Home गडचिरोली !! मार्क्सवाद- समीक्षेमागची महत्त्वाची प्रेरणा !!

!! मार्क्सवाद- समीक्षेमागची महत्त्वाची प्रेरणा !!

43

“जीवनपरिवर्तनाचे शास्त्र कळणे म्हणजे जीवन कळणे नव्हे. समस्येचे रूप कळणे म्हणजे माणूस कळणे नव्हे. मानवी जीवन हे चिरगतिशील, नित्यनूतन रूप धारण करणारे आहे. मानवी जीवनाचे व अनुभवाचे अनेक प्रकार व अनेक पातळ्या असू शकतात. कलावंतांचा संबंध मानवी जीवनाच्या सुखदुःखाशी असतो. तो जसा संकुचित असू शकणार नाही, तसाच तो प्रणालीपीडित व प्रणालीसीमितही असू शकणार नाही. उलट, कलावंताची साक्ष विचारप्रणालींनाही मोलाची व महत्त्वाची मानावी लागेल”. (नवी मळवाट: प्रस्तावना: पृ.३१) अशा तत्वज्ञानी शरच्‍चंद्र मुक्तिबोधाबद्दलचा श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा ज्ञानवर्धक संकलित लेख…. 

शरच्‍चंद्र मुक्तिबोध हे मराठी कवी, कादंबरीकार आणि निबंधकार होते. त्यांचा जन्म दि.२१ जानेवारी १९२१ रोजी इंदूर येथे झाला. त्यांचे शिक्षण उज्जैन व इंदूर येथे एम्.ए,एल्एल्.बी.पर्यंत झाले. त्यानंतर माध्यमिक शाळांतून अध्यापन, वकीली, नागपूरच्या प्रकाश मासिकाचे सहसंपादन असे विविध व्यवसाय केले. सन १९५७पासून नागपूरच्या नागपूर महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले.

नवी मळवाट-१९४९ व यात्रिक-१९५७ हे मुक्तिबोधांचे काव्यसंग्रह. तर क्षिप्रा-१९५४, सरहद-१९६२ आणि जन हे वोळतु जेथे-१९६९ या त्यांच्या कादंबऱ्या आणि त्यांच्या निबंधसाहित्यात काही निबंध-१९६३, जीवन आणि साहित्य-१९७२ आणि सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य या ग्रंथांचा समावेश होतो. नवी मळवाट या काव्यसंग्रहास विदर्भ साहित्यसंमेलनाचे पारितोषिक मिळाले. तसेच यात्रिक या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. मानवी जीवन हे यांत्रिक, निर्जीव व निष्फळ आहे असा नैराश्यपूर्ण आशय मर्ढेकरी कविता अवतरल्यानंतर मराठी कवितेतून उमटू लागला असताना मुक्तिबोधांनी युयुत्सू आणि आशावादी कविता लिहिली. नवी मळवाट या आपल्या काव्यसंग्रहाच्या दोन प्रस्तावनांतून- पहिल्या आवृत्तीची व १९६४ मधील दुसऱ्या आवृत्तीची निराशावादाचे त्यांनी सैद्धांतिक पातळीवरून खंडन केले. ‘वास्तवतेच्या आघातांनी तीव्र झालेल्या अनुभूतीस तिच्या संपूर्ण पार्थिव स्वरूपात प्रकट करणे विषम जीवनामुळे निर्माण झालेल्या जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारी अनेक अनुभूतींची सत्ये आपल्या काव्यांतून प्रकट करणे हे मुक्तिबोधांच्या दृष्टीने क्रांतीकारी नवकवीचे कार्य होय.

आपल्या कवितेचा आशय अधिक सामाजिक असल्यामुळे तो प्रकट करण्यासाठी व्यावहारिक जीवनातील प्रतिमांचा उपयोग केला पाहिजे, अशीही त्यांची भूमिका होती. मार्क्सवादावरची श्रद्धा त्यांच्या दोन्ही कवितासंग्रहांमागील एक महत्त्वाची प्रेरणा होय. आपल्या कादंबऱ्यांतूनही मुक्तिबोधांनी आपल्या सामाजिक दृष्टीचा प्रत्यय दिला आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणजे सुप्त शक्तींचा एक पिंड असून समाजात राहिल्यामुळे तिला बरेवाईट व्यक्तित्व प्राप्त होत असते, अशी भूमिका घेऊन त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतील व्यक्तींच्या सुखदुःखांचे चित्रण करीत असताना त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीलाही रूप देण्याचा प्रयत्न केला आहे.

मार्क्सवाद ही मुक्तिबोधांच्या समीक्षेमागचीही महत्त्वाची प्रेरणा असली, तरी ते मार्क्सवादाच्या चौकटीत अडकून पडले नाहीत. तथापि निर्मितिप्रक्रियेचा विचार करीत असताना त्यांनी सामाजिकतेला विशेष महत्त्व दिले. तसेच ‘रस’ आणि ‘रूप’ ही दोन तत्त्वे बाजूला ठेवून त्यांनी ‘मानुषता’ ह्या तत्त्वाचा ललितकृतीचे घटनतत्त्व म्हणून पुरस्कार केला. त्यांच्या दृष्टीने समता, स्वातंत्र आणि बंधुता ही मानुषतेचीच कालिक तत्त्वरूपे होत, नागपूर येथे ते दम्याच्पा आजाराने त्रस्त होऊन दि.२नोव्हेंबर १९८४ रोजी निधन पावले.

!! शरच्‍चंद्र मुक्तिबोध यांना त्यांच्या पावन पुण्यस्मरण दिनी शतदा विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी(रामनगर वॉर्ड, गठचिरोली.फक्त व्हॉट्सॲप- 9423714883)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here