🔺अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
पुणे(दि.१२ डिसेंबर):-देशाच्या सामाजिक चळवळीला दिशा देणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना सहन केली जाणार नाही.या घटनेमागील सूत्रधारांसह मुख्य आरोपीवर कडक कारवाई करावी; त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी गुरुवारी (ता.१२) केली.
पवित्र संविधान ग्रंथाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्याची घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे.घटनेनंतर संविधानावर प्रेम करणाऱ्यांच्या भावना दुखावणे साहजिक बाब आहे. याच दुखावलेल्या भावना संताप स्वरुपात बाहेर आला आणि आंदोलनाला हिंसक वळण लागले.परंतु, लोकभावना लक्षात न घेता आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला.
आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची आणि आंदोलकांच्या भावना लक्षात घेता त्यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी देखील बसपाच्या शिष्टमंडळाने पुणे विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करतांना केली. शिष्टमंडळात पुणे जिल्हा प्रभारी महेश जगताप,उत्तर भारतीय भाईचारा प्रमुख अनिल त्रिपाठी, बीव्हीएफ चे प्रदीप ओहोळ, बसपा पदाधिकारी संतोष जाधव यांच्या सह प्रमुख पदाधिकारी सहभागी होते.
परभणीत घडलेली घटना समस्त भारतीयांना धक्का देणारी आहे. देशाचे संविधान सर्वांना न्याय हक्क प्रदान करणारे आहे.विविधतेने नटलेल्या भारतात सर्वांना एकसंघ ठेवण्याचे अविरत कार्य गेल्या ७५ वर्षांपासून संविधान करीत आहे. देशातील अनेक जातीधर्मांचे धर्मग्रंथ आहेत.पंरतु,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान जाती, धर्म, लिंग भेद न करता सर्वांना त्यांचा हक्क देणारे आहे. भारतीयांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक अधिकार देणार्या देशाच्या ‘संविधानग्रंथा’चा अपमान हा संपूर्ण देशवासियांचा अपमान आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.
संविधान हे केवळ एक धर्म आणि जातीपूरताच मर्यादीत नाही. केवळ बौद्ध बांधवांसाठीच नाही तर समस्त देशवासियांसाठी संविधान पवित्र आहे. या ग्रंथाचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, असे डॉ.चलवादी म्हणाले.
पुणे विभागात आणि महाराष्ट्रात अशा घटनेची पुर्नरावृत्ती होवू नये याची प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांना यानिमित्ताने केले.