चंद्रपूर, दि. 15 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अधिकारानुसार, विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 च्या कलम 3 च्या उपकलम (2) च्या कलम (ब) अंतर्गत 11 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाली आहे. या संदर्भातील अधिसूचना भारत सरकारच्या न्याय आणि विधी मंत्रालयाने 8 नोव्हेंबर 2024 रोजी राजपत्रात प्रसिध्द केली. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना हे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) चे माजी कार्यकारी अध्यक्ष होते. परंपरेनुसार सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ न्यायाधीश हे पद भुषवतात.
कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी न्यायमुर्ती भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालय विधी सेवा समितीचे (SALSC) अध्यक्ष होते. कार्यकारी अध्यक्ष म्हणून न्यायमुर्ती भूषण गवई (NALSA) च्या भारतातील सर्व नागरिकांना, विशेषत: समाजातील दुर्बल आणि आर्थिकदृष्टया कमकुवत घटकांना मोफत व सहज न्याय सहाय उपलब्ध करुन देण्याच्या उद्दिष्टांचे नेतृत्व करतील. त्यांच्या नेतृत्वामुळे आर्थिक व समाजिक अडथळ्यांमुळे कोणत्याही नागरीकाला न्याय नाकारला जाणार नाही, अशी घटना दुरुस्तीच्या अनुच्छेद 39-अ ची (NALSA) ची बांधिलकी पुढे नेण्यास मदत होईल, असे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणने म्हटल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने कळविले आहे.