Home खेलकुद  फ्लाईंग शीख मिल्खा सिंग

फ्लाईंग शीख मिल्खा सिंग

39

भारतातीलच नव्हे तर जगातील महान धावपटूत ज्यांची गणना होते असे भारताचे महान धावपटू फ्लाईंग शीख मिल्खा सिंग यांची आज जयंती. फ्लाईंग शीख अशी उपाधी मिळालेल्या मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी पंजाबातील गोविंदपुरा या गावी एका गरीब शीख कुटुंबात झाला. मिल्खा सिंग यांना लहानपणापासून धावण्याची खूप आवड होती. राष्ट्रीय पातळीवरील धावण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी यश मिळवले मात्र मिल्खा सिंग प्रकाशझोतात आले ते १९५८ साली. यावर्षी कार्डिफ येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी ४०० मीटरच्या शर्यतीत त्यांनी सुवर्णपदक मिळवले. मिल्खा सिंग हे राष्ट्रकुल स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते. त्यानंतर १९५८ च्या टोकियो येथे झालेल्या आशिआई स्पर्धेत मिल्खा सिंग यांनी २०० आणि ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. एकाच आतंरराष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदक मिळवणारे ते भारताचे पहिले खेळाडू आहेत.

१९६२ च्या जकार्ता आशिआई स्पर्धेतही त्यांनी ४०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. १९६० च्या रोम ऑलम्पिक स्पर्धेत मिल्खा सिंग यांचे पदक अतिशय सूक्ष्म फरकाने हुकले. या ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर शर्यत ४५. ७३ सेकंदामध्ये पूर्ण केली. जर्मनीचा धावपटू कार्ल कुफमॅनपेक्षा ते सेकंदाच्या १०० व्या भाग एव्हढ्या कमी फरकाने मागे राहिले. अतिशय सूक्ष्म फरकाने ऑलिम्पिक पदक हुकल्याने जगभरातील क्रीडाप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. त्यांचे ऑलिम्पिक पदक हुकले तरी त्यांनी शर्यत पूर्ण केलेली ही वेळ राष्ट्रीय विक्रम ठरली विशेष म्हणजे त्यांचा हा राष्ट्रीय विक्रम ४० वर्ष अबाधित होता. याच स्पर्धेदरम्यान त्यांची भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधार निर्मल कौर यांच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी विवाह केला. त्यांच्या पत्नीचेही नुकतेच कोरोनाने निधन झाले आहे. त्यांचे पुत्र जीव मिल्खा सिंग हे प्रसिद्ध गोल्फपटु आहेत.

मिल्खा सिंग यांना फ्लाईंग शीख ही उपाधी पाकिस्तानचे प्रमुख पाकिस्तानचे माजी प्रमुख आयुब खान यांनी दिली. १९६० साली पाकिस्तानचा पाकिस्तानचा जगप्रसिद्ध धावपटू अब्दुल खालीक याने आव्हान दिले. मिल्खा सिंग यांनी त्याला पाकिस्तानमध्ये जाऊन हरवले. ते या स्पर्धेत ज्या प्रकारे धावले ते पाहून पाकिस्तानमध्येही ते खूप लोकप्रिय झाले ही स्पर्धा पाहण्यासाठी आयुब खान स्वतः हजर होते. या स्पर्धेनंतरच आयुब खान यांनी त्यांना फ्लाईंग शीख ही उपाधी दिली. भारत सरकाररनेही त्यांना अर्जुन व पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा योग्य गौरव केला. त्यांच्या जीवनावर आधारित भाग मिल्खा भाग हा चित्रपट येऊन गेला या चित्रपटात फरहान अखतर यांनी मिल्खा सिंग यांची भूमिका केली होती. मिल्खा सिंग हे भारतातीलच नाही तर जगभरातील धावपटूंचा आदर्श होते. निवृत्तीनंतर त्यांनी तरुण धावपटूंना मार्गदर्शनही केले. मिल्खा सिंग यांचे दोन वर्षापूर्वी १८ जून २०२१ रोजी कोरोनाने निधन झाले त्यांच्या त्यांच्या निधनाने भारतीय क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली. मिल्खा सिंग यांना जयंतीदिनी विनम्र आदरांजली!

✒️श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here