Home चंद्रपूर सन्मा.डी.के.आरिकर- समाजाच्या सुख दु:खाशी समरस असणारे व्यक्तिमत्व

सन्मा.डी.के.आरिकर- समाजाच्या सुख दु:खाशी समरस असणारे व्यक्तिमत्व

41

 

आज समाजात सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे, वेगवेगळ्या विषयांवर लोक काम करून आपल्या परीने समाजाचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतांना दिसतात ही एक चांगली बाब आहे मात्र त्यातील अनेक हे आरंभशूर असतात त्यांच्या कार्यात सातत्य राहत नाही म्हणून त्यांनी घेतलेले विषय मागे पडतात चंद्रपूर येथील डी.के.आरीकर मात्र याला अपवाद आहेत, त्यांनी पर्यावरण व समाजसेवेचे 25 वर्षांपूर्वी सुरू केलेले कार्य आजही त्याच जोमाने सुरू आहे कारण ते समाजाच्या सुख दुःखाशी समरस होऊन आपले काम सुरू ठेवतात.
व्यक्तीची ओळख ही त्यांच्या कार्याने केली जाते. ही ओळख आजन्म व त्यानंतरही टिकून राहते म्हणजे व्यक्ती ही एक व्यक्ती म्हणून न्हवे तर त्याने आयुष्यभर केलेल्या कार्याने ओळखली जाते. मात्र डी.के.आरिकर सारखी काही माणसे या स्पर्धेकडे अक्षरशः दुर्लक्ष करून फक्त समाजासाठी जगतात न्हवे तर आपले संपूर्ण आयुष्यच समाजासाठी खर्ची घालतात. त्यांना वाटते आपल्या थोड्याश्या सहभागाने समाजात असलेल्या समस्या सोडवण्यासाठी मदत मिळू शकेल.
चंद्रपूर शहर व जिल्ह्यात औदयोगिक विकास झाला जरूर मात्र सोबतच आले भयंकर प्रदूषण, नागरिकांचे आरोग्य बिघडू लागले त्यामुळे प्रदूषण कसे आटोक्यात आणता येईल त्याबद्दल जनतेमध्ये जागरूकता कशी वाढवता येईल यासाठी आपल्या काही समविचारी समाजसेवकांसोबत आरिकर साहेबांनी सन 2000 ला पर्यावरण संवर्धन व विकास समितीची स्थापना केली. समितीच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यात असंख्य झाडे लावण्यात आली, प्रत्येक वर्षी सातत्याने पर्यावरण संमेलन घेण्यात आले त्यात राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, स्लोगन स्पर्धा घेण्यात आल्या, व्याख्यानाच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्यात येते, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येतो या माध्यमातून हजारो पर्यावरण प्रेमी शहरात उभे झाले. पर्यावरण जनजागृतीचे कार्य चंद्रपूर जिल्ह्यापुरते मर्यादित न ठेवता राज्यभर हे कार्य त्यांनी पसरवले चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी तसेच समुद्रपूर, बुटीबोरी सारख्या शहरात सुद्धा पर्यावरण संमेलने आयोजित केली.
पर्यावरण अबाधित राखण्यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे हे जाणून त्यांनी असंख्य झाडांचे रोपण व संगोपन केले, आपल्या घराजवळील मोकळ्या जागेत स्व. किसनजी आरिकर स्मृती उद्यान उभारून तिथे औषधी वनस्पती, फळबाग, फुलबाग व ऑक्सिजन पुरवणाऱ्या मोठ्या झाडांची लागवड व संगोपन केले. आपल्या प्रत्येक वाढदिवसाला ते न चुकता वृक्षारोपण करतात व यातून अनेकांना प्रेरणा सुद्धा देतात. यावर्षी सुद्धा 18 ऑक्टोबर ला वाढदिवसानिमित्य वृक्षारोपण व समाजसेवकांचा सत्कार असा कार्यक्रम समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या परिसरात एक ओठी अभ्यासिका उभारून त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक साधन उपलब्ध करून दिले आहे.
समाजाच्या समृद्धीसाठी सुरू असलेल्या प्रत्येक आंदोलन व चळवळीत ते सक्रियपणे सहभागी असतात, सर्वांगाने मागे असलेल्या एस.टी. एस.सी, ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात, शासन दरबारी या वंचित समाजाच्या मागण्या मांडणे, त्यांना न्याय मिळवून देणे यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. कुणबी समाजातील सर्व जाती समूहाचे एकत्रीकरण व्हावे म्हणून त्यांनी ‘राष्ट्रीय कुणबी महासंघ’ ची स्थापना केली व त्याचे राज्य राष्ट्रीय स्तरावर काम सुरू केले. मृत्यूनंतरही समाजाच्या कामी यावे या उदात्त हेतूने त्यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहादान करण्याचा संकल्प केला आहे.
‘झाडासारखे जगा खूप उंच व्हा…. पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका’ या उक्तीप्रमाणे मागील 34 वर्षाच्या कालावधीत साप्ताहिक बहुजन ललकार या साप्ताहिकाच्या माध्यमातून समाजातील भीषण समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी केले आहे आजवर समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, विविध समाज संघटनांच्या सन्मानासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. “सुख दुःख जीवन का चक्र है ये बारी बारी आऍंगे | सुख मे तो हर कोई साथ देता है | दुःख मे साथ देनेवाले डी.के.आरिकर जैसे बहुत कम मिलते है” |
जीवनात एका तरी दुखीतांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा असाच संदेश त्यांच्या कार्यातून आपल्याला मिळतो.

हरिश ससनकर
सचिव पर्यावरण समिती चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here