Home अमरावती सत्यशोधक समाज ही मानवतावादी व मानवमुक्तीची विधायक चळवळ- प्रा.श्रीकृष्ण बनसोड

सत्यशोधक समाज ही मानवतावादी व मानवमुक्तीची विधायक चळवळ- प्रा.श्रीकृष्ण बनसोड

96

 

 

अमरावती ( प्रतिनिधी )
सकल बहुजन समाजाला धर्मांध शक्तीच्या जुलमी शोषणातून बाहेर काढून त्यांना बुद्धीप्रामाण्यवादी शिकवण देण्यासाठी महात्मा फुले यांनी दि .२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली.या सत्यशोधक समाजाचा १५१ वा वर्धापन दिन महात्मा फुले पूर्णाकृती पुतळा चौक ( चित्रा चौक ) अमरावती येथे उपेक्षित समाज महासंघ व फुले – शाहू – आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या विविध संस्था व संघटनांच्या वतीने दि.२४ सप्टेंबर २०२४ ला संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष
समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड (अध्यक्ष,उपेक्षित समाज महासंघ ), प्रमुख वक्ते प्रा.अरुण बुंदेले,(अध्यक्ष कै.मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठान ), प्रमुख अतिथी युवा पत्रकार श्री विनोद इंगळे, प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे (अध्यक्ष डॉ.पंजाबराव देशमुख अकादमी ),कामगार नेते श्रीकृष्णदास मोहोरे, ॲड. प्रभाकर वानखडे,संजयराव राऊत,रमेशराव राऊत,गणेशराव मानकर,वसंतराव भडके,राम कुमार खैरे होते.
सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी ” अभंग तरंग ” या स्व काव्यसंग्रहातील ” क्रांतिसूर्य ” या अभंगाचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
——
श्री विनोद इंगळे यांचा सत्कार

 

सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिनी ” सत्यशोधक समाज समिती ” च्या अध्यक्षपदी युवा पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मा.श्री विनोद इंगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात येऊन त्यांचे पुष्पगुच्छ व प्रा.बुंदेले लिखित ” अभंग तरंग” व प्रा.बनसोड लिखित ” महात्मा फुले व अस्पृश्यांची कैफियत ” ही पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.नियुक्ती झाल्याबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

अध्यक्ष सत्यशोधक प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी ,”महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाची चळवळ ही मानवतावादी व मानवमुक्तीसाठी जीवनमूल्य देणारी विधायक चळवळ आहे.सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी मानवतावाद,व्यक्तिस्वातंत्र्य, समता,बंधुता,न्याय या शाश्वत मूल्यांचा पुरस्कार करणारी आहे.” असे विचार व्यक्त केले.

महात्मा फुलेंचा सत्यशोधकीय विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे आवश्यक-श्री विनोद इंगळे

नवनियुक्त सत्यशोधक समाज समितीचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी युवा पत्रकार श्री विनोद इंगळे यांनी ,” सत्यशोधकीय विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मी निर्धार करतो.सत्यशोधक समाज चळवळ केवळ अमरावती जिल्ह्यापूर्ती मर्यादित न राहता त्याचा प्रचार व प्रसार मी सर्वदूरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल.” असे विचार व्यक्त केले.

——
वैचारिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना-प्रा.अरुण बुंदेले

प्रमुख वक्ते साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी ,” महात्मा फुलेंच्या काळात बहुजन समाज हा विविध प्रकारच्या परंपरागत रुढी व अंधश्रद्धांमुळे वैचारिक गुलाम झाला होता.त्यांना या वैचारिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सामाजिक व धार्मिक अन्यायाविरुद्ध सतत लढा दिला.आज सत्यशोधक समाज समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेले मा.श्री विनोद इंगळे यांनी ही सत्यशोधक समाजाची चळवळ पुढे नेण्याचा आज निर्धार केलेला आहे,त्यांच्या या कार्याला यश लाभो ही मनस्वी सदिच्छा .” असे विचार व्यक्त केले.

—-

सत्यशोधक तळवळ गतिशील होणे आवश्यक-प्रा.नरेशचंद्र काठोळे

प्रमुख अतिथी प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी ,” विविध प्रकारच्या शोषणाचा प्रतिकार करण्यासाठी बहुजन समाज संघटित व्हावा यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ही सत्यशोधक समाजाची चळवळ गतिशील करण्याचे कार्य प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांच्या नेतृत्वात सुरू असून आज अशा कार्याची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

—-

बहुजन समाजाला आज संघटित होण्याची गरज -ॲड .प्रभाकर वानखडे

प्रमुख अतिथी ॲड.प्रभाकर वानखडे यांनी ,” भरकटलेल्या बहुजन समाजाला आज संघटित होण्याची गरज आहे आणि यासाठी आज महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे कार्य गतिशील करण्याची गरज आहे .” असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी कामगार नेते श्रीकृष्णदास माहोरे ,श्री संजय राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन ॲड.प्रभाकर वानखडे तर आभार श्री गणेश मानकर यांनी मानले . कार्यक्रमाला शरद सरोदे , करीमउद्दीन,कुलदीप चौरे ,
गणेश रिठे तसेच फुले – शाहू – आंबेडकरी अनुयायी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here