Home यवतमाळ गावंडे महाविद्यालयात मतदान जनजागृतीचे आयोजन

गावंडे महाविद्यालयात मतदान जनजागृतीचे आयोजन

176

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. २५ ऑक्टोंबर)
येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात मतदान जनजागृतीचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय व राज्य पातळीवर मतदानाचे घटते प्रमाण परिपक्व लोकशाहीच्यादृष्टीने चिंताजनक आहे. कमी प्रमाणात होणाऱ्या मतदानामुळे योग्य लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे लोकशाहीला सशक्त, बळकट व मजबूत करण्यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकाने आपल्या अमूल्य मतदानाचा अधिकार वापरून योग्य लोकप्रतिनिधींची निवड करणे आवश्यक आहे.

याकरिता मतदारांना जागृत करणे आणि मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी गावंडे महाविद्यालयातून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.

उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय यांच्यासोबतच्या सामंजस्य करारामुळे मतदान जनजागृती रॅलीनंतर महाविद्यालयात Systematic Voters Education and Electrol Participation अर्थात SVEEP च्या पथकाने महाविद्यालयातील तरुण मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले.

संसदेच्या पवित्र मंदिरात सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी योग्य लोकप्रतिनिधीची निवड करण्याचे आवाहन प्रास्ताविकाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. पी. वाय. अनासाने यांनी केले.

देशात सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक लोकशाही गणराज्य खऱ्या अर्थाने निर्माण करावयाचे असल्यास तरुण मतदारांनी हिरिरीने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन गट शिक्षणअधिकारी सतीश दर्शनवाड यांनी केले.

मतदानाचा अधिकार एक दुधारी शस्त्र आहे परंतु मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय पक्ष किंवा उमेदवाराकडून देण्यात येत असणाऱ्या आमिष किंवा प्रलोभनाला बळी न पडण्याबरोबरच, आपल्या मताची खरेदी-विक्री न करता निरपेक्ष पद्धतीने मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. इंगळे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

देशाला महासत्ता बनवायचे असल्यास तरुणांनी शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कदम यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपाच्या भाषणातून केले. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका तन्वी शिंदे व आरती सूर्यवंशी यांनी केले तर आभार निकिता देवकते हिने मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच राज्यशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here