Home गडचिरोली प्रज्ञा, शील आणि करुणेचे अथांग महासागर!

प्रज्ञा, शील आणि करुणेचे अथांग महासागर!

67

(6 डिसेंबर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेष)

भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. ते देशासाठी व समाजासाठी अहोरात्र झटले. त्यांनी सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरत आहे. अशा या थोर महापुरुषात विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात प्रथम उच्चारावे लागते. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींचा हा लेख…

डॉ.बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने त्यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून बहुजन समाजक्रांतीचे स्फुलींग चेतविले. त्यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले. बाबासाहेब म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय. ते नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मानव मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले. रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्रीवर्गाच्या, शेतकरी-मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखवली. मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीयच नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारताच्या राष्ट्रीय ग्रंथ- संविधानाचे ग्रंथकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी दि.१४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून ते दांपत्य दक्ष असत. स्वतःसह भीमरावांना वाचनाची खुप आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. वडील रामजी हे मुलांनाही चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्यांच्या ठायी आढळते. जगद्गुरू संत तुकारामजी व संतशिरोमणी कबीर हे बाबासाहेबांच्या भावी आयुष्यात अभ्यासाचे विषय झालेले दिसतात.

शैक्षणिक विचार: शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी, यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो माणूस प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,” असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. ”प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे. त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्‍यांनी ध्यानी घ्यावे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन इ.स.१९४६ साली करून त्यांनी मुंबइला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलींद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय, असे ते मानत.

प्रखर राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा : डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ.आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली. त्यांना वाटले, डॉ.आंबेडकर आता देश सोडून जाणार की काय? परंतु या महामानवांनी निक्षून सांगितले, ”आम्ही या भारत देशाची संतान आहोत. आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच. राष्ट्रावर संकट आल्यास प्राण पणाला लावून देशाचे रक्षण केले व पुढेही करूच!” यात डॉ.आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा सामावलेली दिसून येते.

सामाजिक क्रांती: डॉ.बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीती, अत्याचार, अन्याय यांना त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय बहुजन समाज एकसंघ होणार नाही, असे ते समजत. डॉ.बाबासाहेब म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क हे आपल्याला कळत नाही, अशा प्रकारे त्यांनी समाजात सामाजिक क्रांतीचे रणशिंगच फुंकले.

श्रमजीवी व दलितांचे कैवारी: स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरीही त्यांनी दूर केली. इ.स.१९२७ ते १९५६पर्यंतच्या काळात त्यांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केले. सन १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा. सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा. मुलामुलींना शिक्षण अवश्यच द्या. त्यांना महत्वाकांक्षी बनवा. त्यांचा न्यूनगंड दूर करा, अशा महत्वपूर्ण उपदेशांचे डोळ्यांत झणझणीत अंजन घातले. दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजीवींसाठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे, म्हणून ते आजीवन सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे, तर शेतकरी, शेतमजूर, मजूर आणि कामगार आदींच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला.
अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व बहुजनवर्गाच्या समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महानतम सर्वोत्तम देणगी होय. अशा या महामानवाचे दि.६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा आमच्यासाठी मागे उमटवून ठेवला. नमो बुद्धाय, जय भीम!

!! महापरिनिर्वाण दिनी महामानवास विनम्र अभिवादन !!

✒️श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.मु. पो. ता. जि. गडचिरोली.फक्त व्हाॅ.नं. 9423714883
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here