✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जळगाव(दि.19नोव्हेंबर):- भारतात निवडणुका दीर्घ स्वरूपात घेणे व काही दिवसांच्या अंतराने मतमोजणी करणे यावर निवडणूक आयोग जोर देत असतो मात्र यातून लोकशाही कमकुवत होत जाते , सत्ताधारी याचा गैरफायदा घेत असतात , मतदाराच्या मताचे अवमूल्यन होते तेंव्हा मतदानातील गैरप्रकार टाळण्यासाठी मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी मतमोजणी आवश्यक आहे असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले.
भारत जोडो अभियान व सिव्हिल सोसायटी तर्फे दिनांक १८ नोव्हेंबर रोजी गणेश कॉलनी , जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत गांधी बोलत होते .पत्रकार परिषदेस संबोधित करतांना गांधी यांनी सांगितले की आज देशात संविधान धोक्यात आहे , मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली जात आहे , मुलींची सुरक्षितता धोक्यात आहे , जातीय , धार्मिक तेढ वाढविली जात आहे , एकाच उद्योगपतीच्या हितासाठी साऱ्या देशाला वेठीस धरले जात आहे , महाराष्ट्राला कंगाल करून इथले विविध उद्योग गुजरातला नेले जात आहे हे थांबविण्यासाठी आता मतदारांनी जबाबदारीने मतदान करणे आवश्यक आहे .
बटेंगे तो कटेंगे हा नारा दहशतीस पोषक असून जनतेत भय निर्माण होत आहे या वरून भाजपला नेमके काय करायचे आहे याचा अंदाज येतो या घोषणेने जाती जातीत , धर्मा धर्मात संघर्ष पेटला तर ते कुणालाही परवडणारे नाही असेही तुषार गांधी यांनी स्पष्ट केले . जे भाजप विरुद्ध बोलतात त्यांना हे सरकार नक्षली , देशद्रोही म्हणून संबोधतात , या देशात विरोधक नसावेत असे त्यांना वाटते . राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून जे यश संपादन केले त्यामुळे हे सरकार घाबरून गेले आहे तेंव्हा मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून या सरकारला धडा शिकवावा असेही गांधी यांनी स्पष्ट केले.
मंचावर तुषार गांधी यांचे समवेत जेष्ठ समाजसेविका वासंती दिघे , जेष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ , सिव्हिल सोसायटीचे संयोजक अमोल कोल्हे होते .