सुयोग सुरेश डांगे, (विशेष प्रतिनिधी ) मो. 8605592830
चंद्रपूर, दि. 30 : भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले सामान्य निवडणूक निरीक्षक संगीता सिंग, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक अवधेश पाठक आणि खर्च पथक निरीक्षक आदित्य बी. यांनी 72 – बल्लारपूर विधानसभा मतदासंघाला एकत्रित भेट देऊन निवडणूक व्यवस्थेचा आढावा घेतला.
तीनही निवडणूक निरीक्षकांनी अधिका-यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत 72- बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित आणि नियमानुसार पार पाडण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अजय चरडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मृदुला मोरे, अभय गायकवाड यांनी आपल्या विभागाच्या तयारीचा अहवाल सादर केला.
यावेळी मतदार केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, मतदान यंत्रणांची सुरक्षितता, मॉक पोल प्रक्रिया, मतदारांना सोयीसुविधा, निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवणे, आणि निवडणूक खर्चाची तपासणी आदी मुद्द्यांवर विशेष चर्चा करण्यात आली. तसेच निवडणुकीच्या दरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेऊन त्याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक कार्यात नियमांचे काटेकोर पालन करणे व मतदानाच्या दिवशी योग्य समन्वय साधून सुरक्षित आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावे, अशा सुचनाही निवडणूक निरीक्षकांनी केल्या.
तत्पूर्वी, तिनही निवडणूक निरीक्षकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील स्ट्राँग रुम परिसराची पाहणी केली. मतपत्रिका आणि इतर निवडणूकसामग्रीचे सुरक्षित संचयन होण्यासाठी स्ट्राँग रूचची सुरक्षितता महत्त्वाची आहे, असे निरीक्षकांनी स्पष्ट केले. यावेळी अवधेश पाठक यांनी तीनस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्याच्या सूचना दिल्या. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. भगत आणि स्ट्राँग रुमचे व्यवस्थापन करणारे नोडल अधिकारी नंदकिशोर कुंभरे यांना याबाबत सर्वसमावेशक कार्यप्रणाली तयार करून तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.