रोशन मदनकर, उपसंपादक मो. 88886 28986
ब्रम्हपुरी : महायुतीचे उमेदवार कृष्णा सहारे हे विजय वडेट्टीवार यांच्या तुलनेत धन संपत्तीने गरीब आहेत. मात्र लोकांच्या जवळील व मनातील आहेत. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे .आमचा उमेदवार हा दारू पाजणारा नाही तर पाणी पाजणारा आहे. असे वक्तव्य आमदार परिणय फुके यांनी कृष्णा सहारे यांच्या प्रचारार्थ जुगनाळा येथील जाहीर प्रचार सभेत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.
महायुतीचे उमेदवार कृष्णा सहारे यांच्या प्रचारार्थ १३ नोव्हेंबरला ब्रम्हपुरी तालुक्यातील जुगनाळा येथे जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार परिणय फुके यांची ब्रम्हपुरी मतदार संघात महायुतीचे उमेदवार कृष्णा सहारे यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी प्रचार सभा आयोजित केली आहे. जुगनाळा येथील प्रचार सभे पुढे बोलताना म्हणाले की महायुती ने भाजपचा लोकांच्या मनातील ओबीसी उमेदवार दिला आहे. बाहेरची पार्सल म्हणणाऱ्यांना तेलंगणाचा रस्ता दाखवा. ही लढाई ओबीसी घटकाच्या अस्तित्वाची असून अभी नही तो कभी नही, त्यामुळे जागृत होऊन मतदान करा. उमेदवाराला विजयी करा. स्वतःला वाघ समजणाऱ्याला माहित नाही की मी फडणवीसचा रिंग मास्टर आहे. सर्कस मध्ये वाघाला कसे फिरवतात ते मला चांगल्याप्रकारे माहीत आहे. वाघाला जेरबंद करण्याची ही योग्य वेळ आहे. सरसकट कर्जमाफीसह लाडक्या बहिणीचे पैसे वाढवून देणार असल्याचे यावेळी फुके यांनी म्हटले. माजी आमदार अतुल देशकर यांनीही विजय वडेट्टीवार यांचा खरपूस समाचार घेत कार्यकर्त्यांना पाहून घेण्याची भाषा वापरणाऱ्याला, धमकावणाऱ्याला मी पाहून घेईन, असे ठणकावून सांगत कार्यकर्त्यांनी घाबरू नये असे म्हटले. तर स्वतःला ओबीसी नेते म्हणणारे वडेट्टीवार हे ओबीसी मंत्रालयाचे मंत्री असताना सुद्धा ओबीसींना न्याय देऊ शकले नाही. दारूबंदी हटवून दारू सुरू केली. युवा पिढीला व्यसनाधीन करण्याचे काम केले. असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अविनाश राऊत यांनी प्रचार सभेत मार्गदर्शन करताना म्हटले. यावेळी मोठ्या संख्येने निवडून आणण्याचा निर्धार उपस्थित जनसमुदायानी केला.
यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख विनोद नवघडे, शिवसेना तालुकाप्रमुख नरू नरड, गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपा तालुकाध्यक्ष अरुण शेंडे, डॉ. गोकुळ बालपांडे, गोपाल ठाकरे, वंदना शेंडे, रश्मी पेशने, यशवंत आंबोरकर, सरपंच लक्ष्मी ठाकरे व मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व महिला जनसमुदाय उपस्थित होता.