Home महाराष्ट्र मन व शरीर साथ असेल तर हृदय शाबूत !

मन व शरीर साथ असेल तर हृदय शाबूत !

147


प्रविण बागडे
नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल : pravinbagde@gmail.com
———————————-

जगभरात जागतिक हृदय दिन हा दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा होत असतो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि या आजारांचा जागतिक प्रभाव कमी करण्यासाठीच्या धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी तो साजरा केला जातो. हृदयाच्या आरोग्याबाबत लोकांना जागरूक करणे हा ‘जागतिक हृदय दिना’ चा मुख्य उद्देश आहे. काही वर्षांपासून हृदयविकारासंदर्भातील आजारांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली असून अवघ्या तिशीत तरुणांनाही हृदयविकाराचा त्रास होऊ लागला आहे. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार पद्धती, वाढता ताणतणाव, मद्यपान, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन ही प्रमुख कारणे यामागे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितली. तरुणांनी हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी या बाबी टाळण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. कोणत्याही प्रकारच्या हार्ट-मॅजिक औषधांचा वापर करण्यापूर्वी त्याची खरंच आवश्यकता आहे का हेदेखील तपासून पाहणे आवश्यक आहे

भारतात वाढत्या हृदय रोगाचे प्रमाण हे निश्चितच धोक्याची सुचना आहे. जर योग्य काळजी घेतली तर आपण हृदयरोगास निश्चितच टाळू शकतो. मात्र त्यासाठी प्रतिबंधात्मक नियम पाळणे आवश्यक आहे. हृदयविकाराचे प्रमाण आणि त्यास कसे टाळावे, यासंबंधी जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. भारतात हृदयविकाराचे प्रमाण बघितले तर प्रत्येक 33 सेकंदाला एक व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु पावतो. शिवाय मधूमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत व प्रत्येक मधूमेह रुग्णास हृदयविकार असल्याचे गृहित धरतोच. एकूणच जगभरातील सर्वाधिक हृदयविकाराचे रुग्ण भारतात आहेत. आणखी एक बाब म्हणजे भारतीयांना नैसर्गिकरीत्याच हृदयविकाराची जोखिम आहे; कारण आपल्या रक्तवाहिन्यांचा आकार पाश्चिमात्यांच्या तुलनेत छोटा आहे. शिवाय हृदयाच्या एकाहून अधिक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याचे प्रमाणही अधिक आहे. दुसरं म्हणजे वाढती लोकसंख्या व त्यामुळे निर्माण झालेली स्पर्धा, ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि प्रदुषण देखील हृदयविकाराला पुरक ठरत आहेत. दहा वर्षापूर्वी चाळीशीच्या खालील एखाद दुसऱ्या रुग्ण हृदयविकाराच्या झटक्याने इस्पितळात भरती व्हायचा. आता मात्र, शंभरातील 30 रुग्ण हे हमखास चाळीशीच्या खालील असतात.
आपण बघितलं की, आपल्याला ह्रदयरोगाची अधिक जोखिम आहे. त्यामुळे आपण हृदयरोग टाळण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. पण हृदयरोगाला टाळू शकणार नाही असे दोन घटक असतात, ते म्हणजे वय व अनुवांशिकता, या जोखिमा टाळता येणे शक्य नाही. पण जसे जसे वय वाढते किंवा अनुवांशिक दृष्टीने हृदयविकाराची संभावना असल्याचे लक्षात आले, तर टाळता येण्यायोग्य घटकांवर कार्य केले पाहिजे. टाळण्यायोग्य घटकांमध्ये रक्तदाब व मधूमेह, धुम्रपान व बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणा व उच्च कोलेस्ट्रॉलची मात्रा या बाबींचा समावेश होतो. योग्य दिनचर्या व आहाराने या जोखिमा निश्चितच टाळता येतात. विशेष म्हणजे वय वाढत असताना, या जोखिमांना टाळण्यासाठी कार्य केले पाहिजे.
हृदयविकारासाठीची पहिली व सर्वात मोठी जोखिम म्हणजे मधूमेह. त्याच्यासोबत उच्चरक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता या बाबी पर्यायाने येतातच. सोबत रक्तदाब हे केवळ हृदयच नव्हे तर मुत्रपिंड, मेंदू यावर प्रभाव पाडत पायांच्या रक्तवाहिन्यांमध्येही अडथळा निर्माण करतो. हे सगळे जीवनशैलीशी निगडीत विकार आहेत. आहार व व्यायामामुळे या बाबींना टाळता येऊ शकते. आपण जशी आर्थिक गुंतवणूक करतो तर काही वर्षांनी परतावा मिळतो. अगदी त्याच प्रकारे जेव्हा रोज व्यायामाची गुंतवणूक करू तर जीवनात परतावा मिळेल. पण व्यायामाच्या अभावी हृदयरोगाची जोखिम वाढत आहे. मात्र रोज पंधरा मिनिटे व्यायाम केला तरी हृदयविकाराची जोखिम 14 टक्क्यांनी कमी होते.

असे म्हटल्या जाते की, बसणे हे नव्या पिढीचे धुम्रपानच होय. जर आपण सलग खुप वेळ बसून कार्य करीत असू तर आपल्याला एका धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती एवढाच हृदयरोगाचा धोका असतो. आज तर सलग बसून काम करणे हे आपल्या जीवनशैलीचा भाग झाला आहे. त्यामुळे आता खुर्च्यांवर ‘सिटिंग इज इंज्युरियस टू हेल्थ’ असे लिहिणे आवश्यक झाले आहे.

व्यायामासंदर्भात काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणे प्रत्येकाला आवश्यक आहे. कमीत कमी किती व्यायाम करावा, असा प्रश्न नेहमीच हृदयरोग तज्ज्ञांना विचारल्या जातो. आठवड्यातून पाच दिवस कमीत कमी 30 मिनिटं मध्यम तीव्रतेचा (मॉडरेट इंटेंसिटी) व्यायाम करणे अपेक्षित आहे. म्हणजे असा व्यायाम की, जो करतांना व्यक्ती आपल्या भवतालच्या व्यक्तीसोबत बोलू शकतो, त्यास दम लागत नाही. रोज चालणे वा जॉगिंग या व्यायाम प्रकारात मोडते किंवा आठवड्यातून तीन दिवस 25 मिनिटं थोडा तीव्र व्यायाम करणे अपेक्षित आहे. हा व्यायाम करतांना दम लागतो व आपल्या बाजूला असलेल्या व्यक्तीशी बोलणे शक्य नसते. धावणे व जलतरण या व्यायाम प्रकारात मोडतो. शिवाय दोन दिवस वजन उचलून स्वतःच्या क्षमता वाढविण्याचा व्यायाम ज्यास ‘वेट ट्रेनिंग’ म्हणतात, तो देखील करणे आवश्यक आहे. मात्र व्यायामाचा अतिरेक व्हायला नको.

आहार, जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हृदयरोगात त्याचे महत्त्व तर अनन्य साधारणच आहे. पण हृदयरोगाचे निदान झाले किंवा हृदयरोग टाळावयाचा असेल तरी आपल्याकडे आहार अचानक बचलविणे शक्य नसते. कारण तो संस्कृती, परिसर, सभौतालच्या वातावरण व लोकांवर अवलंबून असतो. मात्र व्यायामाशी निगडीत काही ठोकताळे अथवा सर्वसाधारण नियम पाळले तरी आहारावर नियंत्रण आणता येईल. त्यापैकी पहिली बाब म्हणजे साखर किंवा साखरजन्य पदार्थांचे सेवन कमी किंबहुना वर्ज्य करणे. हल्ली तर रोजच्या जेवणानंतर ‘डेजर्ट’ म्हणून गोड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. हे अयोग्य असून लठ्ठपणा, इन्सुलिन रेजिस्टंस, मधूमेह आणि पर्यायाने हृदयविकारास आमंत्रण दिल्यासारखे आहे. त्यामुळे साखर हा नव्या युगाचा तंबाखूच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दुसरं म्हणजे जे काही प्रिजर्व्ह अथवा डबाबंद आहे, ते हृदयासाठी घातकच आहे. त्या बाबी डबाबंद असल्यामुळे ताजे तर मुळीच नसतील. शिवाय टिकवून ठेवण्यासाठी रसायनांचा वापर देखील केल्या गेला असेल. हे रसायनं हृदयासाठी घातक ठरू शकतात. शेवटी आहाराच्या बाबतीत आणखी एक सुत्र लक्षात ठेवायचं की, जो आहार माझ्या आजीला माहित नाही, तो पदार्थ आरोग्यास योग्य नाही. अर्थात मार्केटिंगच्या काळात आजीला माहित असलेले पदार्थ डबाबंद करून विकल्या जात आहेत. मात्र येथे ही डबाबंद पदार्थ टाळले पाहिजेत.

सध्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेकजण अपुरी झोप घेतात आणि याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतात. जेव्हा शरीर थकलेले असते, तेव्हा शरीराला झोपेची आवश्यकता असते. तज्ज्ञांच्या मते झोपेच्या कमतरतेमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. झोप ही माणसाच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. चांगल्या झोपेमुळे तुम्ही नेहमी निरोगी राहता. सध्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेकजण अपुरी झोप घेतात आणि याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतात. जेव्हा शरीर थकलेले असते, तेव्हा शरीराला झोपेची आवश्यकता असते. तज्ज्ञांच्या मते झोपेच्या कमतरतेमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण येऊ शकतो, ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या वॉलमध्ये एथेरोस्क्लेरोसिस दिसून येतो. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होतात. ओएसए सारख्या झोपेच्या आजारांमुळेही अनेकांची झोप नीट होत नाही. या आजारांमध्ये श्वासनलिका वारंवार एकमेकांवर आदळतात, त्यामुळे झोपेत अडथळा निर्माण होतो.

आजच्या धावपळीच्या जगात जेव्हा आपण आपल्या कामाच्या ठिकाणी, घरामध्ये, शाळा इत्यादींमध्ये सतत तणावपूर्ण परिस्थितीला तोंड देत असतो, तेव्हा तणाव सातत्याने असतोच, ज्यामुळे आपल्याला “क्रोनिक स्ट्रेस डिसऑर्डर” विकसित होऊ शकतो. “तणावांमुळे हृदयाचे आजार होतात!” हे वाक्य जरी आपण डॉक्टर, मित्र आणि कुटुंबीयांकडून दररोज ऐकले असेल. पण हे जैविक आणि वैद्यकीय संशोधनावर आधारावर सांगितले जाते. तणाव हा चिंता आणि भितीदायक स्थितीमध्ये आपल्या शरिराकडून मिळणारी प्रतिक्रिया आहे. वाघ पाठीमागे लागल्यासारख्या परिस्थितीमध्ये, जेव्हा आपल्या समोर आलेल्या परिस्थतीचा सामना करायचा असतो अशा स्थितीमध्ये आपले शरीर त्वरित प्रतिक्रिया देते. यालाच आपण आल्पकालीन ताण येतो.

भयावह परिस्थिती संपल्यानंतर शरीर आपोआप सामान्य स्थितीत येते. पण आल्पकालीन ताण जात नसेल तर काय करावे? तणावपूर्ण परिस्थितीत आपल्या शरीरात दोन हार्मोन्स कॉर्टिसॉल आणि अॅड्रेनालाईन सोडले जातात. कॉर्टिसॉल तणाव परिस्थितीत साखरेला उर्जेचा स्रोत म्हणून सोडण्यात मदत करते, तर अ‍ॅड्रेनालाईन शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्त प्रवाहाला प्राधान्य देण्यासाठी मदत करते. जसे की पायांमधील स्नायू, इतर रक्तवाहिन्या आकुंचन पावते आणि हृदय गती वाढवते ज्यामुळे अतिरिक्त ऑक्सिजनयुक्त रक्त तयार होते आणि ते स्नायूंपर्यंत पोहोचू शकते. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे उच्च रक्तदाब होतो.

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here