Home लेख अभिजात मराठी…..

अभिजात मराठी…..

62

 

 

 

 

संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरात पसरलेल्या मराठी जणांना अभिमान वाटावा अशी बातमी घटस्थापनेच्या दिवशी आली आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी जणांचा ऊर अभिमानाने भरून आला. ती बातमी होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हे महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार होण्यासाठी कैक दशकांची वाट पाहावी लागली मात्र उशिरा का होईना हे स्वप्न साकार झाले यासाठी केंद्र सरकारचे मनापासून आभार मानावे लागेल त्यासोबतच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी संघर्ष करणाऱ्या हजारो ज्ञात – अज्ञात व्यक्तींनाही सलाम करावा लागेल. केंद्र सरकारने मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. याआधी संस्कृत, तमिळ, तेलगू, कन्नड, उडिया, मल्ल्याळम या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीच्या श्रेष्ठत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. अर्थात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचा प्रवास सोपा नव्हता. एक हजार वर्ष जुनी व पाच हजार बोलीभाषेपासून तयार झालेली अमृतातही पैज जिंकणारी मराठी भाषा अभिजात भाषेसाठी लागणारे सर्व निकष पूर्ण करत असूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नव्हता. मराठी भाषा ही मराठी संस्कृतीचा अस्सल आधार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासकीय पातळीवर अनेकदा प्रयत्न झाले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली होती, त्यासाठी आवश्यक असणारे सर्व पुरावे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सोपवून नऊ वर्ष झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली १० जानेवारी २०१२ रोजी अभिजात मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली होती. मराठी भाषेचे संशोधन करून व सूक्ष्म अभ्यास करून पुरावे गोळा करण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आले होते. प्रा रंगनाथ पठारे यांच्यासमवेत प्रा हरी नरके आणि व अन्य काही सदस्य या समितीत होते. या समितीने अतिशय सूक्ष्म अभ्यास करून मराठी भाषा अभिजात भाषेसाठी कशी पात्र आहे याचे सर्व पुरावे गोळा करून शासनाकडे सोपवले होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यास विरोध करणारी याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळली, तरीही मराठी भाषा अभिजात दर्जापासून वंचित होती. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर मराठा भाषेच्या संवर्धनासाठी केंद्राकडून जास्तीचा निधी मिळेल त्यामुळे मराठी भाषेची उंची आणखी वाढेल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेची प्रतिष्ठा आणखी वाढेल. आता मराठी भाषेच्या श्रेष्ठत्वावर राज्यमान्यतेची मोहर उमटली आहे. मुख्य म्हणजे आता मराठी भाषेच्या विकास कार्याला अधिक चालना मिळणार आहे. भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालयांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिकचा निधी मिळणार आहे त्यामुळे प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे सुलभ होणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने दरवर्षी मराठी भाषेतील दोन विद्वानांना राष्ट्रीय पुरस्कार मिळतील. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे याचा महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी जणांना अभिमान आहे. म्हणूनच अभिमानाने म्हणावेसे वाटते
लाभले भाग्य आम्हास…
बोलतो मराठी….

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here