आज भारतीय नौदल दिन. भारतीय नौदलातर्फे दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्याआधीचा पूर्ण सप्ताह हा देशभरात नौदल सप्ताह म्हणून साजरा केला जातो. ४ डिसेंबर याच दिवशी नौदलदिन का साजरा केला जातो हे जाणून घेऊया. १९७१ सालच्या सुरवातीपासूनच भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. तत्कालीन पूर्व पाकिस्तान मधून पाकिस्तानी हवाईदल सातत्याने भारतीय हद्दीत घुसखोरी करत होते. भारताने अनेकदा इशारे देऊनही पाकिस्तान आपली खोड मोडायला तयार नव्हते. १९७१ च्या एप्रिल महिन्याच्या सुमारासच युद्ध पुकारण्यासदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या पार्श्वभूमीवर सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली या बैठकीला मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांनी या बैठकीत स्पष्ट सांगितले की सध्याची परिस्थिती आणि ऋतू हे आपल्यासाठी अनुकूल नसल्याने सध्यस्थितीत युद्ध आपल्याला परवडणारे नाही.
युद्धासाठी नोव्हेंबर पर्यंत थांबावे लागेल. नोव्हेंबर पर्यंत सैन्याची जुळवाजुळव व्यवस्थित करता येईल याची खात्री देण्यासही ते विसरले नाही. खरंतर एप्रिलमध्येच युद्ध व्हावे या मताच्या इंदिरा गांधी होत्या पण लष्करप्रमुखांनी परिस्थिती विषद केल्यानंतर नोव्हेंबर पर्यंत थांबण्याचा निर्णय पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे आपण काहीही केले तरी भारत आपल्याला उलट उत्तर देऊ शकणार नाही अशा आविर्भावात पाकिस्तान वावरू लागला. त्यांनी ३ डिसेंबर रोजी भारतीय सीमाभागावर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातून जोरदार हल्ले चढवले. त्याचवेळी भारतीय विमानवाहक युद्धनौका आयएनएस विक्रांतला सागरतळात बुडवण्याची योजना पाकिस्तानने आखली. पाकिस्तानची ही योजना भारतीय नौदलाच्या लक्षात आल्याने भारतीय नौदलाने चुकीचा संदेश पाठवून पीएनएस गाझी ची दिशाभूल केली आणि डाव साधला. भारतीय नौदलाने चढवलेल्या हल्ल्यात गाझी या पाकिस्तानच्या पाणबुडीला जलसमाधी मिळाली.
भारताच्या आयएनएस विक्रांतला सागर तळाशी पाठवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या पाकिस्तानी नौदलाची सर्वात शक्तिशाली असलेली गाझी ही पाणबुडीच सागर तळाशी पोहचल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला. गाझी पाणबुडीला जलसमाधी मिळाल्यानंतर बंगालच्या उपसागरात आयएनएस विक्रांतने आपला दरारा पसरवला आणि पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडून काढले. आयएनएस विक्रांतवरील धावपट्टीचा वापर करत नौदलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवून पूर्वेकडे पाकिस्तानला डोकेही वर काढू दिले नाही. हे सुरू असतानाच पश्चिमी मुख्यालयाच्या नौदल ताफ्याने धाडसी नियोजन करुन लहान आकाराच्या नौकांच्या मदतीने छुप्या पद्धतीने पाकिस्तानी सागरी हद्दीत प्रवेश करत थेट कराची बंदरावरच हल्ला चढवला. पाकिस्तानी युद्धनौका, पाणबुड्या त्यांच्यावरील या अचानक झालेल्या हल्ल्याने हादरुन गेल्या. कराची बंदरावर थेट हल्ला होऊ शकतो, याची कल्पनाच पाकिस्तानी नौदलाने केली नव्हती. ३ व ४ डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि युद्धाचे पारडे भारताच्या बाजूने झुकले. त्यानंतर दहा दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली.
नौदलाच्या या पराक्रमाची आठवण म्हणून ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर भारतीय नौदलाचा जगभरात दबदबा निर्माण झाला. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि दक्षिण महासागरात भारतीय नौदलाचे सामर्थ्य निर्माण झाले. आज भारतीय नौदल हे जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदल म्हणून ओळखले जाते. आज भारताचे नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. भारतीय नौदलाकडे एकूण ५५ युद्धनौका आणि ५८ हजार ३५० सैनिक आहेत. भारताकडे ९ विध्वंसक, १५ नौका, न्यूक्लिअर हल्ला करणारी एक पाणबुडी, १४ पारंपरिक पाणबुडीसह आधुनिक शस्त्रे आहेत म्हणूनच जगातील सर्वात शक्तिशाली नौदलामध्ये भारतीय नौदलाची गणना होते. भारतीय नौदलाला नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
✒️श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५