Home महाराष्ट्र मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने मुंबईत जैन इरिगेशन परिवाराचा झाला गौरव

मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने मुंबईत जैन इरिगेशन परिवाराचा झाला गौरव

69

 

 

*जळगाव, २४ ऑक्टोबर (प्रतिनिधी):* – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.ने शेती, शेतकरी, सिंचन आणि पर्यावरणात जागतिक पातळीवरील केलेल्या अलौकिक कार्यास अधोरेखित करत बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट हुरुन इंडिया तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने जैन इरिगेशन परिवाराचा गौरव करण्यात आला. काल मुंबई येथे हॉटेल फोर सिझन्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. भावना जैन, अभंग जैन यांनी स्वीकारला.

हुरुन रिपोर्ट हा 1998 मध्ये लंडनमध्ये स्थापन केलेला एक अग्रगण्य संशोधन, लक्झरी प्रकाशन आणि कार्यक्रम गट आहे. यांचे भारत, चीन, फ्रान्स, UK, USA, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा आणि लक्झेंबर्गमध्ये काम सुरू आहे. अनस जुनैद यांच्या नेतृत्वाखाली २०१२ पासून हुरुन इंडियाचे काम सुरू आहे. भारतातील पारदर्शक संपत्ती निर्मिती, नव कल्पनांची निर्मिती, परोपकाराच्या गोष्टींना प्रोत्साहन, पिढ्यानपिढ्या व्यवसाय सांभाळून त्याचा वारसा पुढे जाणाऱ्या परिवारांना शोधून त्यांचा गौरव करण्याची संकल्पना सुरू केली आहे. या द्वारे बार्कलेज-हुरून इंडिया फॅमिली बिझनेस लिस्ट ही भारतातील प्रमुख कुटुंब-स्वामित्व असलेल्या उद्योग आणि उद्योजकांच्या यादीत समाविष्ट करते. आपल्या व्यवसायाची उत्कृष्टता, नवकल्पना आणि दीर्घकालीन यशासाठीची प्रतिबद्धता या प्रमुख गोष्टींचा विचार करून उद्योजकांची यादी केली जाते.

बार्कलेज पीएलसी- ही एक ब्रिटिश बहुराष्ट्रीय सार्वत्रिक बँक आहे., जिचे मुख्यालय लंडन , इंग्लंड येथे आहे. बार्कलेज ही संस्था 40 हून अधिक देशांमध्ये कार्यरत असून, 80,000 हून अधिक लोकांना रोजगार देते. एकूण मालमत्तेनुसार युरोपमधील पाचव्या क्रमांकाची ही बँक आहे. २ कोटी ग्राहक असलेली कॉर्पोरेट आणि खाजगी बँकिंग फ्रँचायझी आहे. या बँकेकडे आघाडीची गुंतवणूक, मजबूत, विशेषज्ञ यूएस ग्राहक असलेली वैविध्यपूर्ण बँक म्हणून पाहिले जाते.

बार्कलेज-हुरुन पुरस्कार समारंभाने भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्था आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणाऱ्या महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या कुटुंबांचा गौरव केला. त्या सर्व कुटुंबीयांचा पिढ्यानपिढ्या व्यवसायात सातत्य राखण्यात आणि त्यांच्या लवचिकतेसाठी यश, अनुकूलनक्षमता, आणि त्यांची मूळ मूल्ये आणि परंपरांवर खरे राहून दीर्घकालीन दृष्टी ठेवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात बजाज ग्रुपचे बजाज कुटुंब, यूपीएल ग्रुपचे श्रॉफ कुटुंब, पिरामल ग्रुपचे पिरामल कुटुंब, पारले प्रोडक्ट्सचे चौहान कुटुंब, मुथुट फायनान्सचे जॉर्ज मुथुट कुंटुंबीय, आयनॉक्सचे जैन कुटुंबिय व आदी इतर कुटुंबांचाही सन्मान करण्यात आला.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडची स्थापना महात्मा गांधीजींच्या विचारांचे पुरस्कर्ते, गांधी तीर्थचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांनी केली. त्यांचा वारसा सुपुत्र अशोक, अनिल, अजित आणि अतुल जैन हे समर्थपणे पुढे चालवत आहेत, जैन इरिगेशनला नव्या उंचीवर नेत आहेत. १९६३ मध्ये भवरलालजी जैन यांनी अवघ्या ७००० रुपयांची गुंतवणूक करून जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडची स्थापना केली. या कंपनीचे मूळ ग्रामीण भारतात आहे व कंपनीचा कार्यविस्तार १२६ देशांमध्ये झालेला आहे. कृषी, पाणी आणि पर्यावरण यात मूल्यवर्धन साखळी असलेली उत्पादने आणि सेवा जैन इरिगेशन समृद्धपणे एकाच छताखाली उपलब्ध करून शेतकऱ्यांना आणि भागधारकांना लाभ देते. जैन कुटुंबाने जैन इरिगेशनच्या माध्यमातून सुमारे ४० वर्षांच्या सतत नवनवीन शोधानंतर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जगभरातील शेती पद्धती कमालीच्या बदलल्या आहेत आणि त्यात सकारात्मक परिवर्तन झालेले आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या जैन इरिगेशनमध्ये तिसरी पिढी देखील कार्यरत झालेली आहे. त्यावरून सातत्याने शेतकऱ्यांची सेवा करण्याचे व्रत, ही वचनबद्धता यातून दिसून येते. येथे केले जाणारे सर्व प्रयत्न शेतकऱ्यांचे जगात चांगले स्थान बनवणे, आपली पृथ्वी आणि अन्नाचे भविष्य यांची सुरक्षा करणे हे उद्देश आहे. भारतात, जिथे ग्रामीण लोकसंख्येकडे शतकानुशतके दुर्लक्ष झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी जैन परिवाराने समृद्धी आणण्यासाठी परिवर्तनात्मक उपाय केले आहेत. या उपायांनी ग्रामीण शेतमजूर आणि शेतकरी यांनी संपूर्ण गावांना सावकारी कर्ज आणि गरिबीच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नपूर्वक सातत्याने मदत केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here