Home पुणे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाल्यास वाढत्या वाहनांना आळा बसेल

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाल्यास वाढत्या वाहनांना आळा बसेल

51

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वाहनांची संख्या जास्त आहे. मुंबईत तर वाहनांच्या संख्येने विक्रम गाठला आहे. मुंबईत वाहनांची संख्या इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबईत प्रति किलोमीटर ५३० चार चाकी वाहन आहेत. त्याचा वाहतुकीवर मोठा परीणाम होत आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत होत आहे. गेल्या तीन वर्षात मुंबईसह राज्यातील चार चाकी वाहनांची घनता २५ टक्क्यांनी वाढली आहे. इतर कोणत्याही शहरांच्या मानाने मुंबईत वाहनांची संख्या अधिक आहे. दुचाकी वाहनांच्या संख्येत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. चार चाकी वाहनांची देखील तीच परिस्थिती आहे एकट्या मुंबईत चारचाकी वाहनांचे प्रमाण दिल्लीच्या तीनपट आहे. एव्हढ्या मोठ्या संख्येने वाढलेल्या वाहनांमुळे पार्किंगचा प्रश्न जटिल झाला आहे.

मुंबईत दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या ३५ लाखांच्या पुढे आहे. त्या तुलनेत गाड्या पार्क करण्यासाठी वाहनतळांची संख्या मात्र अपुरी आहे त्यात १० हजारांच्या आसपास वाहने पार्क करता येतात. परिणामी रस्त्यांवर अवैध पार्किंगची संख्या वाढली असून त्याचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे. या अवैध पार्किंगवर न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. रस्त्यांवर असणाऱ्या अवैध पार्किंगमुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. लहान रस्त्यांपासून पूर्व आणि पश्चिम दृदगती महामार्गावर सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा कोणत्याही वेळेस प्रचंड वाहतूक कोंडी होते. ज्या ठिकाणी जायला १५ मिनिटे लागतात त्या ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे ३५ मिनिटे लागतात. मुंबई हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर असले तरी वाहतूक कोंडीचे शहर अशी मुंबईची नवी ओळख निर्माण होत आहे. वाढत्या वाहन संख्येसोबतच रस्त्यांवर कुठेही पार्क केलेली तसेच छोट्या रस्त्यांवर दुतर्फा पार्क केलेली वाहने कोंडीचे मोठे कारण ठरत आहे. जी मुंबईची अवस्था आहे जवळपास तशीच अवस्था राज्यातील अन्य मोठ्या शहरांची आहे.

मुंबईसह राज्यातील इतर मोठ्या शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अधिकाधिक वाहन तळांची आवश्यकता आहे. सरकारने त्या दृष्टीने पावले उचलायला हवीत. वाढत्या वाहनांमुळे मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यावर्षी मुंबईतील हवा सर्वाधिक निकृष्ट श्रेणीत गणली गेली आहे. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा अधिक दूषित असल्याचा एक अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केला आहे. मुंबईतील हवा प्रदूषित असण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे मुंबईतील वाढती वाहनांची संख्या. जर वाहनांच्या संख्येत अशीच वाढ होऊ लागली तर मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे ती प्रदूषणाचीही राजधानी बनेल आणि लोकांना श्वास घेणे मुश्किल होईल.

त्यामुळेच वाढत्या वाहनांना आळा घालणे आवश्यक आहे. जर मुंबईसह राज्यातील इतर शहरांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीतजास्त वापर केला तर ही समस्या सुटण्यास मदत होईल. सरकारनेही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी. जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली तर लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच वापर करतील त्यामुळे वाढत्या वाहनांना आळा बसेल. वाहनाची संख्या कमी झाली की इंधन बचतही होईल आणि प्रदूषणालाही अटकाव होईल तसेच पार्किंगचा प्रश्नही सुटेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणे ही काळाची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली की वाढत्या वाहनांना आपोआप आळा बसेल.

✒️श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here