Home लेख ई कचऱ्याविषयी जागरूकता हवी ( जागतिक ई कचरा दिनानिमित्त विशेष लेख...

ई कचऱ्याविषयी जागरूकता हवी ( जागतिक ई कचरा दिनानिमित्त विशेष लेख )

91

 

आज १४ ऑक्टोबर, आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक ई कचरा दिवस म्हणून साजरा केला जातो. ई कचरा कमी करणे आणि ई कचऱ्याचा पुनर्वापर या बाबत जनजागृती करणे हा या दिवसा मागचा उद्देश आहे. २०१८ साली पहिल्यांदा जागतिक कचरा दिवस साजरा करण्यात आला. पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक असलेला ई कचरा ही जगातील आज सर्वात मोठी समस्या बनली आहे. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल सेवांचा वापर जसा वाढत चालला आहे तसतसा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा डोंगरही वाढत चालला आहे. उपयुक्तता संपलेल्या आणि तांत्रिक बिघाडामुळे वापरण्यायोग्य नसलेल्या वस्तू फेकून दिल्या जातात आणि मग त्याचा ई कचरा बनतो. फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात दरवर्षी ५० हजार टन हून अधिक ई कचरा जमा होतो तर देशात ५ लाख टन ई कचरा वर्षाला तयार होतो. महाराष्ट्र खालोखाल आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात सर्वाधिक ई कचरा तयार होतो. आपल्या देशातच इतका ई कचरा तयार होत असेल तर जगात किती ई कचरा तयार होत असेल याचा विचार न केलेलाच बरा. ई कचऱ्याची समस्या इतकी गंभीरपणे आ वासून उभी असतानाही आपण ई कचऱ्या विषयी जागृत नाही. काहींना तर ई कचरा म्हणजे काय हे देखील माहीत नाही. ई कचरा म्हणजे तुमच्या आमच्या घरातील निकामी झालेल्या किंवा वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या सहजपणे आपण इतर कचऱ्यासोबत बाहेर फेकतो. या कचऱ्याचा निचरा देखील आपण इतर कचऱ्या प्रमाणेच करतो. घरगुती वापरातील टीव्ही, टेप, रेडिओ, टू इन वन, फ्रिज, मिक्सर, वॉशिंग मशीन, कुलर, एअर कंडिशनर, इलेक्ट्रॉनिक कुकर, मायक्रोव्हेव, ओव्हन, हीटर, पंखे यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी झाल्या की त्याला ई कचरा असे संबोधले जाते. यासोबतच महिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उपकरणे जसे संगणक, लॅपटॉप, टॅब, फोन, मोबाईल, बॅटरी, सर्किट बोर्ड, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, सिडी, व्ही सिडी यांचा ई कचऱ्यात समावेश होतो. अशा प्रकारे निकामी झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना ई कचरा असे म्हणतात. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये भरपूर प्रमाणात सजीवांना अपायकारक घटक असतात. हे अपायकारक घटक पर्यावरणातील हवा, मती आणि पाण्यात मिसळले की सभोतालची हवा, पाणी आणि माती दूषित होती. मोबाईलची किंवा कोणत्याही बॅटरीची निर्मिती शिसे वापरून केली जाते. हे शिसे पावसाच्या पाण्यात झिरपून हवेतील आर्द्रतेमध्ये मिसळून संबंधित हवा, पाणी आणि दूषित होते. अमेरिकेतील एका पर्यावरण संवर्धन संस्थेच्या म्हणण्यानुसार दरवर्षी ३० दशलक्ष संगणक निकामी झाले की फेकून दिले जातात. यापैकी वीस टक्क्यांहून कमी संगणकाचे पूनार्विनिकरण केले जात नाही. युरोपमध्ये तर दरवर्षी सुमारे १०० दशलक्ष फोन फेकून दिले जातात. कालबाह्य ठरलेली, निकामी झालेली ही उपकरणे पर्यावरणातील जागा वेगाने व्यापत आहेत. निष्काळजीपणे फेकलेल्या काही उपकरणांमध्ये बोरोलियम, कॅडीमियम, पारा आणि शिसे यासारखी घातक घटक असतात. या घटकांना वातावरणात संमिश्र होण्यास अवकाश लागत असला तरी खूप जास्त प्रमाणात जेंव्हा हे वातावरणात मिसळले जातात तेंव्हा पर्यावरणाची मोठी हानी होते. एकूणच ई कचऱ्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. हे लक्षात घेता ई कचऱ्याच्या समस्येवर वेळीच आणि गांभीर्याने विचार करण्याची नितांत गरज आहे. ई कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया अवलंबणे आवश्यक आहे. त्याचा निचरा इतर कचऱ्यासोबत न करता त्याचा निचरा करण्यासाठी भिन्न प्रक्रिया राबवली पाहिजे. ई कचऱ्याचे नियोजन आणि विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेत या कचऱ्याचे संकलन त्याचे रिसायक्लिंग आणि त्याचे मॅन्यूफॅकचरिंग महत्वाचे आहे. त्यासाठी सार्वजनिक व खाजगी क्षेत्राने संयुक्त रुपात पायाभूत सुविधा उभाराव्या लागतील. पर्यावरण मंत्रालयाने सादर केलेल्या ई कचरा व्यवस्थापन नियम २०२२ च्या मसुद्यात ई कचरा व्यवस्थापनामध्ये उत्पादक, पुनर्वापर संस्था आणि संघटना सर्वांची जबाबदारी निश्चित केली गेली आहे. ती जबाबदारी प्रत्येक घटकाने पार पाडल्यास काही प्रमाणात ही समस्या मिटेल.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here