▪️”२३ वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन कशासाठी? कुणासाठी?
बाराव्या शतकात भक्ती मार्गाने वैदिक कर्मकांडाचे स्तोम माजले होते. ब्राम्हण पुरोहितांकडून वेगवेगळ्या फळप्राप्तीसाठी देवता भक्तीचा मार्ग समाज मनावर बिंबविल्या जात होता.दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्रताचरण करणे अनिवार्य होऊन बसले होते.सर्व धार्मिक विधी व व्रतवैकल्ये फळाच्या अपेक्षेने केली जात. त्यात अत्यंत काटेकोरपणा पाळला जाई.अज्ञ जनांना दक्षिणेच्या व धान्य वस्त्रांच्या माध्यमातून लुबाडले जाई. एकविस वेळा पारायण,एकशे एक वेळा पारायण,सोळा शुक्रवार असे प्रकार केले जात. आजही सोळा शुक्रवारचे व्रत करताना कठोर नियमांचे पालन करुन घेतले जाते.अन्यथा शाप मिळण्याची भिती निर्माण केल्या दिली जाते.वैदिक धर्म कर्मकांडातील गरूड पुराणात गर्भधारणेपासून मृत्युशय्या व त्यानंतर श्राद्ध वर्षापर्यंतच्या सोळा संस्काराची आवश्यक्ता सांगितली जी अनावश्यक व त्याज्य आहे.धर्माच्या नावाखाली बहुजन समाजाचे शोषण करणारी व भट ब्राम्हण,पुरोहित यांच्या संपूर्ण आयुष्याचीच नव्हे तर पिढ्यान पिढ्या त्यांच्या पोटा पाण्याची तरतुद केलेली ‘रोजगार हमी योजनाच’ आहे. एकोणिसाव्या शतकात सुधारणा विषयक विविध चळवळी उदयाला आल्या. त्या गतीशिल झाल्या पण त्यातील कार्य आणि लेखन प्रक्रिया ही उच्चवर्णीयांच्या भोवती केंद्रीत झाली होती.
महात्मा फुले यांचे क्रांतीकार्य आणि त्यांचे प्रबोधनात्मक व परिवर्तनवादी लेखन हे एकमेव अपवाद होते. त्यांचे शुद्र, अतिशुद्र आणि स्त्री हे चिंतनाचे, लेखनाचे व कार्याचे प्रमुख केंद्र होते. त्यांनी केवळ परिवर्तनाचा विचार मांडला नाही तर विचार सरणीला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली म्हणूनच ते क्रांतिवीर ठरले. .मानवता व समाज परिवर्तन महात्मा फुलेंच्या साहित्याचे अध्ययन व क्रांतीकार्याचे चिंतन केल्यानंतर असे दिसेल की, त्यांच्या लेखनातून तीन स्तर व्यक्त होतात.
१) त्यांनी उपेक्षित वर्गाच्या दारिद्रयाचा शोध घेवून समकालीन समस्यांची पाळेमुळे इतिहासात कशी दडली आहेत. हे सिद्ध करणे. २) सामाजिक वर्णव्यवस्थेमुळे अन्याय अत्याचाराचे व पिळवणूकीच्या वास्तवाच्या दाहकाने किती घट्ट बंदीस्त करुन ठेवले याची जाणीव करुन देणे ३) त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय सुचविण्याचे प्रयत्न करुन भविष्यकळाची पायाभरणी करणे त्यातून ‘नव समाज’ निर्मिती करणे हा त्यांनी ध्यास घेतला. हे त्यांच्या विविधांगी लेखनातून दिसून येते. महात्मा फुले यांनी भटभिक्षुकांना सवाल (१८५१), पुरोहित, भटांनो उत्तर द्या (१८५१), पोवाडा शिवाजे राजे भोसले (१८६३) ब्राम्हणांचे कसब (१८६९), गुलामगिरी (१८७३), शेतकऱ्याचा आसूड (१८८३), इशारा (१८८५), अस्पृश्यांची कैफियत (१८८५) सार्वजनिक सत्यधर्म (१८८९) सत्सार-१ (१८८५), सत्सार-२ (१८८५) व अनेक अखंड लिहून प्रकाशित केले. महाराष्ट्राच्या परिवर्तनात संतांचे अभंग आणि महात्मा फुलेंचे अखंड यांना अनन्य साधारण महत्व आहे.
जोतीरावांनी पद्य काव्याच्या रचनेला अखंड म्हटले. त्यांनी ग्रंथातून शेतकऱ्यांची विपन्नावस्था, स्त्रियांची पिळवणूक, त्यांची मुस्कटदाबी, शेत मजुर श्रमिकांचे प्रश्न आणि आर्यभटांचा धुर्तपणा प्रखरपणे मांडला. मानवमुक्ती, समता, मानवता, सदाचार, विवेक न्यायप्रियता, सहिष्णूता व नितीचा विचार मांडला. समाजातील अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, जातीभेद, प्रारब्धवाद इत्यादीतून मानवाला बाहेर काढण्याची बहुजन समाजाला समजेल अशा सोप्या भाषेत ग्रंथातून विचार मांडले. त्यातून समतेचा व मानवाच्या कल्याणाचा सद्धविचार मांडला. तत्कालीन समाजाचे दर्शन वस्तुनिष्ठपणे-वस्तुस्थितीप्रमाणे मांडून मानवतेची व समाज परिवर्तनाची योग्य ती दिशा दाखविण्याचे कार्य केले.
छ. शिवाजी महाराजांच्या समतावादी विचारासाठी बहुजन समाजाला बुसरटलेल्या व त्याज्य समाजिक रुढी, परंपरेतून बाहेर काढणे आणि सामाजिक परिवर्तनाची, विज्ञानवादीदृष्टीची व आधुनिकीकरणाची गरज त्यांच्या मनावर बिंबविणे, हे त्यांच्या साहित्याचे मुख्य ध्येय होते. त्यासाठी त्यांनी निद्रिस्त बहुजन समाजाला जागे केले. शुद्राति अतिशुद्रांचे केलेल्या शोषणाचा धिक्कार, सत्यधर्माचा पुरस्कार, समता, मानवता व विज्ञाननिष्ठ यावर आधारित सामाजिक पुनर्रचनेचे विचार, सामाजिक नितिमत्तेवर भर, विश्व कुटुंबवाद, बुद्धिप्रामाण्याचे व मानवी हक्काचे समर्थन असे मानव कल्याणाचे अनेक विषय त्यांच्या लेखनातून व्यक्त झाले. महात्मा फुले यांनी तृतीय रत्न ह्या नाटकातून शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे, हा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाती-पाती विरहीत समतावादी ध्येयविचार गावोगाव नेला, गुलामगिरी ते सार्वजनिक
सत्यधर्म ह्या ग्रंथातून माणूस प्रथम जागा केला पाहिजे. ह्या जाणिवेतून जीवनवादी साहित्य लिहिले. शेतकरी हाच देशाचा पोशिंदा आहे. या भूमिकेतून ‘शेतकऱ्याचा असूड’ हा ग्रंथ लिहिला. त्यांनी सहकार, कृषि, औद्योगिकरण, शेतीचे अत्याधुनिकरण यांचा आग्रह धरला. त्यांनी फिल्टरेशन थिअरीचे वाफाडे काढून प्राथमिक शिक्षण, सार्वत्रिक व सक्तीचे करण्याची जोरदार मागणी केली. हंटर कमीशन समोरील महात्मा फुलेंचे निवेदन हा शिक्षण पद्धतीचा मूलमंत्र देणारा दस्तऐवज आहे.
महात्मा फुलेंनी नवा समाज निर्माण करण्यासाठी विषमताधिष्ठित समाज रचनेऐवजी भविष्यकालीन समताधिष्ठीत समाजाची पायाभरणी करायची होती. देशातील अर्थवस्थेला ब्राम्हणशाहीच कारणीभूत आहे, म्हणून ती नष्ठ करुन देशात ‘नवा समाज’ निर्माण करायचा होता. आणि त्या परिवर्तनासाठी ‘विद्या हेच धन’ असल्याचे सांगून विद्येनेच माणसांच्या अंगी बळ येते. आत्मविश्वास येतो. प्रगतीच्या वाटा खुल्या होतात. हे त्यांनी त्यांच्या साहित्यातून ठामपणे मांडले. महात्मा फुले यांचे समग्र साहित्य हे मराठी साहित्याला वैश्विक उंचीवर नेण्यास पुरक व पोषक ठरणारे आणि परिवर्तनाच्या मूल्यांना बळ देणारे आहे. त्यांच्या सर्वच ग्रंथांनी वैचारिक क्रांतीची मुहुर्त मेढच रोवली नाही, तर सामाजिक परंपरा व चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जबरदस्त हादरे दिले. त्यांनी बहुजन समाजाच्या जागृतीचा गजर करीत समाज क्रांतीचा झेंडा रोविला. त्यांचे
वाड्.मय ही पुरोहितशाहीच्या सार्वकालीन दुखण्यावर रामबाण मात्रा आहे. ते वैचारिक, प्रेरकता, परिवर्तनशीलता, वास्तवता, बुध्दिनिष्ठता आणि भाषेतील मर्दानी लावण्यपूर्तता इत्यादी गुणांनी परिपूर्ण आहे. त्यामधून धार्मिक समस्येबरोबरच शैक्षणिक, आर्थिक, नैतिक, सामाजिक, राजकीय अशा निरनिराळ्या प्रश्नांची त्यांनी खोलवर चिकित्सा केली. जी सामाजिक शास्त्रांच्या मूलतत्वांना स्पर्शून जाणारी चिकित्सा आहे. महात्मा फुलेंनी प्रचलीत वाडःमयाची वीण ही पार बदलून टाकली. त्यातून दलित जाणिवा प्रगट झाल्या. ग्रामीण वाङ्मयाचा प्रारंभही त्या माध्यमातून झाला. त्यामुळे महात्मा फुले हे दलित वाङ्मयाचे अग्रदूत ठरतात. महात्मा फुलेंच्या साहित्यावर मनुवादी ब्राम्हणी भांडवली अ.भा. मराठी साहित्य संमेलनातून समीक्षा व्हावयास हवी; पण ते करीत नाहीत, म्हणून महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन. समताधिष्ठीत समाज निर्माण करण्याचे महात्मा फुल्यांच्या वाङ्मयाचे विचार हे घराघरात नेण्याची गरज आहे. त्यांच्या ग्रंथांची सार्वजनिक ठिकाणी, गावागावात पारायणे झाली पाहिजेत, आजच्या प्रत्येक तरुणाने देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी फुलेवादीजाहिरनामा आपला जीवननामा म्हणून स्वीकारला पाहिजे.
एकोणविसाव्या शतकातील महाराष्ट्र हा धर्मभेद, उच्चनीच जातीभेद, स्त्री-पुरुष भेद, उच्चवर्णीयांचे शुद्रातिशूद्रांवरील धार्मिक, आर्थिक व राज्य कारभारविषयक अनिर्बंध अधिकार, स्पृश्य अस्पृश्यांतील भयग्रस्तता, ब्राम्हणेत्तरांचे
धर्माच्या नावावर होणारे सर्वकष शोषण, व्रत-वैकल्ये व
अंधश्रद्धाचे एक वाढते धार्मिक अवडम्बर, खऱ्या नैतिक मूल्यांचा ऱ्हास इत्यादि मध्ये बहुजन समाज गुरफुटून गेला होता. तो वैचारिक गुलाम झाला होता. ब्राम्हणी पुरुषप्रधान संस्कृतीत सर्वच समाजातील स्त्रियांना शिक्षणबंदी,ब्राम्हण स्त्रियांना पुनर्विवाहाला बंदी व केशवपन ह्या प्रथा पाळाव्या लागत. अशा स्थितीत हिंदुधर्म व हिंदू समाजाला सार्वजनिक सत्यधर्माची जोड देवून महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुणे येथे सत्यसोधक समाजाची स्थापना केली. सार्वजनिक सत्यधर्माची चळवळ ही केवळ वैचारिक चळवळ नसून कृतिशील आचरण करण्यासाठी मानवतावादी व मानवमुक्तीसाठी जीवनमूल्ये देणारी विधायक चळवळ आहे. व्यक्तिंचा व समाजाचा ऐहिक उत्कर्ष व उच्चतर पारलौकिक सुख मिळवून देण्यासाठी रचनात्मक कार्य करणारी सत्यशोधक समाज ही चळवळ आहे. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी मानवतावाद, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या शाश्वत मूल्यांचा पुरस्कार केला.
महात्मा फुलेंचे हे समनावादी विचार समाजापर्यंत पोहोचावे यासाठी दरवर्षी महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते आणि माझ्या मते याची आज समाजाला अत्यंत आवश्यक आहे .
जय ज्योती – जयक्रांती
✒️सत्यशोधक.प्रा.श्रीकृष्ण बनसोड(किशोर नगर,अमरावती)भ्र. ध्व:-9763403748