बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवणारे आधुनिक काळातील भगीरथ रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी २२ सप्टेंबर १८८७ रोजी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे हे त्यांचे मूळ गाव होय. कर्मवीर भाऊराव पाटील हे लहानपणापासूनच बंडखोर प्रवृत्तीचे होते. तत्कालीन जातीव्यवस्थेत उच्च जातींकडून कनिष्ठ जातींवर होणाऱ्या अन्यायाची त्यांना खूप चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात प्रचंड राग होता. अस्पृश्य समाजाला उच्च वर्णीयांकडून जी वागणूक दिली जात होती त्याबाबत त्यांच्या मनात प्रचंड असंतोष होता. अस्पृश्य समाजाला विहिरीचे पाणी दिले जात नाही हे पाहून त्यांनी विहिरीचे रहाटच तोडून टाकले होते. कर्मवीर भाऊराव पाटलांना शिक्षणाची खूप आवड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर जिल्ह्यातील विटा या गावी झाले तर माध्यमिक शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये झाले. शालेय वयातच त्यांच्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव पडला. छत्रपती शाहू महाराज व महात्मा ज्योतिराव फुले यांना ते आदर्श मानू लागले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते साताऱ्यात गेले तीथे त्यांनी गरीब मुलांसाठी शिकवण्या सुरू केल्या. याच काळात त्यांनी मद्वना मास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर यांच्या मदतीने दुधगावत दुधगाव शिक्षण मंडळाची स्थापना केली. या संस्थेमार्फत गरीब मुलांसाठी एक वसतिगृह सुरू केले. ४ ऑक्टोबर १९१९ रोजी कर्मवीरांनी सातारा जिल्ह्यातील काले गावात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. बहुजन समाजातील मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देणे हे रयत शिक्षण संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते. बहुजन समाजातील गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. बहुजन समाजातील मुलांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्यांनी त्यांना समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची देखील शिकवण दिली. संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलांना साताऱ्यात राहण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी वसतिगृह बांधले. या वसतिगृहाची जबाबदारी त्यांनी पत्नी लक्ष्मीबाई यांच्यावर सोपवली. लक्ष्मीबाई या वसतिगृहातील मुलांसाठी मायेची सावली बनल्या. वसतिगृह चालवण्यासाठी त्यांना आपले दागिने विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संस्था आणि वसतिगृह चालवण्याचा प्रयोग कर्मवीरांना करता आला तो लक्ष्मीबाई यांच्यामुळेच. कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेत कमवा आणि शिका योजना सुरू केली. या योजनेनुसार चालणारे पहिले फ्री अँड रेसिडेंशल हायस्कूल सातारा येथे सुरू करून त्या हायस्कूलला महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नाव दिले. त्यानंतर याच नावाने त्यांनी अनेक शाळा काढल्या. १९४७ साली कर्मवीरांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेज, तर १९५४ साली कराड येथे सदगुरु गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली. आपल्या संस्थेत प्रशिक्षित शिक्षकांचा वानवा पडू नये यासाठी त्यांनी अध्यापक विद्यालये देखील सुरू केली. भाऊराव पाटील यांच्या हयातीत रयत शिक्षण संस्थेने ५७८ प्राथमिक शाळा, ४३९ माध्यमिक शाळा, ( २७ मुलींसाठी ) ३८ वसतिगृह शाळा, १६० उच्च माध्यमिक विद्यालये, २१ तंत्रदान विद्यालये, ८ अध्यापक विद्यालये, ( १ मुलींसाठी ) ४१ महाविद्यालये (४ मुलींसाठी ) आणि ५ इंग्रजी माध्यमांची विद्यालये यांची स्थापना केली. रयत शिक्षण संस्थेचा विस्तार महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटकातही झालेला आहे. त्यांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या रोपट्याचा आज वटवृक्ष बनला आहे. बहुजन वर्गातील मुलांसाठी त्यांनी केलेले कार्य पाहून पुणे विद्यापीठाने १९५९ साली त्यांना डि. लीट ही मानाची पदवी बहाल केली. भारत सरकारनेही पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवणाऱ्या या आधुनिक भगिरथाचे ९ मे १९५९ रोजी निधन झाले. आज त्यांची १३७ वि जयंती. आजच्या दिवशी त्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करणे हे बहुजनांचे आद्य कर्तव्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांना विनम्र अभिवादन!
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५