Home धार्मिक  गुरू नानक देव

गुरू नानक देव

27

आज कार्तिक पौर्णिमा, आज शीख समुदायाचे लोक श्री गुरू नानक देवजी यांचा जन्मोत्सव साजरा करतात. वास्तविक श्री गुरु नानक देवजी यांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी झाला मात्र शीख धर्माचे अनुयायी त्यांचा जन्मोत्सव कार्तिक पौर्णिमेलाच साजरा करतात. गुरू नानक देवजी हे शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु होते. गुरू नानक देवजी यांचा जन्म पाकिस्तानातील लाहोर जवळील तलवंडी येथे एका हिंदू कुटुंबात झाला. आजही या गावाला नानकना साहिब असे म्हणतात. गुरू नानक यांचा जन्मोत्सव प्रकाश पर्व म्हणूनही साजरा केला जातो. गुरू नानक देव लहानपापासूनच धार्मिक वृत्तीचे होते मात्र कर्मकांड आणि बुरसटलेले विचार त्यांना मान्य नव्हते म्हणूनच त्यांनी मौजीबंधनाच्यावेळीच जानवे घालण्यास नकार दिला होता होता. हिंदू धर्मातील कर्मकांड, बुरसटलेले विचार, अनिष्ट चालीरीती, विषमता, जातीभेद, स्त्रियांना दिली जाणारी हिन वागणूक त्यांना मान्य नव्हती म्हणूनच ज्ञान प्राप्तीनंतर त्यांनी शीख धर्माची स्थापना केली.

शीख धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी जगभर यात्रा काढली. या दरम्यान त्यांनी जगभरातील अनेक धार्मिक स्थळांना देखील भेटी दिल्या. त्यांनी त्या काळात केवळ भारतातीलच धार्मिक स्थळांना नव्हे तर इराक मधील बगदाद आणि सौदी अरेबियातील मक्का मदिना या धार्मिक स्थळांनाही भेटी दिल्या. या दरम्यान त्यांनी शीख धर्माच्या तत्वांचा प्रसार आणि प्रचार केला. सर्वसामान्यांमध्ये देव आणि धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेशही दिला. त्यांनी स्थापन केलेला शीख धर्म उदात्त, समतेच्या शिकवणुकीमुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात रुजला. आज शीख धर्माचे अनुयायी केवळ आशिया खंडातच नाही तर युरोप आणि अमेरिका खंडातही आहे. जगातील प्रमुख धर्मा पैकी एक धर्म म्हणून शीख धर्म ओळखला जातो.

गुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य आणि शाश्वत मूल्यांचे मूळ होते म्हणूनच जात धर्म यापलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे, माणूस म्हणून एकत्र राहावे अशी त्यांची इच्छा होती. सर्व माणसे ही एकाच आईची लेकरे असून त्यांच्यात कोणीही उच्च नीच नाही असे ते मानत. जातीपाती मधील धर्मा धर्मामधील भेदभाव तर मान्य नव्हता. कोणीही हिंदू नाही, कोणीही मुसलमान नाही सर्व जण मानव आहोत असा नारा त्यांनी दिला. त्यांनी एकता, श्रद्धा आणि प्रेमाचे तत्वज्ञान मांडले. ते क्रांतिकारक विचारांचे होते. त्यांच्या विचारांमुळेच शीख धर्म साता समुद्रापार गेला. ७ सप्टेंबर १५३९ रोजी श्री गुरु नानक देवजी यांचे महानिर्वाण झाले. गुरू नानक देवजी यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here