Home महाराष्ट्र टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता...

टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता टाईम्स शिल्डने करिअर घडवण्यात अमूल्य भूमिका बजावली : प्रवीण आमरे

60

 

 

*जळगाव दि. २७ ऑक्टोबर (प्रतिनिधी)* – जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने मुंबई कस्टमवर मात करत भारतातील सर्वोत्कृष्ट स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या टाईम्स शिल्ड क्रिकेट ट्रॉफी ‘ए’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले. यात जैन इरिगेशनचा सर्वोत्कृष्ट फलंदाज सुवेद पारकर ठरला होता. मुंबई येथे टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या ९३ व्या वार्षिक पारितोषिक वितरणाप्रसंगी भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे, प्रो. रत्नाकर शेट्टी, श्री व्यंकट (टाइम्स) यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जैन इरिगेशनच्या संघाला टाईम्स शिल्ड २०२३-२४ ची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघाचे मयंक पारेख, शशांक अत्तरदे, शाश्वत जगताप, दर्शन मांगुकिया, जय बिस्टा, साईराज पाटील, सुवेद पारकर, अनंत तांबवेकर, आयुष झिमरे, मयूर ढोलकिया यांनी हा सन्मान स्वीकारला. वानखेडे स्टेडियममधील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या लाउंजमध्ये हा समारंभ पार पडला.

जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कमिटीचे सदस्य अतुल जैन, जैन स्पोर्टस अॅकडमीचे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल, अरविंद देशपांडे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

यावेळी प्रमूख अतिथी भारताचे माजी कसोटीपटु प्रवीण आमरे यांनी टाइम्स शील्डमधील सहा विभागांमधील कॉर्पोरेट सहभागाचे मूल्य अधोरेखित केले. माझे गुरू रमाकांत आचरेकर मला नेहमी सांगायचे की, ‘एका नोकरीमुळे क्रिकेटपटूच्या कुटुंबाची काळजी घेतली जाऊ शकते.’ ते माझ्यासाठी खरे ठरले. मी १५ वर्षांपासून आयपीएलमध्ये सहभागी झालो असलो तरीही, मला विश्वास आहे की क्रिकेटपटूंसाठी नोकरी आवश्यक आहे, कारण ते फक्त तीन वर्षे खेळले आहेत माझ्या एअर इंडियाच्या नोकरीसाठी, मी आज आहे तसाच आहे. असे प्रवीण आमरे म्हणाले.

प्रवीण आमरे, यांनी आपल्या कारकिर्दीत खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक आणि प्रशासक या भूमिका निभावल्या आहेत, टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे मुंबई क्रिकेटमध्ये विशेष स्थान आहे. मुंबईने ४२ वेळा रणजी जिंकली आहे, आणि टाईम्स शिल्डने क्रिकेट स्पर्धेचे यातील सहभागी खेळाडूंचे करिअर घडवण्यात अमूल्य भूमिका बजावली आहे. मध्य रेल्वेने ‘सी’ डिव्हिजनमध्ये सुरुवात केली, व मला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली त्यानंतर वासू परांजपे यांनी मला एअर इंडियाचे कर्णधारपद देऊ केले, ज्यामुळे मला स्पर्धा करणारा संघ तयार करता आला, मला अभिमान आहे की माझा हा संघ ३२ वर्षे ‘ए’ डिव्हिजन मध्ये सातत्याने खेळला आहे. जैन इरिगेशनचे संघ या स्पर्धेत चांगली प्रगती करीत आहे व त्यामुळेच त्यांचा संघ विजेता ठरला आहे. जैन इरिगेशन संघाचे व खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांनी भविष्यातील कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात.

*विभाग ‘ए’ चा निकाल*
विभाग ‘ए’ मध्ये जैन इरिगेशन विजयी तर मुंबई कस्टम उपविजयी झालेत, यात सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून जैन इरिगेशनचा सुवेद पारकर ठरला तर मुंबई कस्टमच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाज ध्रुमिल मतकर ठरला, ‘ए’ विभागात सर्वाधिक जलद धावसंख्या करणारा संघ डी वाय पाटील ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here