत असत .
मृत्युचे मुळ कारण आपले व्यसन आहे. व्यसनाधीन मनुष्य सतत मृत्यूच्या सावलीत असते.
व्यसनमुक्तींचा । बाबांचा संदेश ।
तरुणांचा देश । वाचवू या ॥
व्यसनाचा नाद । कुटुंब धन्याला ।
विकास थांबला । संसाराचा ॥
पाणी सर्वत्र पवित्र असते .मनात जेव्हा अपवित्र विचार येतात तेव्हा ते पाणीही अपवित्र वाटते, कारले खाऊन कोणाचे तोंड गोड झाले आहे का?”असा प्रश्न जनतेलाच ते कीर्तनातून विचारत होते .
ते म्हणत , माणसाचा जन्म म्हणजे एक दुर्लभ गोष्ट, माणसाच्या जन्मास यावे तर त्या जन्माचे सार्थक करावे.जन्मास येणाऱ्या प्रत्येक माणसास मरण येते मग जीवंत असताना पैसा, अधिकार आणि सौंदर्य यांचा अभिमान बाळगणे व्यर्थ आहे.बाह्य साधनांनी केलेली देवाची भक्ति व्यर्थ होय,देव मनापासून केलेल्या भक्तिचा भुकेला असतो.देव देवळात नसतो तो सर्व जगात सर्व ठिकाणी असतो. जगातील माणसांची सेवा हीच, खरी देवाची पूजा होय,असं संत गाडगेबाबा म्हणत .शिक्षणाचे महत्त्व सांगताना संत गाडगेबाबा म्हणतात की ,” शिक्षण सर्व सुधारणांचे महाव्दार हीय,सर्वांगीण विकासाचे माहेरघरच ते. शिक्षण हीच खरी- संपत्ती होय, शिक्षणाशिवाय मनुष्य हा पशुसारखाच. “
दया विषयी ते म्हाणत ,
तिरथ जाव काशी जावं ।
चाहे जाव गया ॥
कबीर कहे कमाल कु ।
सबसे बडी दया ||
संत गाडगेबाबाविषयी कवी म्हणतात,
मलीन मनाची धुतली वस्त्रे झाडिलेस अज्ञान ॥
खापरातून सूर्य वाटला
अंधाराचे घरी ॥
संत गाडगेबाबा यांना नियमित शालेय शिक्षण मिळाले नव्हते. पुढे ते स्वयंप्रेरणेतून शिकले .ते एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मले होते आणि त्यांना लहानपणापासूनच घरकाम आणि शेतीकाम करावे लागत होते. त्यामुळे त्यांना शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही ; पण त्याचा अर्थ असा नाही की ते अशिक्षित होते.गाडगेबाबा खूपच जिज्ञासू स्वभावाचे होते. त्यांनी स्वतःहून वाचन करणे, लोकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या अनुभवातून शिकणे या गोष्टी केल्या.
संत गाडगेबाबा संत तुकाराम महाराजांचे उपदेश खूप आवडीने वाचत असत. त्यांच्या उपदेशांचा संत गाडगेबाबांवर खूप प्रभाव होता आणि त्यांनी आपल्या जीवनात त्याचा उपयोग कीर्तना सोबतच स्वजीवनात केला.गाडगेबाबा कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देत असत. त्यांचे कीर्तन साधे आणि सोपे होते, जेणेकरून सर्वसामान्य माणूस त्यांना सहज समजू शके. संत गाडगेबाबा आपल्या जीवनातील अनुभवातून शिकले आणि त्याचा उपयोग समाजसेवेसाठी केला. त्यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी खूप प्रयत्न केले.अशाप्रकारे, संत गाडगेबाबा यांनी नियमित शालेय शिक्षण नसतानाही, स्वतःच्या मेहनतीने आणि बुद्धिमत्तेने खूप काही शिकले आणि समाजाला मोलाची शिकवण दिली. त्यांनी समाजातील विविध समस्यांवर भाष्य केले आणि त्यांच्या शिकवणी आजही प्रासंगिक आहेत.गाडगेबाबा शिक्षणाच्या महत्त्वावर भर देत असत. त्यांच्या मते, शिक्षण हेच समाजाच्या उन्नतीचे खरे साधन आहे. ते स्वच्छतेचे महत्त्व सांगत असत. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक गावांमध्ये स्वच्छतेची चळवळ उभी राहिली.रोगराई मुक्त झाली .गाडगेबाबा जातीय भेदभाव आणि अस्पृश्यता विरुद्ध होते. त्यांनी सर्व माणसे समान असतात, हे सांगितले.ते अंधश्रद्धाविरुद्ध होते आणि लोकांना तर्कशुद्ध विचार करण्यास प्रोत्साहित करत असत. संत गाडगेबाबा कर्तव्यनिष्ठेचे महत्त्व सांगत असत. त्यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.प्रामाणिकपणे कष्ट करून उदरनिर्वाह केला पाहिजे .आपल्या कुटुंबालाही त्यांनी हाच उपदेश केला होता .ते सर्व धर्मांचा आदर करत असत आणि धार्मिक सहिष्णुता शिकवत असत.संत गाडगेबाबांच्या शिकवणीमुळे समाजात अनेक चांगले बदल घडून आले ; म्हणूनच त्यांचे जीवन आणि कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.त्यांची शिकवण आजच्या आधुनिक समाजासाठी मार्गदर्शक आहे.
अशा महान कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥
गाडगेबाबांना ।आज स्मृतिदिनी।
वंदन करांनी । कोटी कोटी ॥
✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(रुक्मिणी नगर,अमरावती)भ्रमणध्वनी:-८०८७७४८६०९