Home महाराष्ट्र आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात : उद्योजक अशोकभाऊ जैन

आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात : उद्योजक अशोकभाऊ जैन

40

▪️युवा कवयित्री पलक झंवर हिच्या ‘पलकोसे खुली कल्पनाए’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.1डिसेंबर):- ‘पलको से खुली कल्पनाए’ केवळ शब्दांची जुळणी नाही तर आयुष्यातील विविध भावनांचा खोलपणा दाखवणारा संग्रह आहे. युवा कवयित्रीने अल्पवयात जीवनाचे सार सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी केले.

शहरातील युवा कवयित्री पलक भूषण झंवर हिच्या ‘पलकोसे खुली कल्पनाए’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रियपल भूमी या फार्म हाऊसवर उद्योजक अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अवघ्या १५ वर्षाच्या वयात पुस्तक लेखन पलकने केले आहे. प्रसंगी मंचावर कबचौ कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, किड्स गुरुकुल इंटरनॅशनलच्या प्राचार्य डॉ. मीनल जैन, जवाहर झंवर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून देवी सरस्वतीला माल्यार्पण केले.

प्रस्तावनेत डॉ. भूषण झंवर यांनी सांगितले की, माझ्यासारख्या पित्याला अभिमान आहे की त्यांच्या मुलीच्या पुस्तकाचे आज प्रकाशन आहे. अनेक कविता पलकने लिहिल्या. तिला कविता स्फुरत गेल्या. त्या कविता आता सर्वांसमोर येत आहे. त्याचे सर्वांनी स्वागत करावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी शिक्षिका रेखा वर्मा, प्राचार्या मिनल जैन यांनी मनोगतातून कवयित्री पलक झंवर हिला सदिच्छा दिल्या. तर कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी, कवीला संवेदनशील मन असले पाहिजे. नात्यांचा गुंता, भावना पलकच्या कविता संग्रहातून दिसून येतात. जळगावची ओळख आता सांस्कृतिक म्हणून देखील होत आहे. त्यात पुढील काळात नक्कीच पलकचे नाव असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कवयित्री पलक झंवर हिने सांगितले की, स्वतःच्या स्वप्नांना मी सजविले आहे. मी कधी कविता लिहिल असे वाटत नव्हते. लेखन करताना हिंदी भाषेतील आपलेपण मला भावला. लेखनासाठी वाचन सुरू झाले. मी फक्त स्वतः चे ऐकले. मी कोण आहे, त्याचे आत्मपरीक्षण करू लागले. यातूनच पहिली कविता जन्माला आली, तेव्हा आई वडिलांनी कौतुक केले. तेथूनच कविता लिहिण्याची प्रेरणा मिळत गेली. मी अनेक लेखकांची पुस्तके वाचली आहे. त्यातूनच आत्मविश्वास वाढत गेला, अन कविता लिहीत गेली, असे सांगून पुस्तक विक्रीतील पैसे अनाथालयात देणार आहे, असेही पलकने सांगितले.

‘पलको से खुली कल्पनाए’ या पुस्तकाच्या १ हजार प्रति विकत घेऊन पलकच्या अनाथालयात मदत करण्याच्या चांगल्या उद्देशाला सहकार्य करणार असल्याचे अशोकभाऊ जैन यांनी प्रसंगी जाहीर केले. सूत्रसंचालन शिल्पा चोरडिया यांनी केले. आभार डॉ. प्रिया झंवर यांनी मानले. यावेळी डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. चंद्रशेखर सिकची, राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, माजी महापौर नितीन लढ्ढा, केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी सुनील भंगाळे यांच्यासह आयएमएचे पदाधिकारी, डॉक्टर्स, शहरातील नागरिक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here