✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगाव(दि. 3नोव्हेंबर):-येथील बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे यंदाही कृषी संस्कृतीचे प्रतीक लोक कल्याणकारी महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेची बैलगाडीवर गौरव मिरवणूक काढण्यात आली तसेच उत्साहात पूजन संपन्न झाले. सालाबादप्रमाणे यंदाही बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने उपस्थित शेतकरी (अन्नदाते) बांधव ज्ञानेश्वर माळी, बापू धनगर, दगा मराठे, नथु चौधरी, भगवान माळी आदींचा टोपी, रुमाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
बळीराजा गौरव रॅलीची सुरुवात – धरणी चौकातील आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकास माल्यार्पण करून रॅलीला सुरुवात झाली. तद्नंतर सुभाष कोल्ड्रिंक्स, पिल्लू मस्जीद, धनगर वाडा, अर्बन बँक, बस स्टँड, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय स्मारक, परीहार चौक, भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री स्मारक यानंतर साने पटांगण अर्थातच “बळीराजा चौक” येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने महात्मा बळीराजाला अभिवादन करण्यासाठी मिरवणुकीत सहभाग नोंदवला. तत्पूर्वी बळीराजाचे पहिले अवजार म्हणून नांगराचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शिवसेना उबाठा नेते गुलाबराव वाघ तसेच प्रमुख अतिथी म्हणून माळी समाज अध्यक्ष रामकृष्ण माळी, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, मराठे समाज अध्यक्ष भरत मराठे, भोई समाज अध्यक्ष सुनील जावरे, माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही. टी. माळी, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष गोविंद धनगर नगरसेवक भागवत चौधरी, राष्ट्रवादी (श.प.) शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील, बापू धनगर, सामाजिक कार्यकर्ते सुनिल सोनार, चुडामण पाटील, बापू धनगर, राजेंद्र ठाकरे, नईम काझी, संतोष सोनवणे, हिरामण जाधव, शाम काबरा, पुंडलिक पवार, रणछोड चौधरी, भीमराव धनगर, अमोल सोनार, चेतन जाधव, बबलू मराठे, भैय्या धनगर, राहुल पाटील, पत्रकार धर्मराज मोरे, राजू बाविस्कर, विकास पाटील, अविनाश बाविस्कर, विनोद रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी एच.डी.माळी यांनी महासम्राट बळीराजाची माहिती सादर करत सांगितले की, तीन हजार वर्षापूर्वीचा इतिहास मांडत एक समतामुलक, प्रजाहितदक्ष, स्वातंत्र्य प्रेमी, दानवीर, वचनप्रामाण्यवादी शेतकरी राजा या जगात दुसरा झालाच नाही, असे प्रतिपादन केले. माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी बळीराजांच्या कार्याची व्याप्ती अधिक वाढविण्याचे सांगितले. तद्नंतर दीपावली सणाला आपण घराघरात दिवे लावून बळीराजाच्या काळात जनता खुप सुखी असल्याचे सांगितले जाते.
उबाठा सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले, “ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो” अमानुषपणे शेतकऱ्यांचे हाल होवू नयेत म्हणून बळीराजाचे राज्य येऊ दे अश्या शब्दात बळीराजांचे स्मरणपर मनोगत व्यक्त करतांना श्री वाघ यांनी सद्यस्थितीत सुरू असलेल्या शेतकरी विरोधी धोरणांवर ताशेरे ओढले. कपाशी, सोयाबीन, मका आदी पिकांना भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याचं मत त्यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी तर आभार गोरख देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बळीराजा लोकोत्सव समिती धरणगाव च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.