Home पुणे महात्मा जोतीराव फुले

महात्मा जोतीराव फुले

61

भारताचे थोर सुपुत्र, विचारवंत, समाजसुधारक, लेखक महात्मा जोतीराव फुले यांचा आज स्मृतिदिन. महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतीरावांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर आईचे नाव चिमणाबाई असे होते. सातारा जिल्ह्यातील कटगुण हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आडनाव गोऱ्हे असे होते पण त्यांच्या वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता त्यामुळे ते फुले म्हणूनच ते ओळखले जाऊ लागले पुढे फुले हेच आडनाव रूढ झाले. काही दिवसांनी कटगुणहुन त्यांचे कुटुंबीय पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आले. खानवडी येथे त्यांचे घर असून त्यांच्या नावे सात बाराचा उतारा देखील आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. जोतीराव फुले यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. १८४२ साली त्यांनी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. अतिशय तल्लख बुद्धीच्या जोतिरावांनी पाच सहा वर्षातच तो अभ्यासक्रम पूर्ण केला.

२३ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तथाकथित सनातनी उच्चवर्णीय लोकांकडून सर्वसामान्य लोकांवर होणारा अन्याय अत्याचर दूर करणे तसेच गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. ‘सर्वसाक्षी जगतप्ती। त्याला नकोच मध्यस्ती।। ‘ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला आणि समाज न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशीवाय लग्न लावण्यास सुरवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे महत्वाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी एका कवितेत शिक्षणाचे महत्व पटवून देताना म्हटले आहे की

विद्येविना मती गेली ।
मतिविना नीती गेली।
नितीविना गती गेली ।
गतिविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले ।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते. समाज शिक्षित करायचा असेल आणि बहुजन समाजात शिक्षण मुहूर्तमेढ रोवयची असेल तर महिलांना शिक्षित व्हायलाच हवे असे त्यांचे मत होणे म्हणूनच त्यांनी त्याची सुरवात स्वतःच्या घरापासून केली. जोतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षण कार्यास प्रवृत्त केले. महात्मा फुले यांनी १९४८ साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवली. पुढे सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिकापदी आरूढ झाल्या.शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे मुलींसाठी पहिली शाळा काढणारे पहिले भारतीय म्हणजे महात्मा जोतीराव फुले. महात्मा जोतीराव फुलेंनी देशात मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत असे कोणतेच क्षेत्र नाही की ज्यात महिलांनी आपला झेंडा रोवला नाही.

कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, तंत्रदान, शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत त्या केवळ आणि केवळ फुले दाम्पत्यांमुळे. महिलांसाठी फुले दाम्पत्यांनी जे कार्य केले ते ३३ कोटी देवांनीही केले नाही. महात्मा फुले यांनी पुण्यातील वेताळ पेठेत १८५२ साली अस्पृश्यांसाठी शाळा स्थापन केली. त्यांच्या या शैक्षणिक कार्याला सनातन्यांनी खूप वविरोध केला. मुलींनी शिक्षणासाठी घराबाहेर पडणे म्हणजे धर्म बुडणे अशी आरोळी ठोकत सनातनी लोकांनी महात्मा फुले यांच्या या महान कार्यास विरोध केला. त्यांना मारण्यासाठी मारेकरी पाठवले पण महात्मा फुले डगमगले नाहीत. ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. महात्मा जोतीराव फुले यांना वाचनाची खूप आवड होती. विवीध महापुरुषांचे जीवनचरित्र वाचणे व त्यातून प्रेरणा घेणे हा त्यांचा आवडीचा छंद. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंतांच्या राईट ऑफ थॉट्स या ग्रंथाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. बहुजन समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्य्र पाहून ते खूप अस्वस्थ होत. जातपात, अस्पृश्य- स्पृश्य भेदभाव पाहून त्यांना खूप राग येत. समाजातील अज्ञान अंधश्रद्धा दूर करून समाजातील जातीभेद नष्ट करण्याचा त्यांनी निश्चय केला. कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे असे त्यांचे रोखठोक मत होते.

सर्व मानव एकच आहेत म्हणून सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचे क्रांतिकारक म्हणून महात्मा फुलेंचे दर्शन होते. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. तुकारामांच्या अभांगाचा त्यांना गाढा अभ्यास होता. अभंगाच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते म्हणूनच आपला गुलामगिरी हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला. अस्पृश्यांची कैफियत हा त्यांचा अप्रकाशित ग्रंथ आहे. २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुले यांचे निधन झाले. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्यच आहे. महात्मा फुलेंना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here