✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
पुणे(दि.6डिसेंबर):-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून समता बेलदार समाज संस्था पुणे व सकल बेलदार समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे बेलदार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी बेलदार समाजाच्या जातीच्या दाखल्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना भेटून निवेदन दिले. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी समता बेलदार समाज संस्थेचे अध्यक्ष व सकल बेलदार समाज संघटना युवा मोर्चा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. विशाल साळुंखे, श्याम फुलावरे, नितीन जाधव, रवींद्र नाईक, प्रसाद नाईक, वंदना कुमावत, स्वप्नील नाईक, बापू नाईक, अरुणा नाईक, अभिजीत नाईक , संतोष मोहिते, संतोष कुमावत,कृष्णा नाईक, अनुराधा नाईक, प्रमोद नाईकआदी पदाधिकारी उपस्थित होते.
बेलदार समाज हा महाराष्ट्र मध्ये एनटी व केंद्र सरकारमध्ये ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आला आहे. हे दोन्ही दाखले मिळवण्यासाठी शासनाकडून मिळवण्यासाठी काही कागदपत्रे पुराव्यासाठी सादर करावी लागतात. यातील मुख्य पुरावा हा महसुली पुरावा मानला जातो जो १९६१ पूर्वीचा असला पाहिजे किंवा सक्षम राजपत्रित अधिकाऱ्याचा इतर कोणताही पुरावा मूळ पुरावा ग्राह्य धरला जातो. इथे १९६१ पूर्वीचा आणि मूळ पुरावा या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ज्यांनी पूर्वी जातीचे दाखले काढले आहेत पण त्यांना आता कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट काढायचे आहे अशा लोकांना आता मूळ पुराव्याअभावी कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट घेण्यासाठी मुळ पुराव्या अभावी अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मुळे मुलांना शालेय शिक्षण सोडावे लागत आहे तर अनेकांची या मुळे नोकरी गेली आहे. बेलदार समाज मुळातच उपजिविकेसाठी भटकंती करत असल्याने तसेच शिक्षणा अभावी बहुतांश लोकांकडे १९६१ पूर्वीची जाती चा उल्लेख असलेली नोंद उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना जातीचा दाखला मिळत नाही. अशा अर्जदारा साठी गृह चौकशी अहवाल करण्याचे आदेश आहेत. मात्र शासकीय अधिकार्यांच्या दालनातून बहुतांश वेळा मूळ पुराव्या अभावी प्रकरणच दाखल करून घेतले जात नसल्याची खंत समता बेलदार समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. विशाल साळुंखे यांनी या वेळी व्यक्त केली.
जातीच्या दाखल्यासाठी समता बेलदार समाज संस्था व सकल बेलदार समाज संघटना यांच्यातर्फे वेळोवेळी मोर्चे व तत्कालीन प्रांताधिकारी व अधिकारी यांना निवेदन दिले आहे. परंतु या बेलदार समाजाच्या मागणीकडे शासनाने लक्ष दिले नसून शासनाकडून कायम टाळाटाळ होत असल्याची टीका बेलदार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी केली. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी या मागणीचे निवेदन स्वीकारून समता बेलदार समाज संस्था व सकल बेलदार समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जातीच्या दाखल्याचे अंमलबजावणी लवकरात लवकर होईल असे आश्वासन दिले. शासनाने ही मागणी लवकर पूर्ण केली नाही तर यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही संघटनांतर्फे या वेळी देण्यात आला.