अनिल साळवे, परभणी जिल्हा प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड :-दरवर्षी प्रमाणे बीकेबीसी ट्रस्टने गरजूंसोबत दिवाळीचा सण साजरा करून समाजसेवेचा अनोखा आदर्श घालून दिला. “नर सेवा, नारायण सेवा” या भावनेला आत्मसात करून, ट्रस्टने झोपडपट्टी आणि गरीब कुटुंबांमध्ये दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले.या मोहिमेअंतर्गत नवीन कपडे जसे की 200 साड्या, 200 ड्रेस, 200 कुर्ते, आणि इतर आवश्यक कपडे लहान मुले, महिला आणि पुरुषांना वाटप करण्यात आले, जेणेकरून त्यांचीही दिवाळी विशेष आणि आनंदाची जावी. यासोबतच 200 मिठाईची पाकिटेही वाटण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
समाजसेवा आणि गरजूंना मदत करण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या ट्रस्टच्या सचिव सौ.मंजू दर्डा यांनी या अभियानाचे नेतृत्व केले. त्या म्हणाल्या, “नर सेवा हीच खरी नारायण सेवा आहे. समाजातील असहाय आणि गरीब घटकाला मदत करणे हीच खरी सेवा आहे.
यावेळी ट्रस्टच्या इतर सदस्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून समाजसेवेच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, दिवाळी हा प्रत्येकासाठी आनंदाचा सण व्हावा, यासाठी कांकरिया ट्रस्ट दरवर्षी दिवाळीनिमित्त तसेच वेळोवेळी अशा कार्यक्रमांचे आयोजन करून गरजूंना मदत करतो.
या कार्यक्रमादरम्यान झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांनी नवीन कपडे व मिठाई मिळाल्यावर आनंद व्यक्त केला आणि ट्रस्टचे आभार मानले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात समाधानाचे भाव होते, त्यामुळे हा कार्यक्रम आणखी यशस्वी झाला. ही दिवाळी त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली, ज्यामध्ये त्यांना आवश्यक कपडे तर मिळालेच पण त्यांच्या हृदयात आशा आणि विश्वासही जागवला.
कांकरिया ट्रस्टच्या या मोहिमेने ‘नर सेवा, नारायण सेवा’ हे तत्त्व साकार करून समाजसेवा हीच खरी पूजा असल्याचे दाखवून दिले. समाजातील प्रत्येक घटकातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहावे आणि प्रत्येक सण त्यांच्यासाठी खास व्हावा यासाठी ट्रस्ट भविष्यातही असेच सेवा उपक्रम सुरू ठेवणार आहे.
या प्रसंगी पूजा दर्डा,अमर करंडे,हर्ष आंधळे आदी उपस्थित होते