Home गडचिरोली एड्स संसर्ग कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो!

एड्स संसर्ग कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो!

210

(१ डिसेंबर: जागतिक एड्स जागरुकता दिन)

दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळावा असे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. सरकारी आणि आरोग्य अधिकारी, अशासकीय संस्था आणि जगभरातील व्यक्ती एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणावरील शिक्षणासह हा दिवस साजरा करतात. सन २०१७पर्यंत एड्समुळे जगभरात २.८९ कोटी ते ४१.५ कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अंदाजे ३.६७ कोटी लोक एचआयव्ही सह जगत आहेत, ज्यामुळे हे अभिलिखित इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या जागतिक सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे.

एड्स हा एक गंभीर आजार आहे. हा एक संक्रमित आजार असून या आजारामुळे जगभरात आतापर्यंत लाखो रूग्णांनी जीव गमावला आहे. ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस- एचआइव्हीमुळे होणाऱ्या ऍक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम- एड्स या गंभीर आजाराबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तींना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो.

एड्स या आजारासंदर्भात सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य हेतू आहे. आज जागतिक एड्स दिनच्या निमित्ताने आपण या दिवसाचा इतिहास आणि महत्व जाणून घेणार आहोत.
जागतिक एड्स दिनाचा इतिहास- एचआयव्हीचा प्रसार हा सर्वात आधी प्राण्यांपासून झाला होता. १९व्या शतकात आफ्रिकेतील माकडांच्या एका विशिष्ट प्रजातीमध्ये एड्सचा विषाणू पहिल्यांदा आढळून आला होता. हा रोग माकडांपासून माणसांमध्ये पसरला. आफ्रिकेमध्ये माकडे खाल्ली जात असत. त्यामुळे, हा रोग माकडांपासून माणसांमध्ये पसरल्याचे सांगितले जाते.

जागतिक आरोग्य संघटना- डब्ल्यूएचओने सर्वात आधी १ डिसेंबर १९८८मध्ये जागतिक एड्स दिनाची स्थापना केली होती. स्थानिक आणि राष्ट्रीय अधिकारी, आंतरराष्ट्रीय संस्था आणि नागरिकांमध्ये या आजाराच्या संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना या आजाराची माहिती मिळावी, यासाठी या दिनाची स्थापना केली होती. त्याप्रमाणे सन १९८८मध्ये पहिला एड्स दिन साजरा करण्यात आला. ज्यावेळी हा दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी सुमारे ९० हजार ते १.५ लाख लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह होते, असे सांगितले जाते. त्यामुळे वैद्यकीय जगतात खळबळ उडाली होती, त्यामुळे एड्सबद्दल किंवा एचआयव्हीबद्दल लोकांना शिक्षित आणि जागरूक करण्यासाठी जागतिक संस्थांना एकत्रित करून निधी देण्यावर भर देण्यात आला.

एड्स दिनाचे महत्व: मागील कित्येक वर्षांपासून जागतिक एड्स दिन हा साजरा केला जात आहे. हा एक गंभीर आजार आहे. अशा परिस्थितीमध्ये या आजाराबाबत सर्वांना जागरूक करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. जगभरातून या आजारास समूळ नष्ट करणे, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. तसेच, या आजारामुळे होणारे मृत्यू रोखणे आणि या आजाराने ग्रस्त असलेल्या पीडितांना योग्य उपचार देणे महत्वाचे आहे. सन १९८८पासून १ डिसेंबर रोजी प्रत्येक वर्षी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने एड्स या आजारासंबंधी जागरूकता वाढवणे, एड्स या साथीच्या संसर्गाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि एचआयव्ही विरुद्ध लढ्यात सहभागी होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. एड्स हा रोग ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस- एचआयव्ही द्वारे होतो. एचआयव्ही शरीरातील रोगप्रतिकारक पेशी नष्ट करतो किंवा त्याचे नुकसान करतो.
एड्सची लक्षणे- एड्सची पहिली लक्षणे म्हणजे इन्फ्लूएंझा- फ्ल्यूसारखी लक्षणे किंवा सूजलेल्या ग्रंथी असू शकतात. परंतु काही वेळा लक्षणे दिसू शकत नाहीत. दोन किंवा तीन महिन्यांनंतर लक्षणे दिसू शकतात. घसा खवखवणे, स्नायू दुखणे, पुरळ, तोंड किंवा जननेंद्रियाच्या अल्सर, डोकेदुखी, ताप, मुख्यत: मानेवर सूजलेल्या लिम्फ ग्रंथी, सांधे दुखी, अतिसार, रात्री घाम येणे इत्यादी लक्षणे असू शकतात. एड्स होण्याची कारणे- एखाद्या व्यक्तीस अनेक मार्गांनी एचआयव्ही- एड्सची लागण होते.

रक्त संक्रमण- काही प्रकरणांमध्ये रक्त संक्रमणाद्वारे व्हायरस संक्रमित केला जाऊ शकतो. एकच इंजेक्शन वापरणे- संक्रमित रक्ताने दूषित झालेल्या सुया आणि सिरिंजच्या माध्यमातून एचआयव्ही संक्रमित केला जाऊ शकतो. लैंगिक संपर्कः एचआयव्ही संक्रमण ज्यामुळे अधिक पसरते ती संक्रमण म्हणजे लैंगिक संपर्क होय. आईपासून मुलापर्यंत: एचआयव्ही विषाणूची लागण असलेली गर्भवती महिला त्यांच्या सामायिक रक्त परिसंचरणातून तिच्या गर्भावर व्हायरस संक्रमित करू शकते किंवा संक्रमित आई आपल्या दुधातून आपल्या बाळामध्ये विषाणू संक्रमित करू शकते. या गोष्टी करण्याने एड्स होत नाही- हात मिळवणे, मिठी मारणे, चुंबन, शिंका येणे, अखंड त्वचेला स्पर्श करणे, समान शौचालय वापरणे, एकच टॉवेल वापरणे, एचआयव्ही ग्रस्त व्यक्तीचे लाळ, अश्रू, मल आणि मूत्र याद्वारे एचआयव्ही पसरत नाही.
एड्स दिवस, जो आज संपूर्ण जग साजरा करत आहे, त्याची संकल्पना थॉमस नेटर आणि जेम्स डब्लू.बन यांनी सन १९८७मध्ये मांडली होती. थॉमस नेटर आणि जेम्स डब्ल्यू.बन हे दोघेही स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एड्स ग्लोबल प्रोग्रामसाठी सार्वजनिक माहिती अधिकारी होते. त्यांनी एड्स दिनाची त्यांची कल्पना डॉ.जोनाथन मुन, एड्स ग्लोबल प्रोग्रामचे संचालक यांच्याशी शेअर केली, ज्यांनी या कल्पनेला मान्यता दिली आणि सन १९८८पासून, १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. सुरुवातीला जागतिक एड्स दिन केवळ लहान मुले आणि तरुणांशी संबंधित होता, परंतु नंतर एचआयव्ही संसर्ग कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो, असे आढळून आल्यानंतर सन १९९६मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक स्तरावर एड्सचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम हाती घेतले आणि सन १९९७पासून जागतिक एड्स मोहीम सुरू केली.

एचआयव्ही हा एक गंभीर आजार आहे जो एक प्रकारच्या प्राणघातक संसर्गामुळे होतो. एड्सचे पूर्ण नाव “अक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम” आहे. हा एक प्रकारचा विषाणू आहे, ज्याचे नाव एचआयव्ही- ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस आहे. या आजारात संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर हा व्हायरस हल्ला करतो. त्यामुळे शरीर सामान्य आजारांशीही लढण्यास असमर्थ ठरते. विशेष म्हणजे हा आजार तीन टप्प्यात होतो, प्राथमिक अवस्था, वैद्यकीय विलंब आणि एड्स. सन १९५९ साली काँगोमध्ये आढळला पहिला रुग्ण. असे मानले जाते की, १९व्या शतकात पहिल्यांदाच एड्सची लागण झाली होती. आफ्रिकेतील माकडांच्या विशिष्ट प्रजातीमध्ये एड्स चे विषाणू आढळले. हा रोग माकडांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरला. वास्तविक आफ्रिकेतील लोक माकडे खात असत, त्यामुळे माकडं खाल्ल्याने हा विषाणू मानवी शरीरात शिरला असावा, असे म्हटले जाते. सन १९५९मध्ये एचआयव्ही विषाणू पहिल्यांदा एका आजारी कॉंगोली माणसाच्या रक्ताच्या नमुन्यात त्याच्या मृत्यूनंतर आढळून आला. तो पहिला एचआयव्ही बाधित व्यक्ती असल्याचे मानले जाते. किन्शास हे त्या काळात देहव्यापाराचे केंद्र होते. अशा प्रकारे हा रोग देहव्यापार आणि इतर मार्गांनी इतर देशांत पोहोचला. सन १९६०मध्ये हा रोग आफ्रिकेतून हैती आणि कॅरिबियन बेटांवर पसरला. वास्तविक, हैतीयन लोक काँगोच्या वसाहती लोकशाही प्रजासत्ताकमध्ये काम करत असत. जिथे स्थानिक पातळीवर शारीरिक संबंधांमुळे हा आजार इतरांमध्ये पसरला. जेव्हा ते त्यांच्या घरी परतले, तेव्हा विषाणू त्यांच्याबरोबर हैतीला गेला. त्यानंतर १९७०च्या दशकात हा विषाणू कॅरिबियन ते न्यूयॉर्क शहरापर्यंत पसरला आणि नंतर अमेरिकेपासून उर्वरित जगामध्ये पसरला. पुढे १९८०नंतर हा रोग जगभर खूप वेगाने पसरला. तेव्हापासून जगभरातील लाखो लोकांना एड्समुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
यावर्षीच्या जागतिक एड्स दिनाची थीम, “लेट कम्युनिटीज लीड”, एड्सनं बाधित समुदायांना नेतृत्व भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा उद्देश आहे. ही थीम एड्सनं बाधित झालेल्या लोकांना आवाज उठवण्यास आणि त्यांचं जीवन सुधारण्यासाठी कृती करण्यास सक्षम असण्याची गरज अधोरेखित करते. एड्स बाधित लोकांना आरोग्य सेवा, शिक्षण आणि समान रोजगाराच्या संधी मिळायला हव्यात. जेणेकरुन डब्ल्यूएचओ अनुसार या थीमचा उद्देश पूर्ण होऊ शकेल.

!! आंतरराष्ट्रीय एड्स जागरूकता दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

 

✒️संकलन व सुलेखन:-श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी.रामनगर वॉर्ड, गडचिरोली.फक्त व्हॉट्सॲप- 9423714883

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here