Home गडचिरोली ॥॥ वागण्या-बोलण्याला अदबशीर झळाळी ॥॥

॥॥ वागण्या-बोलण्याला अदबशीर झळाळी ॥॥

76

(22 नोव्हेंबर: हिराबाई पेडणेकर जयंती विशेष)

हिराबाईंचे कौतुक फक्त स्त्री नाटककार एवढेच नाही, याकडे गांभीर्याने लक्ष द्या! स्त्री शिक्षण, विशेष करून स्त्री-पुरुष सहजीवनाविषयी त्यांचे विचार भविष्य काळाचेही होते. त्यांच्या संवादलेखनातून पात्रांच्या मनोवस्था, त्यामागची कारणमिमांसा हे विचारपूर्वक योजलेले दिसते. श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींनी जयंतीनिमित्त केलेले हे त्यांचे कार्यविश्लेषण…

गोव्यात सावंतवाडी येथील कलावंतिणीच्या घरात हिराबाईंचा जन्म दि.२२ नोव्हेंबर १८८६ रोजी झाला. मुंबई विद्यापीठाला राजाबाई टॉवर बांधून देणाऱ्या धनिक प्रेमचंद रायचंद यांच्या घरात त्या वाढल्या, त्या मावशी भीमाबाईमुळे. मावशीने त्यांना मुंबईत आणून उत्तम शिक्षण दिले. संस्कृत, इंग्रजी, बंगाली शिकवणारे शिक्षक घरी बोलावले. पं.भास्करबुवा वखल्यांकडे संगीत शिक्षण झाले. त्यांना स्वत: पदे रचायची आणि चाली लावण्याची गोडी लागली. रायचंदांच्या घरी मुंबईतील अनेक कलाकार, लेखक व उच्चभ्रू व्यक्तींचे येणे-जाणे असे. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याला अदबशीर झळाळी आली. भास्करबुवा वखले यांच्याकडे संगीताचे धडे गिरवणे, उमलत्या वयात लेखनाची गोडी लागल्यावर नाट्याचार्य गो.व.देवल यांचे मार्गदर्शन, पुढे थोर नाटककार श्री. कृ. कोल्हटकरांचा सहवास, आणि भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची घरी राबता. एखाद्या हिऱ्याला पैलू पाडायला आणखी अनुकूलता ती कोणती? हिराबाई पेडणेकर या नावाने पहिली मराठी स्त्री नाटककार हा बहुमानाचा किताब मिळाला. ललित कलादर्शनसारख्या नामांकित संगीत नाटक कंपनीने दामिनी हे नाटक चार वर्ष रंगमंचकावर गाजत ठेवले. पुस्तकरूपानेही इंदुप्रकाशने प्रसिद्ध केले. एकोणिसाव्या शतकात कूस पालटली तेव्हा पहिल्या दशकात हे नाव लखलखीतपणे पुढे आले होते. पण नाटककार, कलाकार, साहित्यिक म्हणून पुढे त्यांना मानसन्मान मिळाले नाहीत किंवा त्यांनीही पुढे आपल्या प्रतिभाशक्तीची चुणूक दाखवली नाही. त्यांच्या बाबतीत, एखादे फूल अकाली कोमेजून जावे तसे झाले.

इ. स.१९०० ते १९११ दरम्यान किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीचे मालक-नट नानासाहेब जोगळेकरांसमेवत राहात होत्या. कोल्हटकर, गडकरी, गुर्जरांसारखे नाटककार, रेंदाळकर, बालकवींसारखे कवी, मामा वरेरकर, न.चिं.केळकर, चिंतामणराव वैद्य यांसारखे साहित्यिक यांच्या काळात त्या लिहीत राहिल्या. पूर्वी संगीत नाटकांच्या रसिक प्रेक्षकांमध्ये कलावंतिणी भाविणी असत. त्याही आपल्या कलेची उपासना करण्याच्या हेतूनेच येत. कोल्हटकर, गडकरींसारखे नाटककार पदांच्या नवनव्या चाली, चीजा या भाविणींकडून मुद्दाम ऐकत. हिराबाईही अशाच कलाकार होत्या. त्यांनीही अशाच कितीतरी पदे, कितीतरी चिजांच्या प्रेरणा दिल्या. त्यांनी विशीच्या आतच पहिले पूर्ण लांबीचे नाटक लिहीले. ते जयद्रथ विडंबन हे रंगभूमीवर आले नाही, परंतु अनेकांनी ते वाचून हिराबाईंची प्रशंसा केली. त्यामुळे नाट्यसृष्टीत त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. चारच वर्षात त्यांनी दुसरे नाटक लिहिले ते दामिनी. हे किर्लोस्कर मंडळींनी करावे, अशी त्यांची फार इच्छा होती.

त्यासाठी कोल्हटकरांनी शब्द टाकला नाही, म्हणून त्या नाराज झाल्या होत्या. ललित कलादर्शनने मात्र या नाटकाला खूप यश मिळवून दिले. त्या कविता आणि निबंधलेखन करत. त्यांच्या आणखी एक-दोन नाटकांचा उल्लेख आढळतो. मात्र संहिता उपलब्ध नाहीत. त्यांच्या संवादलेखनातून पात्रांच्या मनोवस्था, त्यामागची कारणमिमांसा हे विचारपूर्वक योजलेले दिसते. त्यांचे संगीतज्ञान तर नाट्यपद लेखनात फारच उपकारक ठरले. पण सर्वांच्या चालींमध्ये विविधता आहे. दामिनी हे स्त्रीपात्र रंगवताना त्यांनी ज्ञानमार्गात स्त्री-पुरुषभेद हे नसावेत, ते कृत्रिम आहेत, असा विचार मांडला. सुशिक्षित स्त्री अधिक परिपक्व असते. ती जीवनाला समर्थपणे सामोरी जाते, असेही रंगवण्याचा जोरकस प्रयत्न त्यांनी केला. नाटकातली नाट्यमयता त्यांच्या कथानकात पुरेपूर होती. चमत्कृतीपूर्ण प्रसंग, ताटातूट, पुनर्भेट, बुवाबाजीवर प्रहार असे अनेक घटक त्यांनी आपल्या नाटकांमधून सुजाणपणे वापरले.

बरीच वर्षे हिराबाई पेडणेकर याच पहिल्या स्त्री मराठी नाटककार असेच विधान होते. पण अभ्यासकांनी नंतर सोनाबाई केरकरांचे छ.संभाजी आणि काशिबाई फडके यांचे संगीत सीताशुद्धी ही नाटके कालानुक्रमे आधीची असल्याची माहिती समोर आली. अर्थात नाट्यगुणांनी संपन्न अशा हिराबाईंच्या लेखनाचे मोल काही त्यामुळे कमी झाले नाही. दुर्दैवाने नानासाहेब जोगळेकर गेल्यानंतर हिराबाईंना मानसिक आणि कौटुंबिक स्थैर्याची गरज अधिक भासली असणार. त्यांनी कृष्णाजी नेने नावाच्या कुटुंबवत्सल गृहस्थाशी घरोबा केला. सारा भूतकाळ विसरताना आपल्या लेखनकलेचेही बोट सोडले. कलावंतिणीचा शिक्का पुसून टाकण्यासाठी त्यांना कलांचाच त्याग करावा लागला. एक सामान्य गृहिणी म्हणून स्थैर्य मिळण्यासाठी मोजावी लागली एवढी मोठ्ठी किंमत! कोण जाणे ती आनंदाने दिलीही असेल. परंतु मराठी भूमी व भाषा मात्र स्त्री भावनानुकूल अशा अधिक नाटकांना मुकली होती, हेच खरे! हरहुन्नरी व्यक्तिमत्वाच्या धनी हिराबाईंनी पालशेत रत्नागिरी येथे दि.१८ ऑक्टोबर १९५१ रोजी अखेरचा श्‍वास घेतला.

!! त्यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी दंडवत प्रणाम !!

✒️श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी(लोककला व लोकसाहित्यिक चरित्रांचे गाढे अभ्यासक)मु. रामनगर वॉर्ड क्र.२०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली.भ्रमणध्वनी – ७७७५०४१०८६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here