Home महाराष्ट्र समाजाच्या निकोप वाढीसाठी लेखक कलावंतांची भूमिका महत्त्वाची : डॉ. अशोक ढगे

समाजाच्या निकोप वाढीसाठी लेखक कलावंतांची भूमिका महत्त्वाची : डॉ. अशोक ढगे

29

✒️नेवासा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नेवासा(दि.13डिसेंबर):-समाजातील शास्त्रज्ञ, कलावंत, खेळाडू, शेतकरी, साहित्यिक हे आपापल्या परीने उत्कृष्ट काम करत असूनही नकारात्मक भूमिका जास्त चर्चिली जात आहे. सकारात्मक कामाला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे, हे काम साहित्यिक आणि पत्रकार बांधव योग्य पद्धतीने करू शकतील. समाजाची निकोप वाढ होण्यासाठी साहित्यिक व कलावंत हे योग्य भूमिका घेत आहेत,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोकराव ढगे यांनी केले.

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या नेवासा तालुका शाखेच्या वतीने ज्ञानेश्वर महाविद्यालयात आयोजित वार्षिक बैठकीत ते बोलत होते.यावेळी विचारपिठावर शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी, माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर सोनवणे,अध्यक्ष प्रा.डॉ. किशोर धनवटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ.ढगे म्हणाले की, समाजात चांगुलपणा निर्माण करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने समाज सुधारत आहे, समाज सुधारण्यासाठी कलावंत, साहित्यिक, पत्रकार यांची भूमिका महत्त्वाची आहे. ही भूमिका प्रबळ होण्यासाठीचे प्रबोधन शब्दगंध चळवळीच्या माध्यमातून होत आहे. म्हणून या चळवळीला पाठबळ मिळणे आवश्यक आहे.

संस्थापक सचिव सुनील गोसावी म्हणाले की, शब्दगंध ही आपल्या सर्वांसाठीची साहित्यिक चळवळ असून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नवोदितांना विचारपीठ उपलब्ध करून देण्याची भूमिका घेत आहे, त्यामुळे सर्व कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन त्याच पद्धतीने व्हायला हवे. आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना द्वि वार्षिक सभासदत्व देण्यात येत आहे.

प्रा.डॉ. किशोर धनवटे यांनी दोन वर्षात राबवलेल्या विविध उपक्रमाबरोबरच शब्दगंध च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘ फिरते मोफत वाचनालय ‘ बद्दलची माहिती दिल. या उपक्रमासाठी अनेकांचे हात आणि समर्थ साथ लाभल्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होत आहे. 100 गावांमध्ये जाऊन वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात यापुढे वडाच्या वृक्षाचे रोपण या चळवळीच्या वतीने करण्यात येणार आहे.

श्री. पांडुरंग रोडगे म्हणाले की, तालुकास्तरावर लोक कलावंत, पत्रकार, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांचा एकत्रपणे स्नेह मेळावा घेऊन त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, यासाठी सर्वांचे सहकार्य लागणार आहे. दिगंबर गोंधळी यांनी मनोगतात आलेले अनुभव कथन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. दिगंबर सोनवणे यांनी केले तर शेवटी पांडुरंग रोडगे यांनी आभार मानले. यावेळी प्रा.किरण वैद्य, प्रा.अमोल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here